|Friday, April 19, 2019
You are here: Home » संपादकिय / अग्रलेख » लवती पांपण्या न सोसती आम्हां

लवती पांपण्या न सोसती आम्हां 

गोपी गीताचा भावानुवाद करताना नामदेवराय पुढे म्हणतात- गायी घेवोनियां जासी जेव्हां राना । आमुचिया मना दु:ख वाटे ।। सुकुमार सांवळीं जैसीं रातोत्पळें ।  त्याहूनि कोंवळे पाय तुझे ।। खडे कांटे बहू कठिण तृण मुळें ।  ठेवीसी पाउलें तयावरी ।। पावतोसी क्लेश अगा वासुदेवा ।  म्हणोनियां जीवा दु:ख वाटे।। सांगतसों आम्ही नित्य यशोदेसी ।  धाडूं नको यासी वनामघ्यें ।। नामा म्हणे होय सकळांचा उद्धार।  म्हणोनी श्रीधर वना जाय ।। गोपी म्हणतात-हे श्रीकृष्णा, तू ज्यावेळी गायी वनामध्ये घेऊन जात होतास, त्यावेळी आमच्या मनाला अतिशय वेदना होतात. तू स्वतः सावळा सुकुमार आहेस. रक्त कमळापेक्षाही तुझे चरणकमल अतिशय कोमल आहेत. रानावनातून चालताना तुला खडे टोचत असतील, काटे बोचत असतील, कठीण तृणांची मुळे लागत असतील, तू त्यांच्यावर पाय देऊन चालतोस. हे पाहून हे वासुदेवा! आम्हाला त्रास होतो आणि जीवाला भारी दु:ख होते. आम्ही यशोदेला नेहमीच सांगत असतो की, या सुकुमार कृष्णाला वनामध्ये पाठवत जाऊ नकोस. नामदेवराय म्हणतात- कृष्णाला तर सर्वांचा उद्धार करायचा होता म्हणून तो वनामध्ये जात होता.

तुज वांचोनियां वैकुंठनायका ।  आम्हांसी घटिका युग होय ।। अस्तमान होतां येसी तूं गोकुळीं ।  मुखावरी धुळी गोरजांची ।। कुरळ हे केंश सुंदर नासिक । पाहोनियां सुख फार होये ।। लवती पांपण्या न सोसती आम्हां । अहिर्निशी नामा हेंचि गाय ।।

गौळणी कृष्णाला म्हणतात-तुझ्याशिवाय आम्हाला एक घटकाही युगाएवढी वाटते. तू सायंकाळच्या वेळी वनातून गोकुळात येतोस. तुझ्या मुखावर गायींना चारावयास नेल्यामुळे धुळ उडालेली असते. तुझे कुरळे केस आणि सरळ नाक पाहून आम्हाला फार आनंद होतो. पापण्यांचे लवणेही आम्हाला सहन होत नाही. कारण या लवण्यामुळे तुझ्या दर्शनात विघ्न येते असे आम्हाला वाटते. नामदेवराय म्हणतात- रात्रंदिवस तुझ्या या रूपाचे वर्णन गात राहीन. टाकियेलें आम्हीं पतिबंधुसूतां ।  आलोंत अच्युता तुजपाशीं।। आमुची ही इच्छा करिशील पूर्ण ।  आहेसी कठीण ठावें नाहीं।। घालोनियां कूपीं कापियेला दोरा ।  साधियेलें वैरा आपुलिया ।।

वरोनियां टाकी मोठासा पर्वत ।  म्हणती समस्त नामा म्हणे ।। गोपी कृष्णाला म्हणतात-हे कृष्णा! आम्ही आपले पती, बंधू व मुले यांचा त्याग करून तुझ्याकडे आलो आहोत. तू आमची मनोकामना पूर्ण करशील असे वाटत होते. परंतु तू इतक्मया कठोर मनाचा आहेस हे आम्हाला माहीत नाही. एखाद्याला विहिरीत ढकलावे आणि विहिरीचा दोर कापून घेतला असता त्याची जशी अवस्था होते तशी आमची स्थिती झाली आहे. परंतु तू मात्र वैर साधलेस. आता वरून एखादा मोठा पर्वत टाक म्हणजे आमची या दु:खातून सुटका तरी होईल. नामदेवराय गोपींच्या मनातील व्याकुळतेचे वर्णन असे करतात.

Ad. देवदत्त परुळेकर

Related posts: