|Thursday, July 18, 2019
You are here: Home » आवृत्ती » गोवा » आपत्कालिन नियंत्रण कक्षातील कर्मचारी भत्त्याच्या प्रतीक्षेत

आपत्कालिन नियंत्रण कक्षातील कर्मचारी भत्त्याच्या प्रतीक्षेत 

प्रतिनिधी/ काणकोण

राष्ट्रीय आपत्कालिन सेवेच्या अंतर्गत काणकोणच्या मामलेदार कार्यालयातील नियंत्रण कक्षात काम करणाऱया कर्मचाऱयांना मागच्या सात वर्षांपासून देय असलेला अतिरिक्त भत्ता अद्याप देण्यात आलेला नसून केंद्र सरकारने मंजूर केलेली ही रक्कम नेमकी कुठे जाते हा संशोधनाचा विषय बनलेला आहे.

पावसाळय़ाच्या हंगामात जून ते सप्टेंबरपर्यंत चार महिन्यांसाठी तालुक्यातील विविध सरकारी खात्यांतील कर्मचाऱयांची नियंत्रण कक्षात नेमणूक केली जाते. एक चालक आणि दोन अन्य कर्मचारी मिळून रात्री 9 ते सकाळी 6 पर्यंत सदर कक्षात आपली जबाबदारी सांभाळत असतात. त्यासाठी आपत्कालिन यंत्रणेच्या अंतर्गत प्रत्येक कर्मचाऱयाच्या पदानुसार निधी मंजूर केला जातो. मात्र मिळालेल्या माहितीनुसार, 2011 पासून या कक्षात काम करणाऱया कर्मचाऱयांना अतिरिक्त भत्ता देण्यात आलेला नाही.

नियंत्रण कक्षात काम केल्यानंतर सदर कर्मचाऱयांना एक दिवस आठवडय़ाची रजा मंजूर केली जात असली, तरी या खास कामासाठी सरकार जी रक्कम मंजूर करते ती मात्र मागच्या कित्येक वर्षांपासून या कर्मचाऱयांना देण्यात आलेली नाही. यासंबंधी संबंधित खात्याकडे चौकशी केली असता सर्व कर्मचाऱयांची बिले तयार करून जिल्हाधिकारी कार्यालयाच्या लेखा विभागाकडे पाठविण्यात आली असल्याची माहिती मिळाली. मात्र मागच्या सात वर्षांपासून ज्यावेळी या कक्षात काम करणाऱया कर्मचाऱयांना देय असलेली रक्कम मिळत नाही तेव्हा जे अधिकारी या कर्मचाऱयांची नियुक्ती करतात ते आपली जबाबदारी नीट पार पाडत नसल्याचे स्पष्ट होत अशा स्वरूपाच्या प्रतिक्रिया यासंदर्भात उमटू लागल्या आहेत. याशिवाय निवडणूक प्रक्रियेसाठी ज्या कर्मचाऱयांची नेमणूक केली जाते त्यातील कित्येक जणांनाही अद्याप निवडणूक भत्ता देण्यात आलेला नाही.