|Friday, July 19, 2019
You are here: Home » संपादकिय / अग्रलेख » माणुसकीच्या गहिवराचे व्यवस्थापन व्हावे

माणुसकीच्या गहिवराचे व्यवस्थापन व्हावे 

केरळातील पूरग्रस्तांच्या मदतीला महाराष्ट्र धावणे हे आश्चर्य नव्हे. आपत्तीचे चटके सहन केलेली मुंबई नेहमीच आपत्तीग्रस्तांच्या मदतीसाठी अग्रस्थानी असते. आरोग्य सहाय्य, औषध पुरवठा, कपडे, धान्य मदत मुंबईकडून बऱयापैकी झाली. केरळ राज्य सरकारकडून 50 हजार ते लाखभर रुग्णांना मदतीची अपेक्षा राज्य सरकारकडे केली होती. महाराष्ट्राने तर त्याहूनही पुढे जाऊन माणुसकी दाखवली. मात्र, या माणुसकीच्या गहीवराचे व्यवस्थापन योग्यरित्या व्हावे अशीच पूरग्रस्तांची आणि मदत करणाऱयांची अपेक्षा असते… 

 

मधले गोवा राज्य ओलांडले की, चिंचोळ्या आकाराचे केरळ लागते. मुंबईत केरळीय समाज बऱयापैकी आहे. आताही  तेथील आपद्ग्रस्तांच्या मदतीसाठी गेलेल्या मुंबईकरांना मुंबईतील आठवणी सांगणारे पूरग्रस्त केरळीय बांधव आढळलेच. भाषेचा अडसर सोडल्यास केरळच्या मदतकार्यात मुंबईकरांना कोणताही अडथळा आला नाही. राज्य सरकारची तर मदत झालीच. पण मुंबईतील सामाजिक संघटना, देवस्थाने, डबेवाले मदतीसाठी सरसावलेले दिसून आले. ही मदत केरळपर्यंत पोहचती करत आहेत. केरळमधील सर्व जिह्यांमध्ये पूरग्रस्त स्थिती नाही. पूर नसलेल्या केरळमधील जिह्यांमधूनही पूरग्रस्तांना मदत झाली आहे. बेघर आणि क्षतिग्रस्तांचीच संख्या लाखांवर आहे. क्षतिग्रस्तांना मदतीसाठी देशातील विविध भागातून मदत होत आहे. हा सगळा माणुसकीचा गहिवर आहे. मात्र, या गहिवराचे व्यवस्थापन योग्य प्रकारे होणे गरजेचे आहे. त्यामुळेच ग्रस्त भागातील नेमकी गरज लक्षात घेणे महत्त्वाचे आहे. भारताने यापूर्वी भूज येथील भूकंप पा†िहला. त्याचवेळी महाराष्ट्रातील किल्लारीचीही वेगळी आठवण आहे. तसेच, बॉम्बस्फोटांचेही अनुभव आहेत. तर उत्तरेकडील ढगफुटीचे प्रत्यंतरातून गावेच्या गावे वाहून जातात. अशा ठिकाणी मदत कार्य सुरू होते. यावेळी सरकार, खासगी, सामाजिक संघटनांकडून मदतीचा ओघ सुरु होतो. मात्र, प्रभावित भागात औषधे, आवश्यक वस्तू पोहचणे अतिशय महत्त्वाचे ठरते. ही मदत योग्य लाभार्थ्यांपर्यंत पोहोचणेदेखील महत्त्वाचे आहे. माणुसकीच्या दृष्टीने सर्वच मदत करण्यास तत्पर होत असतात. त्यातून बऱयाचशा त्याच-त्याच वस्तू देण्यात येतात किंवा एखाद्या वस्तूंचा पुरवठा एखाद्या विशिष्ट भागातच होतो. दुसऱया क्षतिग्रस्त भागात एखादी वस्तू पोचतच नाही, असे अनुभव गेल्या आपत्कालीन घटनांमधून समोर आले आहेत. भूजच्या वेळी ग्लुकोज बिस्किटांचा पुरवठा एवढय़ा मोठय़ा प्रमाणात झाला होता की, त्यावेळी भूकंपग्रस्त नाग†िरक, मदतीसाठी गेलेले डॉक्टर आणि कुत्रेदेखील हीच बिस्किटे खात होते. या बिस्किट चवीचा एवढा वीट आला होता की, त्या उपरांत बिस्किटांचे पुडे पा†िहले तरी पोटात ढवळून निघत असल्याचा अनुभव त्यावेळी मदत कार्यासाठी भूजला गेलेले सांगतात.

