|Tuesday, February 18, 2020
You are here: Home » आवृत्ती » रत्नागिरी » रत्नागिरी जिल्हा कारागृहाला ‘इलेक्ट्रीक फेंन्सींग’

रत्नागिरी जिल्हा कारागृहाला ‘इलेक्ट्रीक फेंन्सींग’ 

सुरक्षेत होणार आणखी मजबूत

440 वॅट क्षमतेचे कुंपण

नाविन्यपूर्ण योजनेतून 5 लाख निधी

जान्हवी पाटील /रत्नागिरी

रत्नागिरी जिल्हा विशेष कारागृहाची सुरक्षा अधिक भक्कम झाली असून कारागृहाच्या संरक्षक भिंतेवर चारही बाजूंनी इलेक्ट्रीक फेन्सींग (विद्युत कुंपण) करण्यात आले आहे. पालकमंत्री रविंद्र वायकर यांनी जिल्हा नियोजन नाविन्यपूर्ण योजनेतून 5 लाखाचा निधी यासाठी दिला असून मुख्यतट भिंतीवर विद्युत पेंसिंगचे निम्मे काम झाले आहे. यामुळे कारागृहाची सुरक्षा अधिक भक्कम झाल्याची माहिती कारागृह अधीक्षक आर. आर. देशमुख यांनी ‘तरूण भारत’शी बोलताना दिली.

रत्नागिरी जिल्हा विशेष कारागृह महाराष्ट्रातील महत्वपूर्ण कारागृह मानले जाते. याठिकाणी पूर्वी राज्यातील कुख्यात गुन्हेगार ठेवले जात होते. मालेगाव बॉम्बस्फोटातील कैद्यांनाही याठिकाणी ठेवण्यात आले होते. रत्नागिरीच्या कारागृहातील एका कोठडीत ब्रिटीशांनी वीर सावरकरांसह क्रांतीकारक सेनापती बापट यांनाही ठेवले होते. इतकेच नव्हे तर महाराष्ट्रातील सर्वात सुरक्षित कारागृहांमध्ये रत्नागिरीचे नाव घेतले जाते.

मात्र, या कारागृहातून चार वर्षांपूर्वी 2 कैद्यांनी पलायन केले होते. या कैद्यांनी मुख्यतट भिंतीवर चढून पलायन केले होते. ही भिंत 22 फूट उंच असतानाही पलायनाचा हा प्रकार घडला होता. त्यामुळे असा प्रकार पुन्हा घडू नये यासाठी ‘़इलेक्ट्रीक फेन्सींग’ चा प्रस्ताव तत्कालीन जिल्हाधिकारी प्रदीप पी यांच्यासमोर ठेवण्यात आला होता.

या योजनेसाठी जिल्हा नियोजन नाविन्यपूर्ण योजनेतून पालकमंत्री रवींद्र वायकर यांच्या पुढाकारातून 5 लाख रूपये मंजूर करण्यात आले. या निधीतून 440 वॅट क्षमतेचे इलेक्ट्रीक फेन्सींग करण्याचे काम हाती घेण्यात आले आहे. भिंतीवरून चढून पलायनाचा प्रयत्न केल्यास विद्युत भारीत तारेच्या स्पर्शानं त्याला वीजेचा झटका बसेल व तो फेकला जाईल. यात कोणतीही जीवितहानी होऊ नये याची खबरदारी घेण्यात आल्याची माहिती जिल्हा कारागृह अधीक्षक आर. आर. देशमुख यांनी दिली.

गेल्या तीन- चार दिवसांपासून रत्नागिरी विशेष कारागृह येथे कारागृहाच्या मुख्यतट भिंतीवर विद्युत कुंपणाचे काम सुरू करण्यात आले आहे. आतापर्यंत निम्मे काम पूर्ण झाले असून उर्वरीत काम आठवडाभरात पूर्ण होणार असल्याचे त्यांनी सांगितले.

जिल्हा कारागृहात पलायनाचे प्रयत्नाचा प्रकार फारसा घडत नाही. मात्र सुरक्षीततेच्या दृष्टीने इलेक्ट्रीक फेन्सींग अत्यंत महत्वपूर्ण आहे. कारगृहात असलेला सीसीटीव्ही वॉच आणि आता इकेक्ट्रीक फेन्सींग यामुळे सुरक्षा मजबुत होणार आहे. याठिकाणी मुंबईतून शिक्षेचेही कैदी येणार असून त्यादृष्टीने ही योजना महत्वपूर्ण ठरणार आहे.

आर. आर. देशमुख

अधीक्षक रत्नागिरी जिल्हा विशेष कारागृह

Related posts: