|Tuesday, July 23, 2019
You are here: Home » भविष्य » तुमचे ग्रह आमचा अंदाज

तुमचे ग्रह आमचा अंदाज 

रामनाम जप सर्व तऱहेने तारक मंत्र

दि. 4 ते 9 सप्टेंबर 2018

हल्लीचे जीवन अत्यंत धकाधकीचे झालेले आहे. बाहेर गेलेला माणूस घरी परत येईलच याची शाश्वती नसते. कोण आपल्यासाठी प्रार्थना करत आहे, अथवा कोण आपल्याविरुद्ध कपटनाटय़ खेळत आहे, हे कळत नाही. चांगले वाटणारे देखील मागून काहीबाही बोलत असतात, तर ज्यांना आपण शत्रू मानतो तीच माणसे ऐनवेळी देवासारखी संकटात धावून येतात. कोण केव्हा उपयोगी पडेल कोण व केव्हा सूड उगवेल सांगता येणार नाही. हाती, पैसा असूनही तो ऐनवेळी कामाला  येत नाही. लाखो रुपयांचे बंगले असूनही लोक सतत धास्तीत असतात तर साध्या  घरात राहणार माणूस अगदी सुखात व मजेत असतो. कष्टाला पर्याय नाही व कुणीही साधू, संत, बाबा महाराज आपले भले करणारे नाहीत.आपणच आपले भवितव्य घडवावे लागते हे सारे खरे असले तरी  नशीबात  जे आहे ते कधीच चुकत नाही. फक्त हुषार असून चालत नाही तर त्याला नशिबाची साथही  असावीच लागते. अत्युच्च शिक्षण घेतलेल्या लोकांना चांगल्या नोकऱया मिळत नाहीत, पण एखादा साधा माणूस उच्च पदावर चांगल्या पगारावर असलेला दिसतो. आईवडिलांच्या नशीबात सायकलही नसते पण  मुलांच्या मात्र अनेक अलिशान गाडय़ा असतात. यालाच नशीब म्हणतात. पाप पुण्य यांचा प्रभाव जसा असेल त्या प्रमाणात चांगले अथवा वाईट भोग भोगावे लागतात व ते कुणालाही चुकलेले नाही. या कलीयुगात अशुभ शक्तींचे प्राबल्य अधिक असते पण चांगलेही त्याच प्रमाणात  होते. पूर्वी हजारो वर्षे तपश्चर्या करून लोक आपले इप्सित साध्य करून घेत होते, पण या कलियुगात कमी वेळेत व याच जन्मात केलेल्या पाप पुण्याचा हिशोब द्यावा लागतो. पूजाअर्चाही लवकर फळते. तसेच केलेल्या चुकांचे प्रायश्चितही याच जन्मात भोगावे लागते. मालक पगार वाढवणार असतो. अचानक नोकराला काही तरी दुर्बुद्धी सुचते व असलेली नोकरी जाते. किरकोळ कारणावरून घटस्फोट घेतला जातो पण नंतर तीच व्यक्ती देशाच्या अत्युच्च स्थानावर बसलेली पाहून आपली चूक आपल्या लक्षात येते. देवाकडे  लोक आपल्या ईच्छा पूर्ण व्हाव्यात म्हणून विनवणी करतात. प्रत्येकाच्या प्रारब्धानुसार केलेले माणसे अथवा नवस कमी जास्त प्रमाणात फळतात. या कलियुगात साधू, संत, संन्यासी आपल्या कलाकौशल्याने  जगाला मोहित करतील पण शेवटी व्यवसायाच्या मागे लागून उद्योगपती  होतील. त्याचे अध्यात्म व देवधर्म बाजूला राहील. असे भागवतात हजारो वर्षांपूर्वी नमूद केलेले आहे व आज त्याचा प्रत्यय येत आहे. दशावतारापैकी अत्यंत महत्त्वाचा अवतार म्हणजे रामावतार. दुष्टांचे निर्दालन, सत्याचे रक्षण व मानवी जीवनमूल्यांचे महत्त्व स्पष्ट करणारा हा अवतार आहे. आपल्या हातून होणाऱया चुकांचे परिमार्जन होण्यासाठी रामनाम जप सतत करावे. प्रत्येकाने आपापल्या घरात रामाचे कोणतेही स्तोत्र वाचावे. रामाचे गुणस्तवन तेथे हनुमंताचे वास्तव्य निश्चित. हनुमंत व  राम हे  सत्कर्माचे रक्षणकर्ते. शत्रूचे निर्दालन करण्यास केव्हाही पुढे. त्यामुळे त्यांचे पूजन स्मरण प्रत्येकाने अवश्य करावे. अनेक कुटुंबात अठरा विश्वे दारिद्रय़ असते, अन्नाची भ्रांत असते, नोकऱया मिळत नाहीत, पती- पत्नीत पटत नाही, सतत करणीबाधेचे प्रयोग, व्यवसाय नीट चालत नाहीत तेथे अन्नपूर्णा देवीचा शाप असतो. समाजात  कुणाच्या तरी रुपाने अनेकांना चरितार्थासाठी प्रत्यक्ष वा अप्रत्यक्ष रुपाने कामे मिळत असतात. परमेश्वरी कृपा लाभण्यासाठी प्रत्येकाने आपल्या घरात रामनामाचा जप करणे हे त्यांना भाग्यवर्धक ठरू शकते. हल्ली इंग्लिश माध्यमामुळे लोक संस्कृत स्तोत्रे वगैरे विसरत चालले आहेत व त्याचे दुष्परिणामही दिसून येत आहेत.

 

मेष

पंचमस्थानी होत असलेली अमावास्या संततीच्या बाबतीत जरा अडचणीची आहे. मुलाबाळांच्या वागण्यावर  लक्ष ठेवावे. मनातील अनेक गोष्टी  साध्य करू शकाल. धार्मिक क्षेत्रात अथवा तीर्थक्षेत्री असाल तर दैवी शक्तीचा अनुभव येईल. मतभेदाचे प्रसंग येतील. कोणतेही प्रश्न प्रति÷sचे करू नका. नुकसान होईल.


वृषभ

ग्रहमान चांगले आहे. एखाद्या महत्त्वाच्या कामाची सुरुवात करू शकाल. चतुर्थात होणारी अमावास्या रहात्या वास्तुवर प्रभाव टाकील. कुटुंबियांपैकी कुणाची तरी जबाबदारी  स्वीकारण्याची तयारी ठेवावी लागेल. अडलेल्या कामांना सुरुवात होईल. धनलाभाच्या दृष्टीने चांगले योग नाहीत. त्यामुळे खर्चावर नियंत्रण ठेवावे लागेल.


मिथुन

कुणाच्याही सांगण्यावर भरवसा न ठेवता  स्वत:च्या मनाने निर्णय घ्या. ग्रहमान सर्व बाबतीत चांगले आहे. त्यामुळे अतिमहत्त्वाच्या कोणत्याही कामाची आखणी करण्यास हरकत नाही. गुरुचा अस्त आहे. त्यामुळे आर्थिक व्यवहार जपून करावेत. काही अडगळीत गेलेल्या अथवा विंटेज स्वरुपातील वस्तुंना चांगला  भाव मिळेल. घरात अनेक तऱहेच्या सुधारणा करू शकाल.


कर्क

धनस्थानी अमावास्या होत आहे. समोर मोठे यश दिसेल पण हाती  लागण्याची शक्मयता कमी. नोकरीत सर्व बाजूने विचार करूनच निर्णय घ्यावेत. महत्त्वाच्या कामात यश मिळेलच असे नाही. प्रेमप्रकरणे अथवा वैवाहिक जीवनाशी संबंधित बाबी असतील तर जरा सबुरीने घ्यावे लागेल. जे चालले  आहे ते चालू द्या. त्यात नवीन काहीही भर घालू नका. कोणत्याही बाबतीत अतिरेक टाळा.


सिंह

पंचम शनि व तुमच्या राशीतच होणारी अमावास्या हा योग मानसिक शांती लाभू देणार नाही. अचानक केलेले काम यशस्वी होईल. तर काहीवेळा ठरवून केलेली महत्त्वाची कामे फिसकटतात. पण नको त्या अटीपुढे मान तुकवणे धोकादायक ठरेल. संततीप्राप्तीचे चांगले योग. विवाहकार्याच्या वाटाघाटीत उत्तम यश मिळेल.


कन्या

अमावास्या अनिष्टस्थानी आहे. ती फक्त अध्यात्माच्या बाबतीत शुभ फळे देईल. घाईगडबडीत  काहीही ठरवू नका. अनेक बाबतीत गेंधळाचे वातावरण दिसेल. हाती घेतलेले काम पूर्ण होईल की नाही अशी शंका येऊ लागेल. जागेच्या व्यवहारात सावधानता बाळगा. ग्रहमान अत्यंत  विचित्र आहे. कर्तव्य व प्रति÷ा तसेच मानसन्मान व पैसा या सर्व  बाबी योग्य रितीने हाताळूनच व्यवहारी कामे करावी.


तुळ

येत्या 9 सप्टेंबर रोजी होत असलेली राजयोगावरील अमावास्या तुम्हाला अनेक बाबतीत मोठे यश देणारी ठरेल. नवनवे स्नेहसंबंध, मित्रमैत्रिणींचे सहकार्य, धनलाभ तसेच हाती घेतलेल्या कामात मनाजोगते यश मिळू शकेल. धनलाभाच्या दृष्टीने ही अमावास्या महत्त्वाची ठरू शकेल. अत्यंत शुभ योगावर आलेल्या या अमावास्येला कोणतेही कुलदेवतेशी संबंधीत धार्मिक कार्य करा. त्याचा चांगला अनुभव येईल.


वृश्चिक

राजयोगावरील अमावास्या नोकरी व्यवसायाच्या दृष्टीने अतिशय महत्त्वाची ठरेल. बराच काळ प्रलंबित असलेले अनेक प्रश्न सुटतील. घराण्यात वडिलांच्या नात्याकडून आलेले अनेक दोष या अमावास्येच्या पूजनाने नाहीसे  होतील. वास्तुदोष असेल तर तो नष्ट करण्यासाठी वास्तुत देवधर्माची कृत्ये या अमावास्येला करावी त्याचा चांगला अनुभव येईल. वडीलधारी माणसांचा काही प्रश्न असेल तर तो या आठवडय़ात सुटेल.


धनु

9 तारखेची राजयोगी अमावास्या तीर्थयात्रा व धार्मिक कार्याच्या दृष्टीने शुभ ठरेल. या अमावास्येला केलेले कोणतेही चांगले कार्य जीवनाला योग्य वळण देऊ शकेल. महत्त्वाची कागदपत्रे हरवली असतील, मुलांकडून त्रास होत असेल, घरात काही कटकटी सुरू असतील तर त्या या अमावास्येच्या पुजनाने नष्ट होऊ शकतील. शत्रूपीडा व सरकारी  कामात अडथळे आणणारे ग्रहमान असले तरी सावध राहिल्यास काहीही त्रास होणार नाही.


मकर

मृत्यूषडाष्टकात  राजयोगाची अमावास्या होत आहे. आरोग्याच्या तक्रारी व शत्रूभय अशी याची फळे मिळू शकतात. आरोग्याची काळजी घ्यावी. तसेच कुणाशी वाईटपणा ओढवला जाणार नाही याची काळजी घ्यावी. देवधर्माकडे जास्त लक्ष द्या. अनेक समस्या सुटतील. पूर्वजांचे दोष असतील तर ते निवारण्याचा प्रयत्न करा.


कुंभ

राजयोगावरील अमावास्या सप्तमात पडत आहे.  वैवाहिक जीवनात महत्त्वाच्या घटना घडतील. काही गैरसमज तसेच व्यवसायात अडचणी, परदेश प्रवासात येणारी विघ्ने, अशा समस्या असतील तर या अमावास्येला त्या दिवशी  सायंकाळी घरात वैदिक मंत्राचा घोष अथवा स्तोत्र वाचन करा. त्याचा फायदा होईल. महत्त्वाच्या कार्यात चांगले यश प्रदान करील. मुख्यत: वैवाहिक जीवनाशी संबंधित तुम्हाला लाभदायक ठरेल.


मीन

काहीजणांना तुमचा उत्कर्ष सहन होत नसेल. त्यातून अशा लोकांचा त्रास होत असेल, घरदार व उद्योग व्यवसायात अचानक चढउतार जाणवत असतील तर राजयोगातील अमावास्येला घरात नवग्रह स्तोत्राचे वाचन करा. सर्व बाधा दूर होतील व जीवन जगण्याचा नवा मार्ग दृष्टीस पडेल. ही अमावास्या काहीतरी करून दाखविण्याची जिद्द निर्माण करेल.