|Friday, July 19, 2019
You are here: Home » आवृत्ती » गोवा » पेपर तपासणी चुकांबाबत आता शिक्षकांना दंड

पेपर तपासणी चुकांबाबत आता शिक्षकांना दंड 

प्रतिनिधी/ पणजी

दहावी-बारावी परीक्षेनंतर निकाल झाल्यावर मोठय़ा संख्येने फेरतपासणी किंवा पुनर्मूल्यांकनासाठी येणाऱया वाढत्या अर्जांची गंभीर दखल गोवा माध्यमिक उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाने (गोवा बोर्ड) घेतली असून चूक करणाऱया शिक्षकांवर दंडात्मक कारवाई करण्याचा निर्णय घेतला आहे. 2018-19 या चालू शैक्षणिक वर्षापासून त्याची कार्यवाही करण्याचे मंडळाने ठरविले आहे.

प्रश्नपत्रिका निश्चित करताना त्यात कोणत्याही प्रकारची चूक झाल्यास संबंधित शिक्षकांच्या मानधनातील 10 टक्के रक्कम कापण्यात येणार आहे. प्रुफरिडिंग, भाषांतर व प्रश्नपत्रिका अंतिम केल्यानंतर त्यात कोणतीही चूक आढळल्यास किंवा तशा तक्रारी आल्यासही 10 टक्के मानधनात कपात होणार आहे. प्रत्यक्ष परीक्षा चालू असताना तर कोणत्याही प्रकारची चूक समोर आली तर प्रत्येक चुकीसाठी रु. 50 एवढी रक्कम मानधनातून वजा होणार आहे.

उत्तरपत्रिका तपासल्यानंतर त्यात फेरतपासणीत पुनर्मूल्यांकन व इतर छाननीत कोणत्याही प्रकारची चूक झाल्यास प्रत्येक चुकीमागे रु. 70 ते रु. 100 एवढी मानधनातून कपात होणार आहे. मंडळातर्फे सर्व शाळा प्रमुखांना हे निर्देश एका परिपत्रकामार्फत कळवण्यात आले असून सर्व शिक्षकांनी त्याची दखल घ्यावी असे मंडळाने सूचवले आहे.

मोठय़ा चुकीबद्दल चौकशी करुन कारवाई

प्रश्नपत्रिकेत, उत्तरपत्रिकेत किंवा एकंदरीत परीक्षा प्रक्रियेत मोठी महत्त्वाची चूक आढळल्यास आणि त्यास शिक्षक जबाबदार ठरल्यास कारवाईचे अधिकार कार्यकारी समितीला देण्यात आले आहेत. मंडळाची कार्यकारी समिती त्याची चौकशी करून कारवाई निश्चित करणार असल्याचे सांगण्यात आले.

चुका करणाऱया शिक्षकावर कारवाई करण्याचा नियम गेल्या अनेक वर्षापासून अस्तित्त्वात आहे, परंतु मंडळाने त्याचा वापर आतापर्यंत कधीच केला नाही. शेवटी उशिरा का होईना मंडळाने तो नियम अंमलात आणण्याचा निर्णय घेतला आहे.

परीक्षेनंतर विद्यार्थी, पालक अनेक चुका शोधून काढतात आणि मंडळाकडे तक्रारी करतात. अभ्यासक्रमाबाहेरील प्रश्नाच्याही तक्रारी येतात. तसेच निकालानंतर फेरतपासणीसाठी अनेक अर्ज येतात आणि काहींचे गुण वाढतात हे सर्व निदर्शनास आल्यामुळे आता दंडात्मक कारवाईचा निर्णय मंडळाने घेतला आहे.