|Saturday, April 20, 2019
You are here: Home » आवृत्ती » सिंधुदुर्ग » जि.प.चे आदर्श शिक्षक पुरस्कार जाहीर

जि.प.चे आदर्श शिक्षक पुरस्कार जाहीर 

आठ तालुक्यातील आठ शिक्षकांचा समावेश : 10 सप्टेंबर रोजी होणार पुरस्कार वितरण : राज्य पुरस्कार प्राप्त दोन शिक्षकांचाही होणार सत्कार

प्रतिनिधी / ओरोस:

जिल्हा परिषदेचे आदर्श शिक्षक पुरस्कार जाहीर झाले आहेत. यामध्ये आठ तालुक्यातील आठ शिक्षकांची निवड करण्यात आली असून यावेळी तब्बल सहा महिला शिक्षकांचा यामध्ये समावेश आहे. शिक्षक दिनाच्या पूर्वसंध्येला जाहीर झालेल्या या पुरस्कारांचे वितरण 10 सप्टेंबर रोजी दुपारी तीन वाजता जि. प. च्या छत्रपती शिवाजी महाराज सभागृहात होणार आहे.

जि. प. शाळांमधून चांगले काम करणाऱया शिक्षकांना जि. प. मार्फत दरवर्षी आदर्श शिक्षक पुरस्काराने सन्मानित केले जाते. 2018 चे पुरस्कार जि. प. अध्यक्ष रेश्मा सावंत यांनी मंगळवारी जाहीर केले. कणकवली तालुक्यातून श्वेता सुहास मेस्त्राr (उच्च श्रेणी मुख्याध्यापक), मालवण – राजेश तुकाराम भिरवंडेकर, (पदवीधर शिक्षक), सावंतवाडी – अनुराधा विठ्ठल सावंत (उपशिक्षक) देवगड – प्रतिक्षा प्रकाश जाधव. (उच्च श्रेणी मुख्याध्यापक) वैभववाडी – ज्योती जयवंत पवार (उपशिक्षक), वेंगुर्ला – नेहा बाळकृष्ण गावडे, (पदवीधर शिक्षक), कुडाळ – दशरथ भिकू शिंगारे (पदवीधर शिक्षक), दोडामार्ग – पूनम विष्णू पालव (पदवीधर शिक्षक) यांचा समावेश आहे.

जि. प. अध्यक्षा सौ. रेश्मा सावंत यांच्या अध्यक्षतेखालील उपाध्यक्ष रणजित देसाई, सभापती, डाएट प्राचार्य, प्राथमिक व माध्यमिक शिक्षणाधिकारी यांच्या निवड समितीने प्राप्त प्रस्तावांचे मूल्यांकन करून व प्रत्यक्ष शाळांना भेटी देऊन गुणानुक्रमे शिक्षकांची निवड करण्यात आली. प्राथमिक शाळा पोखरण नं. एकचे शिक्षक श्यामसुंदर सावंत आणि जामसंडे हायस्कूलचे शिक्षक संतोष वालावलकर यांना यावर्षीचा राज्य पुरस्कार प्राप्त झाला आहे. त्यांचाही सत्कार 10 सप्टेंबर रोजी करण्यात येणार असल्याचे सौ. सावंत यांनी सांगितले.

यावेळी जि. प. उपाध्यक्ष रणजित देसाई, शिक्षण सभापती प्रीतेश राऊळ, प्रभारी शिक्षणाधिकारी भारती संसारे, विनायक पिंगुळकर, स्मिता नलावडे, सौ. पुजारे आदी उपस्थित होते.

Related posts: