|Wednesday, July 17, 2019
You are here: Home » संपादकिय / अग्रलेख » नाते गहिरे झाले तरी आत्मपरीक्षण गरजेचे…

नाते गहिरे झाले तरी आत्मपरीक्षण गरजेचे… 

वर्षानुवर्षे संसारगाडा सुरू असतो. जोपर्यंत भांडणे होत नाहीत, विशेष कुरबुरी समोर येत नाहीत तोवर सारे ‘ऑल इज वेल’ आहे असे आपण मानत असतो. लग्न होऊन अनेक वर्षे संसार झाल्यावर अचानक खाचखळगे जाणवू लागले, वारंवार मतभेद होऊ लागले की आपण म्हणतो, ‘अरे अचानक असं काय झालं? इतकी वर्षे सारं छान होतं. मुलंही सेटल झाली. आता ‘या’ वयात यांचं काय बिनसलं? कुणालाच काही समजेनासं होतं. अनेकदा त्या जोडप्याला सारं ‘अर्थहीन’ वाटू लागतं. तू मी चे ‘आपण’ म्हणून जगत असताना हा ‘आपण’ कुठे हरवला, काहीवेळा ‘मी’ कुठे गायब झाला हेच उमजत नाही. अशीच काहीशी अवस्था असलेलं एक ‘ज्ये÷’ जोडपं मला भेटायला आलं. त्यातील ते काका साधारण 62-63 च्या आसपासचे… उंचंपुरं व्यक्तिमत्त्व, गोरापान वर्ण, घारे डोळे, तरतरीत नाक, कडक इस्त्री केलेले कपडे आणि इस्त्री केल्यासारखाच ‘कडक’ स्वभावही…! काकूही गोऱयापान, उंच, चेहऱयावर एकप्रकारची सात्विकता…

थोडं स्थिरावल्यावर मी विचारलं, कुणाची आणि काय समस्या आहे? आजोबांनी बोलण्याची सूत्रे आपल्या हाती घेतली. ‘मॅडम, मी गेली 37-38 वर्षे मुंबईला होतो. एका नामांकित कंपनीत उच्च पदावर कार्यरत होतो. निवृत्त झाल्यावरही 2-3 वर्षे कंपनीसाठी अनेक ठिकाणी सेमिनार घेत असे. गावी बराच व्याप असल्याने माझी पत्नी आणि मुले गावीच राहिली. वर्षातून जेमतेम दोन वेळा मला सुट्टी मिळायची, परंतु माझ्या पत्नीने कसलीही तक्रार न करता उत्तम संसार सांभाळला. दोन्ही मुलगे उच्चशिक्षित, उच्चपदस्थ आहेत. एक पुण्याला असतो तर एक परदेशी स्थायिक झाला. मीही आता पूर्णपणे निवृत्त झालो. सहा महिन्यापूर्वीच मी कायमस्वरूपी गावी आलो. यायचं ठरवलं तेव्हाच पक्क केलं होतं, आता बायकोला पूर्ण आराम द्यायचा. मला फार कुणात मिसळायला आवडत नाही त्यामुळे मी पूर्णवेळ घरातच असतो. चोवीस तास हिच्या दिमतीला हजर असतो खरंतर! परंतु हिच्या चेहऱयावरचा पूर्वीचा आनंद, मोकळेपणाच हरवलाय कुठेतरी. मी थोडं स्पष्ट बोलतो. मी थोडा अधिकार गाजवणारा आहे. कायम ‘बॉस’ असल्याने ‘ओल्ड हॅबिट’ म्हणा हवं तर… परंतु वाईट नक्कीच नाही हो, हिला मी घरात काहीही करू देत नाही. पण काय झालंय समजत नाही. संवाद होतच नाही. झाले तर फक्त वादविवाद.’ तेवढय़ात काकांचा फोन वाजला. ‘सॉरी, आलोच हं, मुलाचा फोन आहे’ असं म्हणत ते बाहेर गेले. हीच संधी साधत काकी माझ्या हातात एक चिठ्ठी वजा कागद ठेवतात. प्लीज हे वाचा, यांच्यासमोर बोलता येणार नाही मला जास्त.. वाचा आणि प्लीज मार्ग काढा…

त्या चिठ्ठीमध्ये आजोबांचा करारी स्वभाव, लोकांमध्ये न मिसळणे, सतत काकूंनी घरीच थांबायला हवं यासाठीची आग्रही भूमिका, समाजकार्य करणं म्हणजे चकाटय़ा पिटणं असा असलेला काकांचा समज आणि आजवर सारं सांभाळत कापूंनी स्वतः तयार केलेलं त्यांचं विश्व, या साऱयांचा मेळ घालताना काकूंची उडणारी तारांबळ, काकांच्या सतत मदतीच्या आग्रहामुळे येणारं ‘परावलंबित्व’ यावर चिठ्ठीत सविस्तर होतं. मी तो कागद वाचून बाजूला ठेवते न ठेवते तोच काका आत आले. नेमकी गल्लत काय होते आहे हे लक्षात आलं होतं.

काकांजवळ स्वतंत्रपणे बोलताना काही प्रश्नांच्या माध्यमातून त्यांना बोलतं करत त्यांची आजवरची संपूर्ण जीवनशैली, आवडी-निवडी, सवयी, विचार हे सारं जाणून घेतलं. दोघांच्या आवडी-निवडी, विचार करायच्या पद्धतीत खूप फरक होता. घरापासून दूर राहिलेल्या काकांना फक्त ‘घर’ हवं होतं. परंतु काकूंनी 35 वर्षे गावातल्या महिलांना एकत्र काम, महिला मंडळ, वाचनालय, बचत गट असं सारं उभं केलं होतं. काही संस्थांच्या माध्यमातून त्या काम करत होत्या. आपली तब्येत उत्तम आहे तोवर तरी हे केलं पाहिजे ही त्यांची इच्छा होती. काकांच्या निवृत्तीनंतर मात्र पत्नीनंही आता पूर्ण निवृत्ती घ्यावी या त्यांच्या हट्टापायी त्यांची घुसमट होत होती. निवृत्तीनंतर केवळ घर हीच ‘प्रॉयोरिटी’ हे ठरवलेल्या काकांना इतकी वर्षे संसार-गाडा चालवलेल्या काकूंच्या आवडीनिवडी वेगळय़ा असू शकतात याचा विसरच पडला होता. मी थोडंसं स्पष्ट बोलत म्हटलं, ‘काका, आजवर तुम्ही नोकरीमुळे पंधरा दिवसच घरी यायचात. त्यावेळी त्या सारं ऍडजेस्ट करून दिनक्रम बदलत असत. परंतु त्यांनी उभं केलेलं त्यांचं विश्व, समाजकार्य यामुळे लोकांचा त्यांच्यावर विश्वास आहे. ते सल्ले मागायला येतात ते याच विश्वासामुळे. या साऱयामधून एकदम बाहेर पडणं कसं जमेल? त्यांच्या रूटीनमधे अचानक करावा लागणारा बदल त्यांना त्रासदायक वाटू शकतो. क्षणभर तुम्ही त्यांच्या भूमिकेत शिरून पहा. जर सातत्याने त्यांनी घरातच रहावं असा तुम्ही आग्रह धरला तर सारंच अवघड होऊन जाईल. त्यांची होणारी मनाची घुसमट त्यांचं आरोग्यही बिघडवू शकते ना?’ काका एकदम गंभीर झाले आणि आलोच म्हणत उठले आणि बाहेर गेले. पाच मिनिटांनी, ‘मॅडम, सॉरी हो, मला सिगारेट ओढाविशी वाटली. खरंतर हिला ते आवडत नाही परंतु इतक्मया वर्षांची सवय आहे. एकदम कशी जाणार ना?’ मी संवादाचा तोच धागा पकडत म्हटलं ‘बरोबर… कुठलीही गोष्ट क्षणात बदलता येत नाही. त्यासाठी वेळ हवाच. याचा काकूंच्या बाबतीतही विचार व्हायला हवा.’ काकांनी दीर्घ उसासा सोडला.. बरं मला सांगा तुमची दैनंदिन जीवनातील न जुळणारी आवड… ते पटकन उत्तरले ‘भात’.. म्हणजे? अहो मला बारीक तांदळाचा एकदम पॉलिश भात आवडतो. हिला  मोठय़ा तांदळाचा भात प्रिय.. सुरुवातीला त्यावरूनही गडबड झाली. मग? मग काय… रोज एकाच कुकरमध्ये वेगवेगळा भात… त्यामुळे टेन्शन नाही. गुड.. म्हणजे  विवेकाने विचार केला तर काहीतरी पर्याय असतोच ना… हो मॅडम… तुम्हीच सांगा, काय करावं मला काहीच सुचत नाही. परंतु मी चोवीस तास घरात असतो आता. मी हसत म्हटलं… ‘बरोबर आहे. आपण एक काम करूया… तुम्ही मॅनेजमेंट क्षेत्रात खूप काम केलं आहे. सेमिनार घेणं हा तुमच्या आवडीचा विषय त्या अनुषंगाने शाळा, कॉलेज, ग्रामीण भागातील विद्यार्थी यांच्यासाठी काही करता येईल का याचा विचार करू…’ ‘चालेल..’ ते उत्तरले. काकूंनाही काही गोष्टी, प्राधान्यक्रम थोडे लवचिक करणं कसं आवश्यक आहे हे सांगितलं. 

 मुळातच सुनियोजित सेकंड इनिंगचा विचार असेल तर निवृत्तीनंतर काय, हा प्रश्न इतका त्रासदायक ठरत नाही. आयुष्यभर काम केल्यानंतर निवृत्तीनंतर येणारं रिकामपण, त्यातच एकाचं कृतीशील असणं मग दुसऱयाला त्रासदायक ठरू लागतं. त्यातही पुरुष सातत्याने घरात आणि स्त्राr तिच्या कामांमध्ये व्यग्र आहे ही गोष्ट त्यांच्या अहंला अनेकदा क्लेशकारक वाटू शकते. खरंतर नाते जास्त गहिरे होते. निरनिराळी परिमाणे धारण करू लागते. तसे आत्मपरीक्षण करत राहणे. अनेकदा महत्त्वाचे ठरते. वाढत्या वयानुसार बोचणारं शरीर, हळुवारं होणारं मन, मुलांचं दूर असणं या साऱया गोष्टी कुठेतरी परिणाम करत असतात. अशावेळी अगदी एकमेकांच्या हक्काचे वाटणारे ‘तू आणि मी’ चे ‘आपण’ होऊन झालेले जोडपे एकमेकांबाबत आग्रही होऊ शकते. त्यामागे अनेकदा तूच माझी हक्काची, तूच हक्काचा ही भूमिका असते. परंतु कोणत्याही गोष्टीचा अतिरेक त्रासदायक ठरतो. माणसं म्हणून एकमेकांचे प्राधान्यक्रम वेगळे असू शकतात, याचं भान प्रयत्नपूर्वक ठेवणं गरजेचं आहे. अंतर्मुख होऊन विचार करणे आणि सुरुवातीपासून याबाबत सजग असणे गरजेचे आहे. निवृत्त होण्यापूर्वीच काहीअंशी पुढचा सुयोग्य विचार करून ठेवला तर अशा पद्धतीच्या समस्यामधून नक्कीच मार्ग काढता येईल आणि ‘सुनियोजित सेकंड इनिंग’ आशादायी ठरेल हे मात्र खरे!

Ad. सुमेधा देसाई