|Monday, July 22, 2019
You are here: Home » उद्योग » सलग चौथ्या सत्रात बाजारात घसरण

सलग चौथ्या सत्रात बाजारात घसरण 

सेन्सेक्स 333 अंकाने कमजोर : उत्पादन पीएमआयचा फटका

वृत्तसंस्था/ मुंबई

भांडवली बाजार सलग चौथ्या सत्रात घसरत बंद झाला. रुपयाचे अवमूल्यन, कच्च्या तेलाच्या वाढत्या किमती आणि आंतरराष्ट्रीय व्यापार युद्धाने सेन्सेक्स 333 अंकाने घसरत बंद झाला. एफएमसीजी, रिअल्टी, ऊर्जा आणि बँक समभागात विक्री झाल्याने सेन्सेक्स कमजोर झाला.

डॉलरच्या तुलनेत रुपयाने 71.21 पर्यंतचा सार्वकालिक निचांक गाठल्याने गुंतवणूकदारांमध्ये दबाव दिसून आला. याव्यतिरिक्त ऑगस्टमध्ये सलग दुसऱया महिन्यात उत्पादन क्षेत्रात घसरण झाल्याचे समजते. शुक्रवारी सरकारने जाहीर केलेल्या आकडेवारीनुसार, जून तिमाहीतील विकास दर 8.2 टक्क्यांवर पोहोचला होता. यामुळे बाजारात तेजी येण्याची अपेक्षा होती. मात्र कमजोर रुपयामुळे बाजार घसरला. चालू आठवडय़ात अमेरिका चीनवर आयात शुल्क आकारणार असल्याने गुंतवणूकदारांचे लक्ष त्याकडे आहे.

जून तिमाहीचा चांगला विकास दर असूनही सुरूवातीला आलेली तेजी कायम ठेवण्यास अपयश आले. कच्च्या तेलाच्या किमती आणि नफा कमाई वाढल्याने गुंतवणूकदारांकडून विक्री करण्यात आली. उभरत्या बाजारातील कमजोर चलन आणि सध्याच्या आंतरराष्ट्रीय घडामोडींकडे गुंतवणूदारांचे लक्ष आहे, असे गिओजित फायनान्शियल सर्व्हिसेसचे प्रमुख संशोधक विनोद नायर यांनी सांगितले.

सत्राच्या प्रारंभी जीडीपी आकडेवारी आणि रुपयातील तेजीने सेन्सेक्स 289 अंकाने मजबूत होत इन्ट्राडेसाठीचा 38,934 हा सार्वकालिक उच्चांक गाठला होता. उत्पादन पीएमआय ऑगस्टमध्ये घसरल्याने बाजारात विक्रीचे वर्चस्व आले. सेन्सेक्स 332 अंकाने अथवा 0.86 टक्क्यांनी घसरत 38,312 वर बंद झाला. एनएसईचा निफ्टी 98 अंकाच्या कमजोरीने 11,582 वर स्थिरावला. 2 ऑगस्टनंतर दोन्ही निर्देशांकातील ही सर्वात मोठी घसरण आहे.

निक्केई इंडिया उत्पादन खरेदी निर्देशांक जुलैच्या 52.3 च्या तुलनेत ऑगस्टमध्ये 51.7 वर आला आहे.

बीएसईचा एफएमसीजी निर्देशांक 2.14 टक्के, रिअल्टी 1.23 टक्के, ऊर्जा 1.22 टक्के, युटिलिटी 1.17 टक्के, बँकेक्स 1.15 टक्क्यांनी घसरला. ग्राहकोपयोगी वस्तू आणि धातू निर्देशांक मजबूत झाले.