|Thursday, July 18, 2019
You are here: Home » आवृत्ती » सांगली » जातीयवाद पसरवा हेच भाजपाचे शेवटचे हत्यार : अशोक चव्हाण

जातीयवाद पसरवा हेच भाजपाचे शेवटचे हत्यार : अशोक चव्हाण 

प्रतिनिधी/ जत

गरीब, रोजगार, दुष्काळ, महागाई, पेट्रोल डिझेलचे दर, अच्छे दिन अशी अनेक गोंडस स्वप्ने विकून देशात आणि राज्यात सत्तेवर आलेल्या भारतीय जनता पार्टीने जनतेच्या स्वप्नांचाच चुराडा करून टाकला आहे. भाजपा सर्वच पातळीवर जनतेच्या मनातून उतरल्याने आता त्यांनी जातीयवाद पसरावा आणि सत्तेत या, हा नवा मनसुबा आखला आहे. 2019 च्या निवडणुकीसाठी जातीयवाद पसरवा हे आता त्यांचे शेवटचे हत्यार असल्याची घणाघाती टीका, काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष खासदार अशोकरव चव्हाण यांनी जत येथे केली. तसेच जत विधानसभेची जागा ही काँग्रेसलाच राहणार असून, विक्रमदादा सावंत यांची उमेदवारी निश्चित्त असल्याचेही त्यांनी जाहीर केले.

काँग्रेसने राज्यभर सुरू केलेल्या जनसंघर्ष यात्रेच्या निमित्ताने जत येथे आयोजित  शेतकरी मेळाव्यात प्रदेशाध्यक्ष चव्हाण बोलत होते. यावेळी विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे-पाटील, माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण, माजी मंत्री हर्षवर्धन पाटील, आ. मोहनशेठ कदम, आ. विश्वजित कदम, आ. बसवराज पाटील, प्रवक्ते सचिन सावंत, महिला आघाडीच्या प्रदेशाध्यक्षा चारूशिला टोकस, शैलजाताई पाटील, नगराध्यक्षा शुभांगी बन्नेनवार, विशाल पाटील, पृथ्वीराज पाटील, माजी आमदार उमाजीराव सनमडीकर, काँग्रेस नेते विक्रमदादा सावंत, आप्पाराया बिराजदार, ज्ञानेश्वर मोहिते, रवी साबळे आदी मान्यवर उपस्थित होते.

खा. चव्हाण म्हणाले, गेल्या चार वर्षात भाजपाने देशात मोठा हैदोस घातला आहे. रोज नवीन कायदे, नवे जीआर काढले. लोकांच्या हिताचा एकही निर्णय या सरकारला घेता आला नाही. देशाची आणि राज्याची मोठी लूट या सरकारने केली आहे. चार साडे चार वर्षात केवळ आश्वासनांची खैरात केली. वास्तविक भाजपा हा देशाला लागलेला मोठा कॅन्सर आहे. पसरण्याआधीच त्याला नष्ट केले पाहिजे.

कारण नसताना नोटाबंदीचा घाट घातला. देशातील दोनशे लोकांचे बळी या नोटबंदीने घेतले. पण, साध्य काहीच झाले नाही. शेतकऱयांच्या कर्जमाफीत घोळ, दोन कोटी तरूणांच्या रोजगाराची घोषणा फसवी गेली. पेट्रोल, डिझेलचे दर गगनाला भिडले. स्वयपाकाचा गॅसही महागला, अत्याचार, जातीयवाद, हिंसा, प्रशासकीय दबाव, मोठय़ा प्रमाणात वाढला आहे.

सरकारची तिजोरी मोकळी

खा. चव्हाण म्हणाले, आता या सरकारला जनतेला द्यायला काहीच नाही. सरकारची तिजोरी कधीच मोकळी झाली आहे. त्यामुळे नव्या घोषणा, गोंडस स्वप्ने ते दाखवत आहेत. जत तालुक्यात आज दुष्काळ मोठा पडला आहे. इथे 22 गावांनी पिण्याच्या पाण्याचे टँकर मागितले. पण, टँकर द्यायला तयार नाहीत.

जातीयवाद आता शेवटचे हत्यार

देशात आणि राज्यात सर्वच पातळीवर सरकार जनतेच्या मनातून उतरले आहे. यामुळे त्यांनी आता नव्याने जातीयवादाचे हत्यार पुढे केले आहे. राज्यात व देशात जातीयवाद पसरवून जनतेच्या भावना भडकावण्याचा डाव आहे. यातून पुन्हा सत्तेचे केंद्र हस्तगत करण्याचे कारस्थान रचले आहे.

भ्रष्ट सरकार उलथवून टाका

राधाकृष्ण विखे-पाटील म्हणाले, भाजपाच्या काळात अनेक मंत्र्यांची भ्रष्ट प्रकरणे चव्हाटय़ावर आली. पण, क्लीन चीट देण्याशिवाय मुख्यमंत्र्यांनी काहीच केले नाही. राज्यात सर्वच पातळीवर सरकार तोंडावर आपटले आहे. शेतकरी संपावर, दुग्ध उत्पादक संपावर जाण्याची महाराष्ट्राच्या इतिहासात पहील्यादांच घटना घडल्या. तेरा हजार शेतकऱयांनी आत्महत्या केल्या, तरी शासन कर्जमाफीचा घोळ संपवत नाही. जतसारख्या भागात डाळिंबावर बिब्ब्या आला, खरीप शंभर टक्के वाया गेला. आजअखेर केवळ 168 मिमी पाऊस झाला पण मदत द्यायला तयार नाही. खरेतर हे सरकार शेतकऱयांचे नसून अदानी, अंबानी यासारख्या भांडवलदारांचे आहे.

…तर हुकूमशाही येणार : पृथ्वीराजबाबा

माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण म्हणाले, 2019 ला राज्यात भाजपा सत्तेवर येण्याची कसलीच शक्यता नाही. परंतु दुर्दैवाने ती जिंकलीच तर हुकूमशाहीची राजवट इथे आल्याशिवाय राहणार नाही. कारण अनेक जाचक कायदे, नियम करून या सरकारने राज्यात हैदोस घातला आहे. शेतीमालाचा हमी कायदा प्रकाशित करण्याऐवजी तो दडपला जातोय. शिवाय या सरकारच्या काळात शेतमालाचे उत्पादन दहा टक्यांनी घटले आहे. 66 हजार कोटींच्या समृध्दी महामार्गात घोळ असल्याचे सांगून जमिनी प्लॅनिंग करून अधिकाऱयांनी विकत घेतल्या. राज्यात भ्रष्टाचाराची सीमा उरली नसल्याचेही चव्हाण यांनी स्पष्ट केले.

जतची जागा काँग्रेस लढणारच : विश्वजित कदम

राज्यात आघाडी होवो अगर ना होवो जतची जागा काँग्रेस लढणारच आहे. त्यामुळे कार्यकर्त्यांनी कामाला लागावे असे आवाहन युवकचे प्रदेशाध्यक्ष तथा आमदार विश्वजित कदम यांनी केले. डॉ. कदम म्हणाले, काँग्रेस आणि जत तालुक्याचा ऋणानुबंध मोठा आहे. स्वर्गीय डॉ. पतंगराव कदम यांनी जतवर नेहमीच प्रेम केले होते. त्याच ताकदीने त्यांच्या पश्चात आम्ही तुमच्या पाठीशी राहू. जत तालुक्याला बकाल दिवस आणणाऱयांचा आणि गुंडगिरीचे राजकारण करणाऱयांना येणाऱया निवडणुकीत धडा शिकवा.

जत तालुका नेटाने उभा करतो : सावंत

विक्रम सावंत म्हणाले, जत तालुका हा काँग्रेसच्या विचारावर प्रेम करणारा तालुका आहे. या तालुक्यात मागच्या दहा वर्षात पक्षाची पडझड झाली, पण तरीही सगळय़ा कार्यकर्त्यांनी मोठी ताकद लावली आहे. यापुढच्या काळात जतेचे सगळे प्रश्न निकाली काढताना नेत्यांनी फक्त ताकद दय़ावी. जिल्हय़ात जतची काँग्रेस नेटांनी उभी करण्याची ग्वाही देतो असे सावंत यांनी स्पष्ट केले.

यावेळी माजी मंत्री हर्षवर्धन पाटील, आ. सतेज तथा बंटी पाटील, आ. बसवराज पाटील यांनीही मनोगत व्यक्त केले. प्रास्ताविक तालुका अध्यक्ष आप्पाराया बिराजदार यांनी केले. यावेळी पी. एम. पाटील, आकाराम मासाळ, बाबासाहेब कोडग, सुजय शिंदे, निलेश बामणे, युवराज निकम, संतोष पाटील, कुंडलीक दुधाळ, महादेव पाटील, महादेव अंकलगी, इकबाल गवंडी, अशोक बन्नेनवार, पिराप्पा माळी, नाथा पाटील, रवींद्र सावंत, आप्पा मासाळ यांच्यासह पदाधिकारी उपस्थित होते. आभार सुजयनाना शिंदे यांनी मानले.

विक्रमदादा सावंत हेच आघाडीचे उमेदवार

जनसंघर्ष यात्रेच्या प्रारंभीचे भाषण करताना आ. बंटी पाटील यांनी विक्रमदादा  सावंत यांनी पडत्या काळात काँग्रेसचे केलेले नेतृत्व आणि केलेल्या कामाचे कौतुक करीत पक्षश्रेष्ठींना त्यांना उमेदवारी देण्याची मागणी केली. याच मागणीचा धागा विश्वजित कदम, हर्षवर्धन पाटील, आ. बसवराज पाटील, राधाकृष्ण विखेपाटील यांनी पकडला. यावर प्रदेशाध्यक्ष अशोकराव चव्हाण यांनी जतच्या जागेची काळजी नको, आता विक्रम सावंतांना मोठय़ा फरकांनी विजयी करण्याचे आवाहन केले.

कर्नाटकची योजना पूर्ण करू : खा. चव्हाण

जत पूर्व भागाला कर्नाटकातून पाणी आणण्याचे स्वप्न डॉ. पतंगराव कदम, विक्रमदादा सावंत यांनी पाहिले. ही योजना नक्कीच योग्य आहे. आता तर कर्नाटकात काँग्रेसची सत्ता आहे. त्यामुळे पूर्व भागातील 68 गावांना पाणी देण्याचे काम आम्ही करू. आम्ही राज्यातील जनतेच्या प्रश्नांसोबत आहोत, यात कुठेही कमी पडणार नाही.