|Thursday, April 18, 2019
You are here: Home » आवृत्ती » बेळगांव » राहुल दिवटगी खूनप्रकरणी राम चोटीवालेस अटक

राहुल दिवटगी खूनप्रकरणी राम चोटीवालेस अटक 

पोलिसांची संदिग्ध भूमिका कायम, सीपीआय बनलेत मौनीबाबा, पोलीस आयुक्तांचे एकही भाष्य नाही

प्रतिनिधी/ बेळगाव

दुर्दैवी राहुल दिवटगी हा नुसता बेपत्ता नसून त्याचा घातपाताने खून झाला आहे, हे टिळकवाडी पोलिसांना अखेर मान्य करावे लागले आहे. सोमवारी तिलारी घाटात राहुलचा मृतदेह हाती लागल्यानंतर मंगळवारी या प्रकरणी राम कृष्णा चोटीवाले (वय 35, रा. आदर्शनगर) याला पोलिसांनी अटक केली आहे. राहुल बेपत्ता झाला तेव्हाच त्याच्या कुटुंबीयांनी राम याच्यावर संशय व्यक्त केला होता. त्याने घातपात केल्याचा आरोपही केला होता. मात्र, तब्बल 23 ते 24 दिवस टिळकवाडी पोलिसांनी या प्रकरणात वेळकाढूपणाच केल्याचे आता सिद्ध होत असून पोलीस आयुक्तांनी इतक्मया गंभीर प्रकरणाबद्दल अजूनही आपली प्रतिक्रिया न दिल्याने संदिग्ध भूमिका कायम आहे.

25 दिवसांपूर्वी आदर्शनगर, लक्ष्मी गार्डनजवळून बेपत्ता झालेल्या अन्नपूर्णेश्वरीनगर, येळ्ळूर रोड, वडगाव येथील तरुणाचा अखेर खून झाल्याचे सोमवारी उघडकीस आले. कुटुंबीयांनी पोलीस स्थानकाचा रोज उंबरठा झिजवूनही त्यांच्यावरच गुन्हा दाखल करण्याची धमकी देणाऱया पोलिसांनी या प्रकरणाकडे गांभीर्याने पाहिले नव्हते. पाठपुरावा करूनही टिळकवाडी पोलिसांनी गांभीर्याने तपास केला नव्हता. तरुण भारतने आवाज उठविल्यानंतर खडबडून जागे झालेली पोलीस यंत्रणा सोमवारी तिलारी घाट (स्वप्नवेल मार्गावर) परिसरात पोहोचली होती. राहुलचा मृतदेह पोत्यात कोंबलेल्या स्थितीत आढळून आल्यानंतर पोलिसांना अखेर पुढील कारवाई हाती घ्यावीच लागली आहे.

टिळकवाडी पोलिसांनी मंगळवारी राम चोटीवाले याला अटक करून  न्यायालयासमोर हजर केले. सिव्हिल हॉस्पिटलमध्ये त्याची वैद्यकीय तपासणी करून त्याला हिंडलगा कारागृहात पाठविण्यात आले. या संदर्भात नेमका काय तपास सुरू आहे? याची माहिती देण्यास टिळकवाडी पोलिसांनी टाळाटाळ सुरू केली आहे. टिळकवाडीचे निरीक्षक या संदर्भात तोंड उघडण्यास तयार नसल्याने या संदर्भातील त्यांची मौनीबाबाची भूमिका अधिक संशय निर्माण करत असून याची संपूर्ण शहरात चर्चा सुरू आहे.

तुम्हालाच आरोपी करतो…

राहुल शरणाप्पा दिवटगी (वय 27) हा शुक्रवार दि. 10 ऑगस्टपासून बेपत्ता होता. त्याचे वडील शरणाप्पा व मोठा भाऊ राजेश यांनी दि. 11 ऑगस्टपासून या संदर्भात टिळकवाडी पोलिसांकडे धाव घेतली होती. तसेच घातपाताचा संशयही व्यक्त केला होता. मात्र 15 ऑगस्टपर्यंत त्याची दाद घेण्यात आली नव्हती. 15 ऑगस्ट रोजी युवक बेपत्ता अशी फिर्याद दाखल करून घेण्यात आली. मात्र, त्या संदर्भात माध्यमांनाही कळविण्यात आले नाही. अखेर दि. 18 रोजी त्याच्या कुटुंबीयांनीच आपला मुलगा कोठे आढळल्यास कळवा, अशी विनंती करणारी बातमी माध्यमांकडे पोहोचविली होती. 28 पर्यंतही राहुल परत न आल्याने व  पोलिसांनी तपास न केल्याने त्याच्या कुटुंबीयांनी पोलीस आयुक्तांकडे धाव घेतली. मात्र वरि÷ांकडे का गेलात? तुम्हालाच आरोपी करतो, अशी धमकी त्यांना देण्यात आली होती.

या संदर्भात तरुण भारतने आवाज उठविल्यानंतर राहुलच्या कुटुंबीयांना घेऊन  टिळकवाडी पोलीस सोमवारी सकाळी तिलारीला गेले होते. मुख्य रस्त्यापासून सुमारे 20 फूट खोलावर पोत्यात बांधून टाकण्यात आलेला मृतदेह त्यांना सापडला.  राहुलचा मृतदेह तिलारी घाटात टाकून दिल्याचे उघडकीस येताच रविवारी रात्री टिळकवाडी पोलिसांनी त्याच्या कुटुंबीयांशी संपर्क साधून रात्री 11.15 वाजण्याच्या सुमारास खुनाचा गुन्हा दाखल करून घेतला होता. त्यानंतर सोमवारी सकाळी 7 वाजता पोलीस अधिकारी कुटुंबीयांसह तिलारीला रवाना झाले होते. पोलिसांनी वेळीच या प्रकरणाची गांभीर्याने दखल घेतली असती तर आतापर्यंत तपास पूर्ण झाला असता. मात्र, मृतदेहाचा शोध घेणे का लांबविण्यात आले? याचे उत्तर अद्याप सापडू शकलेले नाही.  बेळगावच्या पोलीस आयुक्तांनी या संदर्भात माध्यमांशी अधिकृत बातचित न केल्याने या प्रकरणासंदर्भात संशय अधिकच बळावत चालला आहे.

मृतदेह सापडला कसा?

पोलिसांनी आरोपींना वाचविण्याचे प्रयत्न केल्याच्या आरोपाला त्यांच्या उलटसुलट कारभाराने दुजोराच मिळू लागला आहे. कोणत्याही प्रकरणात आरोपीला अटक केल्यानंतर त्याने दिलेल्या जबाबावरून मृतदेहाची माहिती कळते. या प्रकरणात पोलिसांना पहिल्यांदा मृतदेह सापडला व त्यानंतर आरोपीला अटक करण्यात आली आहे. यामुळे मृतदेह तिलारी घाटात टाकण्यात आला होता, याची माहिती मिळाली कशी? याबद्दल संशय आहे. तिलारी घाट चंदगड पोलीस स्थानकाच्या हद्दीत येतो. तिलारी घाटात मृतदेह सापडल्याची वर्दी कुणीच चंदगड पोलिसांना दिली नव्हती. तसेच मृतदेह सापडेपर्यंत चंदगड पोलिसांनाही या घटनेची माहिती नव्हती. दरम्यान, आरोपीला पकडण्यापूर्वी मृतदेह तिलारी घाटात असल्याचा दृष्टांत टिळकवाडी पोलिसांना कसा झाला? तेथे पोलीस नेमके कसे पोहोचले? हा संशोधनाचा विषय ठरला आहे. 

Related posts: