|Friday, November 16, 2018
You are here: Home » आवृत्ती » सातारा » वाठार स्टेशन येथे शिक्षक कुटुंबावर खुनी हल्ला

वाठार स्टेशन येथे शिक्षक कुटुंबावर खुनी हल्ला 

प्रतिनिधी/ सातारा

 वाठार स्टेशन येथील एका कुटुंबावर शेजारीच राहणाऱया नातेवाईकांनी खुनी हल्ला चढविला. यामध्ये वाठार स्टेशन येथील शिक्षक प्रकाश कांबळे हे गंभीर जखमी झाले आहेत तसेच त्यांच्या कुटुंबीयांनाही या आपल्या नातेवाईकांकडून मोठय़ा प्रमाणावर मारहाण करण्यात आलेली आहे.

पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार प्रकाश कांबळे हे भाडळे येथील रा. वि. तारळकर या शाळेत शिक्षक म्हणून कार्यरत आहेत. शनिवारी सकाळची शाळा असल्याने ते लवकर घरी आले होते. घरी आल्यानंतर ते आपल्या प्राची लेडीज शॉपी या दुकानामध्ये शाळेचे लिखाणाचे काम करत असताना सायंकाळी पावणेपाचच्या दरम्यान शेजारी राहणाऱया लक्ष्मी नारायण कांबळे या प्रकाश कांबळे यांच्या पत्नी सौ. उर्मिला यांना म्हणाल्या, आमचा घेवडा का तुडवला, आमच्या विटा का घेवडय़ात पाडल्या. यावर लक्ष्मी कांबळे आणि प्रकाश कांबळे यांच्यात शाब्दिक बाचाबाची झाली.

या बाचाबाचीनंतर प्रकाश कांबळे हे पुन्हा आपल्या चुलत भाऊ संतोष शामराव कांबळे यांच्यासमवेत दुकानात बसले होते. अचानक रात्री साडेसात वाजण्याच्या सुमारास सहा ते सात लोकांच्या जमावाने लाकडी दांडके, लोखंडी गज यांच्या साहाय्याने प्रकाश कांबळे, पत्नी सौ. उर्मिला, चुलत भाऊ संतोष शामराव कांबळे यांना बेदम मारहाण करण्यात आली. या मारहाणीत प्रकाश कांबळे यांच्या डोक्याला लागल्याने मोठय़ा प्रमाणावर रक्तस्राव होऊ लागला व ते समोर असणाऱया श्री गुरु हॉस्पिटलमध्ये जात असताना देखील प्रकाश कांबळे यांना मागून या सहा ते सात लोकांच्या जमावाने मारहाण केली. यामध्ये अशोक नारायण कांबळे, लक्ष्मी नारायण कांबळे, संतोष नारायण कांबळे, संतोष नारायण कांबळे यांच्या पत्नी नाव माहित नाही सर्व रा. वाठार स्टेशन, महेश वर्पे रा. कापशी, तसेच एक अज्ञात व्यक्ती यांनी मोठय़ा प्रमाणावर प्रकाश कांबळे यांच्या कुटुंबीयांवर शनिवारी रात्री खुनी हल्ला चढविला.

प्रकाश कांबळे, सौ. उर्मिला कांबळे व संतोष शामराव कांबळे यांना शनिवारी रात्री पिंपोडे बुद्रुक येथील ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आले. रात्री उशिरा पोलीस ठाण्यामध्ये गुन्हा दाखल झाला. अधिक तपास स.पो.नि. मारुती खेडकर, महिला कॉन्स्टेबल वैराट करत आहेत.

हाकेच्या अंतरावरच खुनी हल्ला

 वाठार स्टेशन येथील शिक्षक प्रकाश कांबळे यांच्या घरापासून वाठार पोलीस ठाणे हाकेच्या अंतरावर आहे. हा खूनी हल्ला पाऊण तास चाललेला असताना तसेच या परिसरात जोरदार आरडाओरडा चाललेला असताना हाकेच्या अंतरावर असणाऱया पोलिसांना कसे काय ऐकू आले नाही हा प्रश्न वाठार स्टेशन पंचक्रोशीतील नागरिकांना पडला आहे.

 

Related posts: