|Thursday, July 18, 2019
You are here: Home » आवृत्ती » सातारा » साताऱयात जुनी इमारत कोसळली

साताऱयात जुनी इमारत कोसळली 

प्रतिनिधी/ सातारा

येथील प्रतापगंज पेठेतील जीर्ण अवस्थेत झालेल्या इमारतीची पाठीमागील भिंत दुपारी अडीच वाजण्याच्या सुमारास कोसळल्याची घटना घडली. भिंत कोसळतानाचा आवाज पाहून परिसरात राहणाऱया नागरिकांच्या पोटात भितीने गोळाच आला. सुर्दैवाने घरात कोणीही दुपारी नसल्याने जीवितहानी टळल्याचे नागरिक सांगतात. या घरात हॉटेल महेंद्रचे जुने मालक महेंद्र सुळके हे भाडय़ाने राहतात, तर मुळ मालक प्रसाद आगटे यांनी ही इमारत खाली करण्याबाबत सातारा पालिकेने दरवर्षी नोटीस बजावल्याचे सांगितले.

सातारा शहरात जुन्या इमारती अजूनही दिमाखदार आहेत. मात्र, काही इमारतीमध्ये भाडेकरु आणि मुळ मालक यांच्यामध्ये वादंग सुरु आहे. प्रतापगंज पेठेतील गोराराम मंदिराला लागूनच प्रसाद आगटे यांची जुनी इमारत आहे. त्या इमारतीतील वरच्या आणि खालच्या खोल्या या 1986 साली कराराने जुने महेंद्र हॉटेलचे मालक महेंद्र सुळके यांना भाडय़ाने दिले. दरम्यान, अजूनही ते त्याच खोलीत कुटुंबीयासह राहतात. सातारा नगरपालिकेनेही इमारत धोकादायक आहे, अशा आशयाची नोटीस बजावल्या होत्या. तरीही ते घर खाली करत नव्हते. दरम्यान, त्याच्याच लगत असलेल्या दुसऱया खोलीतील भाडेकरुचे घर नुकतेच दोन महिन्यापूर्वी खाली केले. आज दुपारी अडीच वाजण्याच्या सुमारास याच इमारतीची पाठीमागील भिंत बघता बघता कोसळली. या भिंतीचा आवाज मोठा झाला. त्यांच्या किचनमध्ये सुदैवाने कोणीही नव्हते. किचनमध्ये भांडय़ाचे नुकसान झाले असण्याची शक्यता मुळ मालक प्रसाद आगटे यांनी व्यक्त केली. दरम्यान, या घटनेची नोंद सातारा पालिकेत वा पोलिसांत सायंकाळी झाली नव्हती.

उदयनराजेंच्या कार्यकर्त्यांकडून गावबोभाटा

सातारा शहरात समस्या असो वा काहीही कारण कोणताही नागरिक तोंडातून साधा ब्र शब्द काढत नाहीत. मात्र, गोराराम मंदिराच्या बाजूला असलेल्या जुन्या इमारतीची भिंत पडल्याची घटनेची माहिती मीडियाच्या प्रतिनिधींना स्वतः फोन करुन खासदार उदयनराजेंच्या कार्यकर्त्यांने सांगत गावबोभाटा केला. त्याच इमारतीच्या पाठीमागे नव्याने एक इमारतीचे बांधकाम सुरु आहे. त्या इमारतीचे अर्धवट बांधकाम रखडले गेले आहे, जागेचा वाद असण्याची शक्यता तेथील नागरिकांनी वर्तवली गेली.