|Thursday, July 18, 2019
You are here: Home » आवृत्ती » गोवा » बीच शॅक परवाना नूतनीकरण चतुर्थीनंतर

बीच शॅक परवाना नूतनीकरण चतुर्थीनंतर 

 

प्रतिनिधी/ पणजी

ऑक्टोबर-नोव्हेंबरमध्ये सुरु होणाऱया पर्यटन हंगामाची तयारी पर्यटन खात्याने सुरु केली आहे. बीचवरील शॅकच्या परवाना नूतनीकरणाची प्रक्रिया चतुर्थीनंतर सुरु होणार आहे. शॅकच्या परवाना नूतनीकरणासाठी पर्यटन खात्याकडे अर्ज यायला सुरुवात झाली आहे. त्यामुळे साधारणपणे सप्टेंबरच्या शेवटच्या आठवडय़ात शॅकसाठी किनारी भागात आखणी सुरु होणार आहे.

पर्यटन व्यवसायाच्या दृष्टीने शॅक व्यवसाय महत्त्वाचा मानला जातो. त्यामुळे शॅक व्यवसायिकांनी आता शॅक परवाना नूतनीकरणाची प्रक्रिया सुरु केली आहे. परवाना नूतनीकरण करून शॅकच्या उभारणीचे काम लवकर हाती घेण्यासाठी शॅक व्यावसायिक तयारी करीत आहेत, मात्र सध्या राज्यात पावसाळा सुरु आहे. त्यामुळे हवामान सर्वसाधारण होण्याची वाट पर्यटन खाते पाहत आहे. हवामान साधारण झाल्याशिवाय बीचवर शॅकसाठी जागा निश्चित करण्याचे काम हाती घेता येत नाही.

पर्यटन खात्याच्या बीच शॅक धोरणानुसार शॅक परवाना तीन वर्षासाठी दिलेला असतो, मात्र दरवर्षी शॅकधारकांना मे अखेरपर्यंत किंवा 10 जूनपर्यंत शॅक हटवावा लागतो. त्यामुळे नवीन शॅक उभारणीसाठी परवाना नूतनीकरण करणे आवश्यक असते. ही प्रक्रिया पूर्ण केल्याशिवाय शॅक उभारता येत नाही. याअगोदर या प्रक्रियेला उशीर झाल्याने काही शॅकधारकांना हंगाम सुरु होऊन महिना, दीड महिना उलटल्यानंतर शॅक उभारणी करावी लागली होती.

ऑक्टोबर महिन्यातच राज्यात विदेशी पर्यटक यायला सुरुवात होते. पहिले चार्टर विमान ऑक्टोबरच्या पहिल्या दुसऱया आठवडय़ात दाखल होते. विदेशी पर्यटक गोव्यात आल्यानंतर किनारी भागात धाव घेतात. त्यामुळे शक्य तितक्या लवकर शॅक उभारणीसाठी व्यावसायिक प्रयत्न करतात. शॅक व्यावसायिकांनी या संदर्भात पर्यटन संचालकांची भेट घेऊन शॅकसाठी लवकर जागा निश्चित करण्याची विनंतीही केली आहे. जेणेकरुन शॅक उभारणीचे काम लवकर हाती घेणे शक्य होणार आहे. सप्टेंबरच्या तिसऱया आठवडय़ात परवाना नूतनीकरणाचे काम सुरु होण्याची शक्यता आहे.

सर्व शॅकमध्ये सीसीटीव्ही कॅमेरा

बीचवरील जागा निश्चित करण्याचे काम लवकर हाती घेण्यात येणार आहे. जागा निश्चितीसाठी साधारणपणे 10 ते 15 दिवस लागतात. शॅक उभारल्यानंतर प्रत्येक शॅकमध्ये सीसीटीव्ही कॅमेरा बसविला जाणार आहे. त्याचबरोबर बीचवर प्रवेश करण्याच्या भागातही पर्यटन खाते सीसीटीव्ही कॅमेरा बसविणार आहे. तसेच हायमास्ट दिवेही बीचवर लावण्यात येणार आहेत.