|Friday, July 19, 2019
You are here: Home » आवृत्ती » सातारा » सत्ताधाऱयांच्या दुहीत विकास खुंटला

सत्ताधाऱयांच्या दुहीत विकास खुंटला 

वार्ताहर/ बारामती

बारामतीच्या विकास कामांचा गौरव राज्यात नव्हे तर देशात होतो. गेली अनेक वर्षापासून पवारांच्या हातात नगरपालिकेची एकहाती सत्ता कायम आहे. मात्र स्वतःच्या बालेकिल्ल्यातच आपल्याच नगरसेवकांवर अंकुश ठेवण्यात पवार अपयशी ठरल्याची चर्चा सध्या नगरपालिकेच्या राजकीय वर्तुळात सुरु झाली आहे. सत्ताधारी नगरसेवकांच्यात दुही निर्माण झाल्याने शहराचा विकास खुंटला असल्याचे चित्र पाहवयास मिळत आहे.

     बारामती शहराच्या विकासाबाबत नियोजनाचा अभाव राहिल्याने अनेक भागात आजही अनेक मुलभूत सुविधा पुरविण्यात सत्ताधारी पक्ष अपयशी ठरली आहे. सुविधा मिळवण्यासाठी स्थानिक नागरिकांना कोणत्या गटाकडे जावे असा मोठा यक्ष प्रश्न निर्माण झाल्याशिवाय राहत  नाही. नागरिकांच्या समस्या मार्गी लावण्याबाबत प्रशासनाला सोबत घेऊन दोन्ही गटाकडून उपाययोजना अपेक्षित आहे. दोन्ही गट नागरिकांच्या समस्यांकडे सकारात्मक पाहण्याएवजी स्वतःचा राजकीय श्रेयासाठी दोघांचाही वाद सुरु होतो. त्यामध्ये तक्रारदार नागरिकांची फरफट होते. यामध्ये प्रशासन बघ्याची भूमिका चोख बजावते. बारामतीकर घराणेशाही व हुकुमशहाकडे पाहून नाही तर घडय़ाळाकडे पाहून मतदान करतात याचाच विसर या दोघांनाही पडला आहे. यामध्ये अजित पवार नेमकी भूमिका घेत नसल्याने बारामतीकरांनी नाराजी व्यक्त केली. बारामतीच्या खासदारांकडे अथवा थोरल्या साहेबांकडे तक्रार करण्यास नागरिक गेल्यास तुम्ही तुमच्या आमदारांकडे जा म्हणून त्यांना बाहेरचा रस्ता दाखविला जातो. मग बारामतीकरांनी पवारांच्या साठीला दिलेली साथ हि चूक आहे का? असा प्रतिप्रश्न सामान्यांला पडतो. असा वेगवेगळा अनुभव बारामतीकरांना अनुभवयास मिळत आहे. मात्र दोन गटांच्या अटातटीच्या श्रेयवादापोटी अनेक प्रकल्प निकामी झाली आहे. तर अनेक प्रकल्प शासनाची विना मंजुरी घेता सुरु केल्याने व त्यामध्ये विरोधकांनी राजकीय खेळी केल्याने सत्ताधारी तोंडघशी पडले असल्याचे पाहवयास मिळत आहे. याबाबत बारामतीतील मतदार सध्या संभ्रम अवस्थेत आहे. याबाबत राष्ट्रवादी कॉंग्रेसने आत्मचिंतन करणे गरजेचे असल्याचे राजकीय विश्लेशकांनी अपेक्षा व्यक्त केली.