|Wednesday, July 17, 2019
You are here: Home » आवृत्ती » पुणे » दाभोलकरांवर कळसकरने झाडल्या दोन गोळय़ा

दाभोलकरांवर कळसकरने झाडल्या दोन गोळय़ा 

बॉम्ब बनविण्यात, शस्त्र हाताळण्यात कळसकर तरबेज : सीबीआयचा न्यायालयात दावा

पुणे / प्रतिनिधी

डॉ. नरेंद्र दाभोलकर हत्या प्रकरणात अटकेत असलेल्या शरद कळसकर याला केंद्रीय गुन्हे अन्वेष्ण विभागाने (सीबीआय) मंगळवारी प्रथमवर्ग न्यायदंडाधिकारी एस. एम. ए. सय्यद यांच्या न्यायालयात हजर केले. डॉ. दाभोलकर यांच्यावर  कळसकरने दोन गोळय़ा झाडल्या. त्यातच त्यांचा मृत्यू झाल्याचे सीबीआयचे वकील विजयकुमार ढाकणे यांनी सांगितले. कळसकर हा बॉम्ब बनविण्यात पारंगत आणि शस्त्र हाताळण्यात तरबेज असल्याचा युक्तिवादही त्यांनी केला. दरम्यान, न्यायालयाने कळसकर याला दहा स्पटेंबरपर्यंत सीबीआय कोठडीत ठेवण्याचे आदेश दिले आहेत.

सीबीआयचे वकील ढाकणे म्हणाले, 23 ऑगस्ट रोजी सीबीआयने कळसकरबाबत प्रॉडक्शन वॉरंट घेऊन त्याचा ताबा सोमवारी घेतला. डॉ. दाभोलकर हत्या प्रकरणात तो मुख्य आरोपी असून, वेगवेगळय़ा कारवाईत तो सहभागी असल्याचे आढळले आहे. शस्त्रांची हाताळणी आणि गावठी बॉम्ब बनविण्यात तो तरबेज असल्याचे स्पष्ट झाले असून, त्याच्याकडे तपासाच्या दृष्टीने चौकशी करणे गरजेचे आहे. तसेच यापूर्वी सीबीआयच्या ताब्यात असलेले राजेश बंगेरा आणि अमित दिग्वेकर यांच्यासोबत त्याची एकत्रित चौकशी करावयाची आहे.

तावडेसोबत रचला संगनमताने कट

 कळसकर याने याप्रकरणी अटकेत असलेला डॉ. विरेंद्रसिंग तावडे याच्यासोबत संगनमताने हत्येचा कट रचला. त्याबाबत चौकशी करण्याकरिता 14 दिवस सीबीआय कोठडी मिळावी, अशी मागणीही त्यांनी केली.