|Friday, July 19, 2019
You are here: Home » आवृत्ती » सांगली » बाप्पांच्या आगमनासाठी लगबग, बाजारपेठ सजली , प्रशासनाचीही तयारी

बाप्पांच्या आगमनासाठी लगबग, बाजारपेठ सजली , प्रशासनाचीही तयारी 

प्रतिनिधी/ सांगली

  गणेशोत्सव आणि त्यापाठोपाठ येणाऱया मोहरमची जोरदार तयारी सध्या शहरासह जिल्हयात सुरू आहे. गणेशोत्सव मंडळांची तयारी अंतीम टप्प्यात आली आहे.तर बाप्पांच्या स्वागतासाठी विविध सजावटींच्या वस्तु आणि पुजेच्या साहित्याने बाजारपेठ सजली आहे. गणेशोत्सव निर्विघ्नपणे ,उत्साहात पार पाडण्यासाठी प्रशासनानेही जोरदार तयारी सुरू केली आहे. महापालिका प्रशासनाने  यावर्षी खड्डय़ांसाठी कर आकारणी न करण्याची घोषणा पेल्याने गणेशोत्सव मंडळांना दिलासा मिळाला आहे.

  तर गणेशोत्सवात डॉल्बी आणि अन्य अनावश्यक खर्चाला फाटा देऊन हेल्दी वातावरणात गणेशोत्सव साजरा करण्यासाठी पोलीस प्रशासनाने प्रबोधन बैठकास सुरू केल्या आहेत. गतवर्षी डॉल्बीमुक्त गणेशोत्सव करून त्यामधून शिल्लक राहिलेल्या पैशातून सिमेंट बंधारे बांधण्यात आले आहेत. सांगली पोलीसांचा हा उपक्रम राज्यात आदर्श ठरला होता. त्याचे बक्षीस म्हणून खुद्द मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगलीत येऊन पोलीसांच्या पुढाकाराने बांधलेल्या  सिमेंट बंधाऱयावर तत्कालीन पालीस प्रमुख दत्तात्रय शिंदे यांच्याबरोबर सेल्फी काढला होता. यावर्षीही पोलीसांनी विधायक कार्यक्रमात सातत्य राखण्यासाठी कंबर कसली आहे. जिल्ह्यात पोलीस निहाय बैठका घेण्यास सुरवात केली आहे. गणेशोत्सव मंडळांचे कार्यकर्ते आणि राजकीय नेते यांच्या बैठका घेण्यात येत आहेत. एक गाव एक गणपतीसाठी सहजासहजी कार्यकर्ते तयार होत नाहीत. पण प्रबोधनावर भर दिल्याने त्याला प्रतिसाद चांगला मिळत आहे. कुपवाड आणि सांगली ग्रामीण पोलीस ठाण्याच्या पोलीसांना एक गाव एक गणपती उपक्रमाला चांगले यश आले आहे.

 यावर्षीही एक गाव एक गणपती बरोबरच डॉल्बीमुक्त गणेशोत्सवासाठी पोलीसांनी जोरदार तयारी सुरू केली आहे. सुरवातील डॉल्बीमुक्तीसाठी प्रबोधन करायचे त्यातून न ऐकल्यास कायदेशीर कारवाईचा इशारा अधिकाऱयांनी दिला आहे. त्यामुळे यावर्षी डॉल्बीमुक्तीला यश मिळेलच पण कारवाई करण्याची वेळ पोलीसांना येणार नाही. असा विश्वास अधिकाऱयांना आहे.

 निर्विघ्नपणे उत्सव पार पाडण्यासाठी कारवाईचे हत्यार

निर्विघ्नपणे गणेशोत्सव पार पाडण्यासाठी पोलीसांनी प्रबोधनाबरोबरच कायदेशीर कारवाईचे हत्यार उपसले आहे. गुन्हेगार आणि गुंडाच्या हद्दपारीचे प्रस्ताव प्रांताधिकाऱयाकडे सादर करण्यात आले आहेत. पण त्यांच्या आदेशापर्यंन न थांबता पोलीस अधिक्षकांना असलेल्या अधिकाराचा  वापर करत टोळया तडीपार, गुंडांची हद्दपारी, आदी कारवाया करण्यात येत आहेत. सध्या दोनशेवर गुंड कारवाईच्या चक्रात अडकवण्यात आल्याने गणेशोत्सव निर्विघ्नपणे पार पाडेलच. पण त्यासाठी स्थानिक गुन्हे अन्वेशण, गुंडा विरोधी पथक आणि विशेष पथकाबरोबरच स्थानिक पोलीसांची स्वतंत्र पथके तयार करण्यात आली आहेत.

 सर्वात महत्वाचे म्हणजे गणेशोत्सव मंडळांना विविध परवान्यासाठी त्रास होऊ नये यासाठी प्रशासन आणि कार्यकर्त्यामध्ये सुसंवादाची गरज आहे. सांगली आणि मिरजेत विसर्जन घाटांची जिल्हाधिकारी ,पोलीस प्रमुख आणि मनपा आयुक्तांनी संयुक्त पहाणी केली आहे. शहर स्वच्छता,कचरा उठाव आणि खड्डेमुक्त रस्ते यासाठी नगरसेवक आक्रमक आहेत. तर मंडळांनी रस्त्यावर पाडलेल्या खड्डयांचे यावर्षी पैसे घेण्यात येणार नाहीत. भाजपा पदाधिकारी आणि लोकप्रतिनिधी यांच्यात झालेल्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला आहे.

 एकूणच गणेशोत्सव उत्साहात साजरा करण्यासाठी प्रशासनाने कंबर कसली आहे. तर दुसऱया बाजूला सजावटींच्या वस्तु, पुजेचे साहित्य यांनी बाजारपेठ सजली आहे.दररोज लाखोंची उलाढाल सुरू आहे. महागाई आणि मंदीचे सावट गणेशोत्सवात सरल्याने गणेश भक्तांमध्ये उत्साहाचे वातावरण आहे.