|Sunday, April 21, 2019
You are here: Home » आवृत्ती » रत्नागिरी » मुंबई विद्यापीठ नाटय़ विभागात ‘डीबीजे’ चॅम्पियन

मुंबई विद्यापीठ नाटय़ विभागात ‘डीबीजे’ चॅम्पियन 

युवा महोत्सवावर ठसा

हिंदी एकांकिकात- मूक अभिनयात सुवर्ण,

मराठी एकांकिकेत कास्यपदक

 

प्रतिनिधी /चिपळूण

मुंबई विद्यापीठाच्या 51 व्या आंतर महाविद्यालयीन युवा महोत्सवात डीबीजे महाविद्यालयाने हिंदी एकांकिका व मूक अभिनय स्पर्धेत सुवर्णपदक, मराठी एकांकिका स्पर्धेत कास्यपदक तर एकपात्री अभिनय स्पर्धेत उत्तेजनार्थ पारितोषिक पटकावत दमदार कामगिरीचे प्रदर्शन केले. याबाबतचा अधिकृत निकाल सप्टेंबरअखेरपर्यंत जाहीर केला जाणार असला तरी कोकणातील या महाविद्यालयाने अनेक नामांकीत महाविद्यालयांना मागे टाकत नाटय़क्षेत्रातील चॅम्पियनशीप पटकावण्याची किमया साधली आहे.

शैक्षणिक क्षेत्रात भरीव कामगिरी बजावलेल्या डीबीजे महाविद्यालयाने सांस्कृतिक क्षेत्रातही आपली छाप पाडली आहे. याआधी अल्फा करंडक, पुरूषोत्तम करंडकसारख्या राज्यस्तरीय स्पर्धांमध्ये महाविद्यालयाने विविध पारितोषिके पटवली आहेत. या स्पर्धेत मुंबई, नवी मुंबई, ठाणे येथील नामांकीत महाविद्यालये प्रतिस्पर्धी आहेत. कोकणात नाटय़ व कला क्षेत्राशी संबंधित सोयी-सुविधांचा अभाव असतानाही डीबीजे महाविद्यालय मुंबई विद्यापीठाच्या यावर्षीच्या युवा महोत्सवात सुरूवातीपासूनच सातत्यपूर्ण दमदार कामगिरी बजावत आहे.

या महोत्सवातील हिंदी एकांकिका स्पर्धेत महाविद्यालयाने ‘बिंदी’ ही एकांकिका सादर केली. ‘महिलांची ताकद’ या विषयावर सहा मुलींनी अभिनयाची किमया दाखवत सांघिक सुवर्णपदकावर नाव कोरले. या संघात चिन्मयी जोगळेकर, सानिका मोने, नेहा घाडगे, प्रीया कानिटकर, किरण मोहिते, दिव्या पवार या विद्यार्थिनींनी आपल्या अभिनयाची चुणूक दाखवत परीक्षक आणि प्रेक्षकांची मने जिंकली. तसेच मराठी एकांकिका स्पर्धेत नष्ट होत चाललेली माणूसकी आणि त्याचे विकृतीत झालेले रूपांतर यावर भाष्य करणारी ‘झाँबिज’ ही एकांकिका सादर केली. या एकांकिकेची अंतिम फेरीतील निवड फेरीत प्रथम क्रमांक पटकावत कास्यपदक पटकावले. यामध्ये महेश गुरव याने सर्वोत्कृष्ट अभिनेत्याचा बहुमान पटकावला. तसेच आकाश मोहिते, आदेश कांबळी, दीपेश घाणेकर, चिन्मयी जोगळेकर, नेहा घाडगे या विद्यार्थ्यांनी दमदार अभिनय सादर केला.

याशिवाय मूक अभिनयात सुयोग जावळे, संकेत भुवड, विष्णू शिरोडकर, निखील भोजने, दीपेश घाणेकर, कौस्तुभ शिंदे यांनी उत्कृष्ट अभिनय सादर करत सर्वांची मने जिंकली. एकपात्री अभिनयात दीपेश घाणेकरने उत्तेजनार्थ पारितोषिक प्राप्त केले. या विद्यार्थ्यांना सांस्कृतिक विभाग प्रमुख राजरत्न दवणे यांचे मार्गदर्शन लाभले असून या यशाबद्दल प्राचार्य डॉ. श्याम जोशी, संस्थेचे चेअरमन मंगेश तांबे यांनी अभिनंदन केले आहे.

Related posts: