|Saturday, July 20, 2019
You are here: Home » आवृत्ती » गोवा » राज्य सहकारी बँक आमसभेत गोंधळ

राज्य सहकारी बँक आमसभेत गोंधळ 

प्रतिनिधी/ पणजी

गोवा राज्य सहकारी बॅंकेच्या काल रविवारी झालेल्या 55 व्या आमसभेत ऑडीटर, प्रशासक आणि भागधारक यांच्यात संघर्ष झाल्याने बराच गोंधळ माजला. ऑडिटर आणि प्रशासकांनी एकमेकांवर आरोप, प्रत्यारोप केले तर संचालक मंडळाची निवडणूक घेण्याची मागणी भागधारकांनी केली. तसेच 2017-18 चा वार्षिक ताळेबंद (बॅलन्सशीट) पुन्हा नव्याने करण्यात यावा असेही भागधारकांनी सुचवले आणि आमसभेने त्यास मान्यता दिली.

पाटो-पणजी येथील सहकार संकुल येथे राज्य सहकारी बँकेची आमसभा बोलावण्यात आली होती. त्यावेळी प्रशासक व्ही. बी. प्रभू वेर्लेकर, ऑडिटर व्यंकटेश शेणॉय उपस्थित होते. शेणॉय यांनी 2017-18 या वर्षाचा ताळेबंद सभेसमोर ठेवला आणि बँकेला नफा झाला नसून तोटा झाल्याचे स्पष्ट केले. परंतु प्रशासक वेर्लेकर यांनी मात्र बँकेला 2017-18 या वर्षात रु. 19 कोटीच नफा झाल्याचा दावा केला. परंतु तो दावा शेणॉय यांनी खोडून काढला. आपली नेमणूक भागधारकांनी केली असून बँकेची सत्य परिस्थिती त्यांच्यासमोर ठेवल्याचे शेणॉय म्हणाले.

ऑडिटरकडून चुकीचा ताळेबंद : वेर्लेकर

बँकेला नफा झालेला असताना ऑडिटर चुकीचा ताळेबंद सादर करीत असल्याचे श्री. वेर्लेकर यांनी सांगितले. त्यावरून ऑडिटर प्रशासक यांच्यातील संघर्ष भागधारकांसमोर उघडा पडला. प्रशासकांची मुदत संपण्याच्या मार्गावर असल्याने संचालक मंडळासाठी तातडीने निवडणुका घेण्याची मागणी भागधारकांनी केली. बँक पुन्हा एकदा नवनियुक्त संचालक मंडळांच्या ताब्यात देण्यात यावी असे भागधारकांनी सुचवले.

पुन्हा आमसभा घेण्याची मागणी

प्रशासक त्यांच्या कारकिर्दीत नफा झाल्याचे दाखवत असल्याची टीका काही भागधारकांनी केली. या गोंधळामुळे पुन्हा एकदा आमसभा घेण्याची मागणी करून ही आमसभा स्थगित करण्यात आली. तसेच बँक पुन्हा मार्गावर आणण्यास प्रशासक अपयशी ठरल्याचा आरोपही भागधारकांनी आमसभेतून केला.