|Wednesday, July 17, 2019
You are here: Home » आवृत्ती » सातारा » कुत्र्यांनी खाल्ला मद्यपीचा कान-डोळा

कुत्र्यांनी खाल्ला मद्यपीचा कान-डोळा 

वार्ताहर/ सातारा, एकंबे

मोकाट सुटलेल्या भटक्या कुत्र्यांचा उच्छाद प्रचंड वाढला आहे. या भटक्या  कुंत्र्यांमुळे अनेक ठिकाणी अपघात होतात  तर काही ठिकाणी ही कुत्री टोळक्याने हल्ला चढवतात. रहिमतपूर येथील  मच्छीमार्केट येथे विलास बापूसाहेब माने (वय 70 रा. भैरोबागल्ली रहिमतपूर) हे मद्यधुंद अवस्थेत पडलेले असताना भटक्या कुत्र्यांनी विलास माने यांचा डावा कान व डोळा खाऊन त्यांना जखमी केले. त्यांच्यावर येथील जिल्हा शासकीय रूग्णालयात उपचार सुरू आहे. त्याचबरोबर कोरेगाव येथे पिसाळलेल्या कुत्र्याने 17 जणांना चावा घेतल्याने वातावरण भयभित झाले आहे.

  सातारा, रहिमतपूर, कोरेगाव या ठिकाणी सध्या भटक्या कुत्र्यांचा वावर मोठय़ा प्रमाणावर वाढला आहे. भटक्या कुत्र्यांना जगण्याचा अधिकार आहे असे म्हणत त्यांना मारू नये असा कायदा करण्यात आला आहे. त्यामुळे दिवसेंदिवस या कुत्र्यांची संख्या वाढू लागली आहे. ही भटकी कुत्री  टोळक्याने जमून लहान मुले  व वृद्धांवर हल्ले चढवतात. असाच प्रकार मंगळवारी दुपारी रहिमतपूर येथील मच्छी मार्केटमध्ये झाला.  विलास बापूसो माने हे वृद्ध दारू जास्त पिल्ल्याने तेथेच  पडले . यावेळी त्यांच्या आजूबाजूला कोणीही नव्हते. त्याच्याच फायदा उठवत भटक्या कुत्र्यांच्या टोळक्यांनी त्यांच्यावर हल्ला चढवत त्यांचा डावा डोळा व डावा कान ओरबडून खाल्ला. व्क्तबंबाळ अवस्थेत त्यांना पडलेले पाहून त्यांच्या पुतण्याने सर्व कुत्री दगड मारून हाकलली आणि त्यांना उचलून जिल्हा शासकीय रूग्णालयात दाखल केले.  त्यांची प्रकृती चिंताजनक असल्याचे डॉक्टरांनी सांगितले. 

कोरेगावमध्ये पिसाळलेल्या कुत्र्याचा 17 जणांना चावा

मेनरोडवरील जुना मोटार स्टँड परिसरात मंगळवारी मोकाट कुत्र्यांनी सकाळपासून धुडगूस घातला. एका पिसाळलेल्या कुत्र्याने केलेल्या हल्ल्यात थोडे थोडके नव्हे तर 17 पेक्षा जास्त लोक जखमी झाले. त्यांनी शासकीय ग्रामीण रुग्णालयात धाव घेतली, मात्र तेथे लस नसल्याने सातारा येथील क्रांतिसिंह नाना पाटील जिल्हा रुग्णालयात उपचार घ्यावे लागले. 

   याबाबत अधिक माहिती अशी की, शहरातील जुना मोटार स्टँड परिसरातून बाहेरगावी जाण्यासाठी बसेस असल्याने तेथे नेहमीच गर्दी असते. शहरात मध्यवर्ती असल्याने तसेच जवळ पडत असल्याने अनेकजण या बसस्थानकावर थांबणे पसंत करतात. विद्यार्थ्यांची संख्या देखील लक्षणीय असते. मंगळवारी 12 च्या सुमारास कुत्र्यांचा कळप या परिसरात दाखल झाला. त्यातील एका कुत्र्याने बसस्थानक परिसरातील तब्बल 17 जणांचा चावा घेतला. 

  मृदुला मुकुंद पवार (वय 43), प्रदीप सुर्यकांत पवार (वय 36), किशोर विलास जाधव (वय 55), महेश माणिक जावळे (वय 15) सर्व रा. कोरेगाव यांच्यासह विनोद संपत खताळ (वय 33), रा. हिवरे, हिंदुराव शंकर मतकर (वय 60) रा. तांदुळवाडी, पूजा आनंदा सणस (वय 18) रा. आसरे, शामलाल कटारिया (वय 32) रा. पुसेगाव, संतोष शिंदे (वय 36) रा. एकंबे, गणेश गंगाराम शिंदे (वय 38) रा. जरेवाडी, संजय बाळकृष्ण सावंत (वय 32) रा. ल्हासुर्णे, विजय सदाशिव भोईटे (वय 63) रा. चिमणगाव, सलमान खुदबुद्दीन मुलाणी (वय 20), राजेंद्र आप्पा खंडाईत (वय 48)  जगन्नाथ शंकर कुंभार (वय 58), प्रदीप बाळू माने (वय 35), संकेत उबाळे (वय 16) यांना कुत्र्याने चावा घेतला. त्यांनी ग्रामीण रुग्णालयात जाऊन उपचार घेण्याचा प्रयत्न केला. मात्र कोरेगावात लस उपलब्ध नसल्याने सातारा येथील जिल्हा सर्वसाधारण रुग्णालयात जाण्यास सांगण्यात आले. त्याप्रमाणे सर्वांनी सातारा येथे उपचार घेतले आहेत.