दरोडय़ाच्या तयारीत असलेली टोळी जेरबंद

स्थानिक गुन्हे शाखेची उल्लेखनिय कामगिरी, तडीपार आरोपीसह चौघांना अटक
प्रतिनिधी / सातारा
पोलिसांनी जिल्हय़ातून हद्दपार केलेला आरोपी अविनाश विलास दडस (रा. आरफळ ता. सातारा) याने हद्दपारीच्या आदेशाचे उल्लंघन करून चार साथीदारांना घेवून बिबी (ता. फलटण) गावच्या हद्दीत दरोडा घालण्यासाठी एकत्र जमले असताना स्थानिक गुन्हे शाखेने त्यांच्यावर छापा टाकुन तलवार, मिरची पुड व आदी साहित्यासह ताब्यात घेवून त्यांच्यावर गुन्हा दाखल केला. यामध्ये एक आरोपी मात्र पळुन गेला. या आरोपींकडुन आणखी जबरी चोरी, घरफोडी यासारंखे गंभीर गुन्हे उघडकीस येण्याची शक्यता आहे.
सातारा जिल्हा मालमत्ता चोरी अभिलेखावरील सराईत गुन्हेगार टोळी प्रमुख अविनाश विलास दडस यास सातारा जिल्हय़ातील दोन वर्षा करिता तडीपार करण्यात आले होते. तरीही तो तडीपारीच्या आदेशाचे उल्लंघन करून चार साथीदारासह सातारा जिल्हय़ात वावरत असल्याचे खात्रीशीर बातमी स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक पद्माकर घनवट यांना मिळाली. त्यानुसार साहाय्यक पोलीस निरीक्षक विकास जाधव यांच्या अधिपत्याखाली एक पथक तयार करून या पाच जणांचा शोध घेण्याचा प्रयत्न केला असता हे पाच जण पावर हाऊसच्या पुढे बिबी (ता. फलटण) गावच्या हद्दीत दरोडा घालण्याच्या पुर्वतयारीनिशी एकत्र जमले होते. त्यावेळी पोलिसांनी संशयितपणे बसलेल्या इसमांवर छापा टाकला. तेव्हा त्यातील एक जण मोटर सायकलवरून पळुन गेला.
ताब्यात घेतलेल्या चार जणांची चौकशी करून झडती केली असता त्यांच्या ताब्यात 25 इंच लांबीची तलवार मिळून आली तर दुसऱया इसमाकडे प्लास्टिकच्या पिशवीत मिरची पूड मिळून आली. या चौघांना ताब्यात घेवून लोणंद पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला.
ही कारवाई पोलीस अधीक्षक पंकज देशमुख, अप्पर पोलीस अधीक्षक यांच्या सुचनांप्रमाणे व स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाचे पोलीस निरीक्षक पद्माकर घनवट यांच्या मार्गदर्शनाखाली विकास जाधव, सुरेंद्र पानसांडे, मोहन घोरपडे, उत्तम दबडे, नितीन गोगावले, संतोष पवार, प्रमोद सावंत, नीलेश काटकर, रविंद्र वाघमारे, मोहसिन मोमीन, मयुर देशमुख, विजय सावंत यांनी सहभाग घेतला.