आपत्तीग्रस्त भागात दुसरी सतत होणारी घटना म्हणजे मदत म्हणून आणलेल्या वस्तू एखादे विमानतळ किंवा रेल्वे स्थानकात उतरवल्या जातात. ही ठिकाणे प्रत्यक्षात क्षतिग्रस्त भागापासून दूर असतात. मग अशा ठिकाणी उतरलेल्या विमानतळाच्या किंवा रेल्वे स्थानकांच्या जवळील प्रभावित भागातच औषधे किंवा मदत पुरवठा प्रथम केला जातो किंवा जवळचे ठिकाण असल्याने ही मदत अधिक हिरिरीने केली जाते, असा यापूर्वीच्या आपत्कालीन स्थितीतील मदतकार्यातून आलेला अनुभव मदतकार्य करणारे सांगतात. आपत्कालीन स्थितीत मदतीचे व्यवस्थापन कटाक्षाने करण्याचे आव्हानच असते. अष्टावधानी सरकारी व्यवस्थापन अधिकाऱयाकडून देखील मदत कमी-जास्त प्रमाणात होऊ शकते. कारण सगळ्याच दळणवळण साधनांचा वापर आपत्तीग्रस्त भागात प्रभावीपणे होऊ शकेल असे नाही. सध्याच्या केरळमधील आपत्तीला केरळ एकटा लढत नसून संपूर्ण देशच त्यासोबत आहे. निपाहसारख्या विषाणूचा प्रसार झाल्यावर केरळसारख्या राज्याने स्वबळाने विषाणूवर नियंत्रण मिळवले. यातून येथील आरोग्य सेवांमधील तत्परतेची कल्पना आपण करू शकतो.

केरळ येथील पूरस्थितीनंतर पूरग्रस्तांना पैशाची किंवा वस्तूची गरज नसून मनुष्यबळाची गरज असल्याचा संदेश फिरत होता. आपत्तीमध्ये एखादा भाग संपूर्णपणे उद्ध्वस्त होतो. लोकांचे जीवनमान रुळेपर्यंत मोठा काळ व्यतित व्हावा लागतो. जीवनमान रुळावर आणण्याचे आव्हानच असते. केरळमध्ये गेल्यावर कित्येक आश्रय ठिकाणांना दवाखान्यांमध्ये रूपांतर करावे लागले असल्याचा अनुभव डॉक्टर सांगतात. जमिनीवरील चिखल, ओल तर वातावरणातील दमटपणा घालवण्यासाठी तसेच इतरही सोयी निर्माण करण्यासाठी मनुष्यबळाची आवश्यकता असते. बऱयाच वेळा आपत्तीग्रस्तांना मदतीसाठी मोठय़ा संख्येने इच्छुक तयार असतात. अशा ठिकाणी मदतीसाठी जाताना मात्र स्वतःच्याही आरोग्याचा विचार करणे क्रमप्राप्त आहे. अन्यथा आपत्तीग्रस्तांऐवजी मदतकार्यात सहभागी होणाऱयाला मदतीची गरज लागण्याची वेळ येते. डॉक्टरांचेही आरोग्य आणि कल पाहूनच अशा ठिकाणी पाठवले जाते. शहरांमध्ये मदतीसाठी प्रचारफेऱया काढणे आणि प्रत्यक्षात घटनास्थळी मदतीसाठी धाव घेणे या दोन वेगवेगळ्या बाबी आहेत. मात्र, महाराष्ट्राकडून केरळला सुदृढ 100 डॉक्टरांची टिम मदत करून आली. त्यांचे अनुभव सांगितले. केरळमध्येही डॉक्टर्स आणि इतर वैद्यकीय सहकाऱयांची संख्या बऱयापैकी आहे. मुंबईतील डॉक्टरांच्या जाण्याने कमी वेळात अधिक रुग्णांचे आरोग्य सांभाळणे शक्य झाले असल्याचे केरळचा आरोग्य विभाग म्हणतो. राज्याकडून 40 लाखांची ऍन्टी फंगल, रक्तदाब, किडनी विकारावरील औषधे हृदयविकाराची औषधे देण्यात आली. मात्र, तरीही येथील परिसराचा विचार करता औषधांची गरज वाढती असल्याचा अंदाज व्यक्त करण्यात येत आहे. कारण साथीच्या आजारांमध्ये लेप्टो, कॉलरा, मलेरिया, डेंग्यू, टायफॉईड हे विकार उद्भवू शकतात. त्यात अस्वच्छ पाण्यामुळे जलजन्य आजाराचा संसर्ग पसरू शकतो. अशा आपत्ती घडून आल्यास मदत आवश्यक आहेच. तरीही अशा ठिकाणी योग्य वेळी योग्य मदत पोहचत आहे का याचे व्यवस्थापन करणे आपत्ती व्यवस्थापनाचा अत्यंत महत्त्वाचा भाग आहे.

राम खांदारे