|Friday, July 19, 2019
You are here: Home » आवृत्ती » कोल्हापुर » घटना बदलू पाहणाऱयांना धडा शिकवा

घटना बदलू पाहणाऱयांना धडा शिकवा 

– किसनराव कुराडे-पाटील लिखित प्रेषितांचे वारस पुस्तकाचे प्रकाशन

प्रतिनिधी/ कोल्हापूर

  देशातील सध्याचे राज्यकर्ते लोकशाही नाही तर हुकुमशाही मानणारे आहे. मध्यंतरी घटना जाळण्याचा प्रकार घडला. मात्र घटना जाळणाऱयांवर सरकारने कोणतीच कारवाई केली नाही. त्यामुळे बहुजनांनी राज्यकर्त्यांपासून सावध राहण्याची गरज असून भविष्यात घटना जाळणाऱयांना धडा शिकवा, असे आवाहन आमदार हसन मुश्रीफ यांनी केले.

  प्रा. किसनराव कुराडे लिखित प्रेषितांचे वारस या पुस्तकाचे उपराकार लक्ष्मण माने यांच्या हस्ते शाहू स्मारक भवन येथे प्रकाशन करण्यात आले. याप्रसंगी प्रमुख पाहूणे म्हणून आमदार हसन मुश्रीफ बोलत होते. यावेळी आर. आनंद, एस. संबोधी, ऍड. अबकर मकानदार आदी प्रमुख उपस्थित होते. याप्रसंगी मान्यवरांच्या हस्ते पुस्तकामध्ये वर्णन केलेली हयात असलेली व्यक्तिमत्वे आणि त्यांचे वारसदार यांचा सत्कार करण्यात आला.

  आमदार मुश्रीफ म्हणाले, सध्याच्या राज्यकर्त्यांमध्ये देशातील मुस्लिमांबद्दल द्वेष आहे. तरीही अशा वातावरणात प्रा. कुराडे यांनी मुस्लिम समाजातील व्यक्तिमत्वे या पुस्तकातून पुढे आणली आहेत, ही बाब कौतुकास्पद आहे, असे म्हणत ते पुढे म्हणाले, लोकशाही न मानणाऱया या सरकारने लोकसभा, विधानसभा निवडणुकीत  एकाही मुस्लिमाला उमेदवारी दिलेली नाही. सध्या देशात जातीय दंगली घडवून आणीबाणी घोषित करण्याचा त्यांचा डाव आहे. मात्र त्यांचा हा डाव मोडीत काढण्यासाठी व लोकशाही अबाधित राखण्यासाठी सध्या सर्व जाती-धर्मातील नागरिकांनी शांत राहणे गरजेचे आहे. तसेच राज्यकर्त्यांचे धोरण काय आहे, हे जाणून घेवून अगामी काळात घटना बदलू पाहणाऱयांना धडा शिकवा, असे आवाहन याप्रसंगी आमदार मुश्रीफ यांनी केले.

  उपराकार लक्ष्मण माने म्हणाले, आत्तापर्यंत कुराडे यांनी अनेक पुस्तके वाचली आहेत. मात्र त्यांचे प्रेषितांचे वारस हे पुस्तक कलाटणी देणारे आहे. सध्या देशातील काही जातीय वाद्यांपासून त्यांच्या विरोधात जाणाऱयांची हिंसा सुरु आहे. हि हिंसा महात्मा गांधीजींपासून सुरु आहे. पण माणूस मेला म्हणून त्याचे विचार मरत नाहीत. गांधीजींची हत्या झाली पण त्यांचे विचार आजही जिवंत आहेत. त्यामुळे सध्या सर्वच जाती-धर्मातील नागरिकांनी शाहण्यासारखे वागणे गरजेचे आहे, नाहीतर घटना, लोकशाही नाहीशी होवून पुन्हा आपणाला गुलामगिरीचे जीवन जगावे लागणार असल्याचे माने यांनी याप्रसंगी सांगितले. तसेच यावेळी सर्जेराव पद्माकर, चिंतामणी कांबळे, साहिल शेख, करुणा मिणचेकर यांनी पुस्तकांमधील कथांबाबत आपले विचार व्यक्त केले.