|Saturday, April 20, 2019
You are here: Home » संपादकिय / अग्रलेख » हायवेवरील खड्डय़ांमध्ये आश्वासनांची खडी!

हायवेवरील खड्डय़ांमध्ये आश्वासनांची खडी! 

महामार्ग ही ओsळख पुसली जाऊन खड्डेमार्ग अशी नवी ओळख मिळालेल्या मुंबई-गोवा महामार्गाच्या चौपदरीकरण कामाची सार्वजनिक बांधकाम मंत्री चंद्रकांत पाटील यांनी नुकतीच पाहणी केली. या दौऱयात महामार्गावरील खड्डय़ांमध्ये केवळ आश्वासनांची खडी टाकून त्यांनी कोल्हापूर गाठले. त्यामुळे कोकणवासियांची निराशाच झाली आहे.

 

मुंबई गोवा महामार्गाच्या चौपदरीकरणाचे काम सध्या सुरू आहे. त्यामुळे ठिकठिकाणी रस्ते खोदलेले, परावर्तीत केलेले असून रस्त्यावर जागोजागी खड्डेच खड्डे आहेत. त्यामुळे या महामार्गावरून प्रवास करणे धोकादायक बनले असून अनेक अपघातांना निमंत्रण मिळत आहे. कोकणातील सर्वात मोठा सण असलेला गणेशोत्सव आठवडय़ावर आला आहे. या काळात महामार्गावर वाहनांची प्रचंड वर्दळ असल्याने महामार्गावरील खड्डय़ांचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. आजच म्हणजे 5 सप्टेंबरपर्यंत महामार्ग खड्डेमुक्त करण्याचे आदेश न्यायालयाने दिले आहेत. याच कामाची पाहणी करण्यासाठी चंद्रकांतदादा कोकणात येऊन गेले. महामार्गावर सतत पडणारे खड्डे कोकणवासियांच्या पाचवीलाच पूजले आहेत. दरवर्षी पावसाळा आला की रस्त्यावरील डांबर-खडी आपली जागा सोडते आणि रस्त्यावर सर्वत्र छोटी-मोठी तळी तयार होतात. मग हे खड्डे भरण्यासाठी निविदा निघतात, तात्पुरती मलमपट्टी होते व कंत्राटदारांची चांदी होते. रस्ते बांधण्यापेक्षा खड्डे बुजवण्याच्या कामात अधिक फायदा असल्याने हे खड्डे या व्यावसायिकांसाठी वरदानच असल्याचे मानले जात आहे. खड्डे पडल्यानंतर राजकीय पक्षांची, संघटनांची आंदोलने व मग तात्पुरती मलमपट्टी हे दुष्टचक्र वर्षानुवर्षे असेच सुरू आहे. यासाठी बऱयाचदा कोकणातील पावसावर खापर फोडले जाते. मात्र खड्डेच पडणार नाहीत असे मजबूत रस्ते तयार झाले तर हा  प्रश्नच निर्माण होणार नाही. यामध्ये राजकीय इच्छाशक्ती कमी पडते की ठेकेदार सरस ठरतात असा प्रश्न निर्माण होतो. खड्डय़ात गेलेल्या महामार्गाबाबत न्यायालयाने केलेली कानउघाडणी व कोकणवासियांचा तीव्र रोष या पार्श्वभूमीवर सार्वजनिक बांधकाम मंत्र्यांनी महामार्गाचा दौरा केला. यावेळी त्यांना अडवण्याचा, काळे झेंडे दाखवण्याचा प्रयत्न झाला. खड्डय़ांबाबतची निवेदनेही देण्यात आली. मात्र त्यानंतरही पाटील यांनी  पावसावर व निसर्गावर खापर फोडत अप्रत्यक्षपणे कामाबाबत चक्क समाधान व्यक्त केले. त्यामुळे कोकणवासियांचा त्रागा व्यर्थच ठरला असे म्हणता येईल. या दौऱयात पाटील यांनी नेहमीच्या राजकीय स्टाईलने महामार्ग खड्डेमुक्त करण्याचे आश्वासन दिले. पण त्यांनी त्यासाठीची नवी डेडलाईन जाहीर केली आहे, ती 9 सप्टेंबरची. म्हणजेच कोर्टाने दिलेल्या मुदतीत महामार्ग खड्डेमुक्त करण्यात आपण असमर्थ असल्याचेच त्यांनी मान्य केले. यातून फक्त त्यांची हतबलता स्पष्ट होते.

राज्य सरकारकडे पुरेसा निधी नसल्याने रस्त्यांची कामे निकृष्ट झाली असून  त्यामुळे खड्डे वाढल्याचे विधान त्यांनी केले आहे. चंद्रकांतदादांसारख्या  मंत्रिमंडळातील दुसऱया क्रमांकाच्या मंत्र्याने अशी कबुली देणे म्हणजे सरकारवरच दोषारोप करण्यासारखे आहे. गेली चार वर्षे राज्यात व केंद्रातही पाटील यांच्या पक्षाचेच सरकार असताना रस्त्यांसाठी निधी मिळवता आला नाही असे म्हणणे  हे सरकारचे अपयशच आहे. त्यामुळे पाटील यांची ही कबुली म्हणायची की विरोधी पक्षाच्या भूमिकेतून अजूनही बाहेर न पडल्याची मानसिकता म्हणायची असा प्रश्न निर्माण झाला आहे. एकीकडे अर्थमंत्री, मुख्यमंत्री यांच्यासह भाजप नेते राज्याची आर्थिक स्थिती भक्कम झाल्याच्या, राज्याची प्रगतीपथावर घोडदौड सुरू असल्याच्या, गुंतवणूकदारांच्या पहिल्या पसंतीचे राज्य बनल्याच्या घोषणा करत असताना आपल्या सरकारचा कार्यकाळ संपत आला तरी रस्त्यांसाठी पुरेसा निधी मिळत नसल्याची पाटील यांची तक्रार कितपत योग्य वाटते? रस्त्यावरील खड्डय़ांबाबत कंत्राटदार-ठेकेदारांना पाठीशी घालण्यामागचे नेमके कारण काय असे प्रश्न या निमित्ताने ‘कोकणी डोक्यात’ उपस्थित होत आहेत.

 महामार्गासाठी खर्च होणारा निधी हा मुळात राज्याच्या तिजोरीशी संबंधितच नाही. यासाठीचा निधी केंद्राकडून येत आहे. शिवाय त्यासाठी वेगळा करही आकारला जातो. तो कुठे गेला हे न सांगताच राज्याच्या तिजोरीत खडखडाट असल्याचे पाटील यांचे म्हणणे म्हणजे वेळ मारून नेण्याचा प्रयत्न केल्यासारखेच आहे. सुरक्षित रस्ता हा जनतेचा हक्क आहे. मात्र त्याचा विसर सरकारला पडला असून त्यामुळेच या प्रश्नात न्यायालयालाही हस्तक्षेप करावा लागला. मात्र यातून शासनाने आवश्यक तो धडा घेतलेला दिसत नाही.  राज्यातील अभ्यासू व हुशार मंत्री म्हणून ठसा उमटवलेल्या चंद्रकांत पाटील यांनी महामार्ग पाहणीसाठी केलेल्या दौऱयातून ठोस काहीतरी निष्पन्न होईल अशी भाबडी आशा कोकणवासियांना होती. मात्र ती नेहमीप्रमाणेच निष्फळ ठरली आहे. त्यांनी केलेल्या या दौऱयाचे वर्णन ते आले, त्यांनी पाहिले व समाधान व्यक्त करून ते गेले असेच करावे लागेल. मुंबई-गोवा महामार्गावरील खड्डय़ांमध्ये आश्वासनांची खडी ओतण्यापलीकडे या दौऱयातून फारसे काही हाती लागले नाही, असेच म्हणावे लागेल.

राजा खानोलकर

Related posts: