|Wednesday, July 17, 2019
You are here: Home » आवृत्ती » सांगली » कर्मवीर भाऊराव पाटील यांना मरणोत्तर भारतरत्न देण्याचा ठराव

कर्मवीर भाऊराव पाटील यांना मरणोत्तर भारतरत्न देण्याचा ठराव 

वार्ताहर/  म्हैसाळ

रयत शिक्षण संस्थेचे संस्थापक डॉ. कर्मवीर भाऊराव पाटील यांना मरणोत्तर भारतरत्न पुरस्कार देण्याचा ठराव म्हैसाळ ग्रामपंचायती ग्रामसभेत सर्वानुमते मंजूर करण्यात आला. मुबारक सौदागर यांनी ही मागणी केली होती. सभेच्या अध्यक्षस्थानी सरपंच सौ.मनोरमा शिंदे होत्या.

केवळ महाराष्ट्रातच नव्हे, तर देशभरात रयत शिक्षण संस्थेच्या शाखा असून, आशिया खंडात सर्वाधिक शिक्षण संस्थेच्या शाखा असणारी रयत संस्था आहे. याशिवाय व्यवस्थेचा प्रसार करुन गोरगरिबांच्या झोपडीपर्यंत अण्णांनी शिक्षणाची ज्ञानगंगा पोहचविण्याचे काम केले आहे. त्यामुळे त्यांना मरणोत्तर भारतरत्न देण्यात यावा, अशी मागणी सौदागर यांनी केली. या मागणीला अनेकांनी अनुमोदन देऊन ठराव सर्वानुमते मंजूर करण्यात आला. तसेच राज्यातील मराठा, धनगर, मुस्लीम, लिंगायत समाजाला तात्काळ आरक्षण द्यावे, अशा आशयाचा ठराव यावेळी सभेत मांडला.

या सभेस उपसरपंच सौ. लता शिंदे, पुष्पराज शिंदे, सदस्य दिलीप पाटील, नामदेव कोळी, शेखर मराठे, सलीम मुल्ला, धनंजय कुलकर्णी, आप्पासा चौगुले, ए.टी.पाटील, बी.ए.कोगनोळे, आण्णासा पाटील, राजू सौदागर, आरोग्याधिकारी एन.व्ही.खंदारे, तलाठी वैशाली वाले यांच्यासह ग्रामस्थ उपस्थित होते.

यावेळी सामाजिक कार्यकर्ते एम.एन.कांबळे यांनी, जातीच्या दाखल्यासाठी मागण्यात येणारा 50 वर्षांपूर्वीच्या दाखल्याची अट घालू नये. दाखला तात्काळ देण्यात यावा, अशी मागणी केली. तसेच म्हैसाळ येथे छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा उभा करावा, अशी मागणी भाजपाचे सरचिटणीस धनंजय कुलकर्णी यांनी केली. गरजू विद्यार्थ्यांना शैक्षणिक कामासाठी रहिवाशी दाखला तात्काळ मिळावा, अशी मागणी गणेश निकम यांनी केली, या मागण्यांचा ठराव या सभेत मंजूर करण्यात आला.

गावातील अनेकांची नावे अन्नपुरवठा यादीतून काढून टाकण्यात आली आहेत. त्यामुळे गरजू लोकांना याचा लाभ होत नाही. यासाठी पुन्हा सर्व्हे करुन नवीन लाभधारकांची नांवे यादीत समाविष्ट करावीत, अशी मागणी सुशांत घोरपडे यांनी केली. घरकुल आवास योजनेंतर्गत नव्याने प्रस्ताव द्यावेत. त्यामुळे शासनाने सुचविलेल्या निकषास जे पात्र ठरतील, अशा लाभार्थ्यांना त्याचा लाभ होणार आहे, असे ग्रामपंचायत सदस्य परेश शिंदे यांनी ग्रामसभेत सांगितले. सरपंच सौ. मनोगते शिंदे यांनी, ग्रामसभेची थकबाकी भरुन लाईट, पाणी पुरवठा सुरळीत ठेवल्याबद्दल सत्कार करण्याचा ठराव मंजूर केला. अहवाल वाचन ग्रामविकास अधिकारी बी. आर. कुंभार यांनी केले.