|Sunday, April 21, 2019
You are here: Home » क्रिडा » आशियाई स्पर्धेची थाटात सांगता

आशियाई स्पर्धेची थाटात सांगता 

वृत्तसंस्था/ जकार्ता

आकर्षक रंगसंगतीचा लेसर शो, दणाणून सोडणारे संगीत आणि कलाकारांच्या बेधुंद नृत्यासह संततधार पावसात देखील 18 व्या आशियाई क्रीडा स्पर्धेची रविवारी अगदी थाटात सांगता झाली. ऐतिहासिक बंग कर्णो स्टेडियमवर रंगलेल्या या सोहळय़ात कलाकारांनी प्रेक्षकांची खऱया अर्थाने मने जिंकली. जागतिक स्तरावरील दुसरी सर्वात मोठी व आशियातील भव्यदिव्य मानल्या जाणाऱया, 15 दिवस रंगलेल्या बहुविध क्रीडा प्रकारांच्या या स्पर्धेत आशियाई देशांनी सर्वस्व पणाला लावले, खांद्याला खांदा लावून लढले व त्यातून बरीच चुरस रंगत राहिली. रविवारी सांगता सोहळय़ाप्रसंगी मात्र हेच सर्व देश एकसंध झाले आणि सोहळय़ाला चार चाँद लागले.

आशियाई स्पर्धेच्या इतिहासात दुसऱयांदा यजमानपद भूषवत असलेल्या इंडोनेशियाने यंदाची आवृत्तीही दिमाखात यशस्वी करुन दाखवली आणि तोच जोश त्यांनी सांगता सोहळय़ात देखील कायम राखला. थकले-भागलेले 45 देशांचे 10 हजारहून अधिक ऍथलिट्स येथे नव्या उर्जेने सहभागी झाले आणि त्यांचे पथसंचलन विशेष लक्षवेधी ठरले. भारत, चीन व कोरियन कलाकारांनी देखील अनेक परफॉर्मन्समध्ये हिरिरीने पुढाकार घेतला. भारताचा सिद्धार्थ स्लॅथिया, कोरियाचा सुपर ज्युनियर, इंडोनेशियाचे इस्याना सरस्वती, दिरा सुगंदी, रॅन व बंगा सित्रा लेस्तरी या सोहळय़ाचे आकर्षण केंद ठरले.

भारदस्त संगीत अवतरण्यापूर्वी या स्पर्धेत सहभागी झालेल्या विविध देशांच्या ऍथलिट्सनी सर्वप्रथम पथसंचलन केले. आशियाई स्पर्धेच्या पदकतालिकेत अनुक्रमे पहिले व दुसरे स्थान संपादन करणारे चीन व जपानचे पथक दाखल झाले, त्यावेळी चाहत्यांनी जणू अवघे स्टेडियम डोक्यावर घेतले. पदकतालिकेत चौथे स्थान संपादन करणारा इंडोनेशियाचा संघ आला, त्यावेळी देखील टाळय़ांच्या गजरात त्यांचे अभिवादन केले गेले.

भारताचे नेतृत्व रानीकडे

पथसंचलनात भारतीय पथकाचे नेतृत्व महिला हॉकीपटू रानी रामपालकडे सोपवले गेले. यंदा भारताने 15 सुवर्णपदकांसह एकूण 69 पदके जिंकली आणि कोणत्याही आशियाई स्पर्धेतील हा संघाचा सर्वोच्च विक्रमही ठरला.

यापूर्वी, उद्घाटन सोहळय़ात इंडोनेशियाच्या संस्कृतीची झलक सादर केली गेली तर रविवारी रंगलेल्या सांगता सोहळय़ात आशियाई परंपरेवर पूर्णपणे भर दिला गेला. आशियाई राष्ट्रांच्या मजबूत स्नेहसंबंधावर देखील प्रकाशझोत टाकला गेला. शांतता, स्थैर्य, एकसंधपणा व समृद्धीवर भर दिला गेला. एखाद्या आशियाई स्पर्धेत कोरियाने आपला संयुक्त संघ उतरवण्याची देखील यंदा पहिलीच वेळ ठरली. वास्तविक, यंदाची स्पर्धा आयोजित करताना यजमान इंडोनेशियासमोर बरीच आव्हाने होती. अडचणींचा डोंगर होता. पण, या सर्वांवर त्यांनी जिद्दीने मात करत ही स्पर्धा यशस्वी करुन दाखवली. पुढील आशियाई क्रीडा स्पर्धा 2022 साली चीनमध्ये होणार आहे.

Related posts: