|Monday, April 22, 2019
You are here: Home » आवृत्ती » सांगली » आटपाडीत चित्रकारांची रंग बरसात

आटपाडीत चित्रकारांची रंग बरसात 

प्रतिनिधी/ आटपाडी

आटपाडी एज्युकेशन सोसायटीच्या विजयादेवी क्रिएटिव्ह ग्रुपच्यावतीने आयोजित दुसऱया कला महोत्सवातंर्गत राज्यस्तरीय प्रत्यक्ष निसर्गचित्र स्पर्धेला अभुतपुर्व प्रतिसाद मिळाला. शेकडो कलाकारांनी रंगांची मुक्त उधळण करत आटपाडीला हुबेहुब चित्रबध्द केले. राज्याच्या कानाकोपऱयातून आलेल्या 600 हुन अधिक कलाकारांनी रंगोत्सवाची बरसात करत आटपाडीकरांना मंत्रमुग्ध केले.

जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष अमरसिंह देशमुख यांच्या पुढाकाराने राज्यस्तरीय निसर्गचित्र स्पर्धेला सुरूवात झाली. सकाळी सात ते बारा या वेळेत मुंबई, पुणे, इचलकरंजी, मिरज, सांगली, वेंगुर्ला, रत्नागिरी, बेळगाव, इस्लामपुर, अकलुजसह राज्याच्या कानाकोपऱयातून आलेल्या चित्रकारांनी प्रत्यक्ष निसर्ग चित्र रेखाटण्यास सुरूवात केली. आटपाडीतील विविध मंदिरे, ग्रामपंचायत चौक, बसस्थानक, तलाव, शुकाचार्य परिसरासह अनेक भागात पोहचुन चित्रकारांनी तल्लीन होवुन समोरचे चित्रण कॅनव्हॉसवर उतरविले.

विविध गटातील कालाकारांची ही चित्रकारी पाहण्यासाठी आटपाडीकर अबालवृध्दांनी गर्दी केली. दुपारी कल्लेश्वर मंदिरात सर्व स्पर्धकांच्या चित्रांचे प्रदर्शन मांडुन त्याचे परिक्षण करण्यात आले. चित्रकार सुधीर पवार, प्रा.गणेश पोतदार, प्राचार्य प्रदिप पाटील यांनी चित्रांचे परिक्षण केले. चित्रकार सुधीर पवार यांनी ऍक्रॅलिक ऑन कॅनव्हॉस पेंटींगचे प्रात्यिक्षक सादर केले. विविध रंगछटांची मुक्त उधळण करत त्यांनी चित्राला जिवंत रूप दिले. चित्रकलेतील व चित्रातील खोली कशी असते, याचे विवेचन केले.

आटपाडी एज्युकेशन सोसायटीचे अध्यक्ष अमरसिंह देशमुख, उपाध्यक्ष डॉ.सुभाष कारंडे, प्राचार्य प्रदिप पाटील यांच्यासह मान्यवरांच्याहस्ते विजेत्यांना पारितोषिकांचे वाटप करण्यात आले. म्हसवड येथील ओम कला अविष्कारचे विजय सोनवले व विद्यार्थ्यांनी शहरातील चौका-चौकात अवघ्या काही मिनीटांमध्ये भव्यदिव्य आकर्षक रांगोळय़ा काढुन या स्पर्धेत रंगत आणण्याचे काम केले. त्यांचे उपस्थितांनी कौतुक केले. तर आटपाडीसारख्या ग्रामीण भागात राज्यस्तरीय प्रत्यक्ष निसर्गचित्र रेखाटण्याची स्पर्धा आयोजित करून कलेला व्यासपीठ देण्याचा अमरसिंह देशमुख व सहकाऱयांचा हा उपक्रम अभिमानास्पद असल्याची भावना प्रमुख पाहुणे व कलाकारांनी व्यक्त केली.

राज्यस्तरीय निसर्गचित्र स्पर्धेत खुल्या गटातुन-प्रथम-गजानन शेळके(मुंबई), व्दितीय-संदेश मोरे(पुणे), तृतीय-संदिप कुंभार(इचलकरंजी), चतुर्थ-चैतन्य शिंदे(मिरज), उत्तेजनार्थ-रईस मकानदार(पुणे), दत्तात्रय मागाडे(सांगली), विनायक मुरीबुवा(मिरज), अवधुत करजगी(सांगली), सोहेल सय्यद(अकलुज), वामन तुळसकर(वेंगुर्ला). महाविद्यालयीन गट-प्रथम-अक्षय डांगे(मुंबई), व्दितीय-अनिकेत मुळे(कोल्हापुर), तृतीय-ऋषिकेश मुळे(मुंबई), उत्तेजनार्थ-अभिजित पाटील(सांगली), सादिक गौसीन(इचलकरंजी), अभिजित साळुंखे(सांगली), आशिष सातपुते(कोल्हापुर) यांनी पारितोषिक पटकाविले.

महिला व मुलींच्या गटातून विलेशा कांबळे(इचकरंजी), सुचित्रा फडतरे(सातारा), श्रृती रूगे(पुणे) यांनी पहिले तीन क्रमांक पटकाविले. त्याशिवाय मुग्धा चव्हाण, ऐश्वर्या काटकर, स्वप्नांजली गावडे, पुजा फडके, अमृता भोसले, रूई कमरेकर यांनी उत्तेजनार्थ पारितोषिक पटकाविले. शालेय गटातुन रूपमंजिरी गोसावी, संस्कृती तळे, श्वेता मगर, सिध्दी टिंगरे, सोहल काटे, आजय कबीर, श्रेया कुलकर्णी, राजवीर मोकाशी यांनी पहिले दोन क्रमांक पटकावुन उपस्थितांची वाहवा मिळविली.

अमरसिंह देशमुख यांची कल्पकता

आटपाडी तालुका हा साहित्य व कलेचे माहेरघर आहे. ही ओळख काळानरूप कमी होत आहे. आत्ता नव्याने ही ओळख उठावदार करण्यासाठी आटपाडी एज्युकेशन सोसायटीचे अध्यक्ष अमरसिंह देशमुख हे प्रयत्नशील आहेत. प्रत्येक वर्षी अखिल भारतीय साहित्य संमेलनाच्या अध्यक्षांना निमंत्रीत करणे, कला महोत्सव आयोजित करणे, संगित क्षेत्रातील मान्यवरांना पाचारण करणे असे उपक्रम  राबवत त्यांनी कला-साहित्य-संस्कृतीचे व्यासपीठ जतन केले आहे. त्यांच्या या उपक्रमांमुळे आटपाडीतील साहित्य-कलेचे व्यासपीठ आणखी बळकट होत आहे.

Related posts: