|Thursday, April 18, 2019
You are here: Home » क्रिडा » उस्मान ख्वाजाचे दमदार शतक

उस्मान ख्वाजाचे दमदार शतक 

वृत्तसंस्था / बेंगळूर

येथे रविवारपासून सुरू झालेल्या यजमान इंडिया अ आणि ऑस्ट्रेलिया अ यांच्यातील चार दिवसांच्या अनधिकृत पहिल्या  कसोटीत ऑस्ट्रेलिया अ चा पहिला डाव 243 धावात आटोपला. त्यानंतर इंडिया अ ने पहिल्या डावात बिनबाद  41 धावा जमविल्या. ऑस्ट्रेलिया अ संघातील सलामीचा फलंदाज उस्मान ख्वाजाने दमदार शतक (127) झळकविले. लाबुसेंगेने 60 धावांचे योगदान दिले. इंडिया अ संघातील मोहम्मद सिराज सर्वात प्रभावी गोलंदाज ठरला. त्याने 59 धावांत 8 गडी बाद केले.

या सामन्यात ऑस्ट्रेलिया अ ने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी स्वीकारली. ख्वाँजा आणि पॅटरसन यांनी सलामीच्या गडय़ासाठी 78 धावांची भागिदारी केली. त्यानंतर ऑस्ट्रेलिया अ चे चार फलंदाज लवकरच बाद झाले. ख्वाजाने लाबुसेंगेसमवेत पाचव्या गडय़ासाठी 114 धावांची भागिदारी केल्याने ऑस्ट्रेलिया अ ला 243 धावांपर्यंत मजल मारता आली. ख्वाजाने 20 चौकारांसह 127 तर लाबुसेंगेने 11 चौकारांसह 60 धावा तसेच हॉलंडने दोन चौकारांसह नाबाद 12 आणि पॅटरसनने 7 चौकारांसह 31 धावा केल्या. ऑस्ट्रेलिया अ संघातील पाच फलंदाजांना खाते उघडता आले नाही. इंडिया अ संघातील मोहम्मद सिराजने 59 धावांत 8 तर कुलदीप यादवने 63 धावांत 2 गडी बाद केले. त्यानंतर इंडिया अ ने पहिल्या डावात 12 षटकांत बिनबाद 41 धावा जमविल्या. समर्थ 10 तर अगरवाल 31 धावांवर खेळत आहेत.

संक्षिप्त धावफलक

ऑस्ट्रेलिया अ प. डाव सर्वबाद 243 (उस्मान ख्वाजा 127, लाबुसेंगे 60, पॅटरसन 31, मोहम्मद सिराज 8/59, कुलदीप यादव 2/63), इंडिया अ प. डाव- 12 षटकांत बिनबाद 41.

Related posts: