|Friday, July 19, 2019
You are here: Home » आवृत्ती » सांगली » चिंतामणरावांनी सांगलीत स्थापन केलं गणेश मंदिर

चिंतामणरावांनी सांगलीत स्थापन केलं गणेश मंदिर 

 मानसिंगराव कुमठेकर / मिरज 

सांगलीतील कृष्णाकाठी असलेलं ऐतिहासिक गणेश मंदिर हे जिल्हय़ातील तमाम गणेशभक्तांचे श्रध्दास्थान आहे. पेशवाईतील प्रसिध्द सरदार आणि सांगलीचे संस्थानाधिपती श्रीमंत चिंतामणराव आाप्पासाहेब पटवर्धन (पहिले) यांनी हे मंदिर बांधले. पंचायतन स्वरूपाच्या या मंदिराच्या उभारणीचा इतिहासही वैशिष्टय़पूर्ण असा आहे. त्यासंबंधी मोडी कागदपत्रे मिरज इतिहास संशोधन मंडळाच्या कुमठेकर संग्रहात आहेत.

पेशवाईमध्ये पटवर्धन सरदार गोविंद हरी यांना मिरजेचा किल्ला आणि भोवतालचा परिसर पेशव्यांनी सरंजामाच्या खर्चाकरीता दिला होता. मिरज हे कर्नाटकच्या सीमेवर असल्याने याठिकाणी पटवर्धन सरदारांना ठेवल्याने कर्नाटकमधील हैदर आणि टिपूच्या स्वाऱयांमध्ये त्यांचा उपयोग होईल या हेतूने हा सरंजाम त्यांना देण्यात आला होता. गोविंद हरीनंतर वामनराव, पांडुरंगराव यांच्या नावाने सरदारीची वस्त्रे झाली. पांडुरंगराव हे श्रीरंगपट्टणच्या लढाई&त हैदरच्या लढाईत सापडले. व कैदेतच त्यांचा मृत्यू झाला. पांडुरंगरावांना चिंतामणराव हे   पुत्र होते. ते लहान असल्याने सरदारीचा कारभार त्यांचे चुलते गंगाधरराव पाहत. पुढे चिंतामणराव मोठे झाल्यावर त्यांच्या नावाने पेशव्यांनी सरदारीची वस्त्रे दिली. सर्व पटवर्धन कुटुंब मिरजेच्या भुईकोट किल्ल्यात असणाऱया वाडय़ात राहत होते.   

याचकाळात गंगाधरराव आणि चिंतामणराव या चुलत्या-पुतण्यात सरंजामाच्या वाटणीसंदर्भात वाद सुरू झाला. सन 1799 साली त्यांच्यामध्ये वाटणी झाली.  त्यानंतर चिंतामणराव हे मिरज किल्ल्यातून बाहेर पडले आणि मिरज शहराच्या उत्तरेला असणाऱया मळय़ात जाऊन राहिले. यावेळी त्यांनी सांगली येथे नवी राजधानी करण्याचे ठरविले. त्यासाठी गणेशदुर्ग नावाचा नवा भुईकोट किल्ला बांधायला सुरूवात केली. तसेच आपले आराध्य दैवत असणाऱया श्री गणेशाचे मंदिर बांधण्याचा संकल्प त्यांनी केला. सन 1811 मध्ये कृष्णाकाठी गणेश मंदिराचे काम सुरू झाले.

श्रीमंत चिंतामणराव पटवर्धनांनी सांगली संस्थानची स्थापना करून राज्यकारभार सुरू केला. मात्र, हे सर्व श्री गणेशाचे आहे. आपण, केवळ त्याचे मुखत्यार आहोत, अशी त्यांची श्रध्दा होती. त्यामुळेच गणेश मंदिराचे बांधकाम होईतोपर्यंत त्यांचा मुक्काम किल्ल्यातील वाडय़ात न होता. गणेश मंदिराजवळील वाडय़ातच होता. मंदिराचे बांधकाम करण्यासाठी मिरज किल्ल्यातील माधवजी मंदिराचा नकाशा मागविण्यात आला. बांधकामासाठी ज्योतिबाच्या डोंगरातून काळा पाष्णा आणला होता. सन 1814 च्या सुमारास मंदिराचा पाया घातला गेला. सुमारे 30 वर्षे हे काम सुरू होते. सन 1845 मध्ये चैत्र शुध्द दशमी रोजी या मंदिराचा अर्चा विधी झाला. या मंदिर बांधकामाची काही कागदपत्रे मिरज इतिहास संशोधन मंडळाच्या कुमठेकर संग्रहात आहेत.

अहिल्याबाई होळकर यांनी महाबळेश्वर येथे आणलेल्या संगमरवरी दगडांपैकी काही दगड चिंतामणरावांनी आणले. त्यातून पंचायतनच्या पाच मूर्ती भिमाण्णा आणि मुकुंदा पाथरवट यांसारख्या स्थानिक कारांगिरांकडून बनविण्यात आल्या. सन 1847 मध्ये मंदिराचे शिखर पूर्ण झाले. या शिखरावर मार्गशीर्ष महिन्यात सुवर्णकलशारोहण झाले. हा कलशारोहण कार्यक्रम मोठया समारंभाने करण्यात आला. मार्गशीर्ष शुध्द नवमी छ. 7 मोहरम शके 1769 म्हणजेच 16 डिसेंबर 1847 रोजी हे कलशारोहण झाले. यासंबंधीच्या नोंदीमध्ये म्हटले आहे, ‘श्री गणपती महाराज पंचायतन संस्थान सांगली याचे देवालयाचे सिखरावरील कलस तांब्याचा केला होता. त्याजवर सोन्याचा मोलामा करून आज सतावीस घटका दिवसानंतर पंधरा पळात बसविला. श्रीस पेढे व साखर वाटली. पाच तोफांचे बार केले.

त्यानंतर काही दिवसांनी तत्कालीन ब्रिटीश अधिकारी इनविरटीसाहेब सांगलीत आले होते. त्यांना गणपती मंदिर दाखविले. त्यावेळी त्यांनी हे शिखर पाहिले. या संबंधी चार जानेवारी 1848 ची नोंद उपलब्ध आहे, त्यामध्ये म्हटले आहे ‘देवलाचे कलस सोन्याचे मुलाम्याचे वर बसविले ते दाखविले’

शिखराचे कळस बसविण्यासाठी 1564 रूपये तीन आणे खर्च झाल्याची नोंद आहे. तांब्याच्या कळसाच्या आत खैराच्या लाकडाचा कळस तयार केला होता. त्यासाठी खैराचे लाकूड कोकणातून आणले होते. तांब्याचा कळस कुमारी नावाच्या कारागिराकडून आणि मोनाप्पा तांबट याच्याकडून तयार करवून घेण्यात आला. गणपतीच्या मंदिरावर सोन्याचा कळस बसविण्यासाठी रयतेनही देणगी दिली. 14 मे 1849 रोजी चिंतामणराव आप्पासाहेब मंगळवेढे येथे गेले असता, तेथील रयतेने ही देणगी दिली. त्या नोंदीमध्ये म्हटले आहे, ‘रयत वगैरेंनी सरकारस्वारी आली सबब एwवज रोख दिल्हा. तो 500 रूपये-श्री गणपती महाराज संस्थान सांगली याचे सिखराचे सोनेरी मुलाम्याचे कळस करण्याबद्दल’ असा उल्लेख आहे. गणपती पंचायतनाच्या नैमित्यिक कार्यक्रमाच्या खर्चासाठी संस्थानातील विविध गावातील जमिनी इनाम दिल्या होत्या.

मुख्य मंदिर हे काळय़ा पाषाणातील असून पेशवेकालीन वास्तूकलेचा उत्कृष्ठ नमुना आहे. मंदिरात संगमरवरातील रिध्दी-सिध्दीसह असलेल्या श्री गणेशाची सुबक मूर्ती आहे. मुख्य मंदिराभोवती श्री चिंतामणेश्वर हे श्री महादेवाचे मंदिर, चिंतामणेश्वरी हे देवीचे मंदिर, श्री सुर्यनारायण मंदिर आणि श्री लक्ष्मीनारायण मंदिर अशी चार मंदिरे आहेत. दरवर्षी भाद्रपद शुध्द प्रतिपदा ते पंचमी असा गणेशोत्सव येथे होते. हा उत्सव प्रसिध्द आहे. त्यावेळी कीर्तन, प्रवचने, लळीत असे कार्यकम होत. नामांकित हरदास, गवई आणि नृत्यांगनाचे कार्यक्रम होत.  क्रमश: