|Friday, July 19, 2019
You are here: Home » Top News » विविध मागण्यासाठी सरकारविरोधात शेतकरी मजूर पुन्हा रस्त्यावर

विविध मागण्यासाठी सरकारविरोधात शेतकरी मजूर पुन्हा रस्त्यावर 

ऑनलाईन टीम / नवी दिल्ली :

महागाई, कर्जमाफी यांच्यासह विविध मागण्यांसाठी देशातील शेतकरी आणि मजूर सरकारविरोधात रस्त्यावर उतरले आहेत. रामलीला मैदानापासून सुरू झालेला शेतकऱयांचा मोर्चा संसद मार्गांपर्यंत पोहोचला. या आंदोलनात देशभरातील शेतकरी आणि मजूरांचा सहभाग आहे. महापूराचा फटका बसलेल्या केरळचे शेतकरीदेखील यामध्ये सहभागी झाले आहेत.

शेतकऱयांच्या आंदोलनामुळे दिल्लीतील अनेक रस्त्यांवर वाहतूककोंडी झाली आहे. त्यामुळे काही रस्त्यांवरुन प्रवास न करण्याच्या सूचना दिल्लीतील वाहतूक पोलिसांकडून देण्यात आल्या आहेत. निवडणुका येतील आणि जातील. मात्र सरकारचे शेतीबद्दलचे धोरण चुकीचे आहे, अशा भावना शेतकऱयांकडून व्यक्त करण्यात येत आहेत. सरकारने शेतकरी आणि मजूरांबद्दलची धोरणं बदलायला हवीत, अशी मागणीदेखील आंदोलकांकडून करण्यात येत आहे. ऑल इंडिया किसान महासभेकडून या आंदोलनाचे नेतृत्त्व केले जात आहे. डाव्या संघटनांचा या आंदोलनात सहभाग आहे. त्यामुळे दिल्लीच्या रस्त्यावर सध्या लाखो शेतकरी आणि मजूर पाहायला मिळत आहे. मोदी सरकार शेतकरीविरोधी असल्याचा आरोप डाव्या संघटनांनी केला आहे. जास्तीतजास्त शेतकरी आणि मजूरांनी आंदोलनात सहभागी व्हावे, असे आव्हान संघटनांकडून करण्यात आले आहे. सर्व मजूरांना प्रति महिना किमान 18 हजार रुपये भत्ता, रोजगार, खाद्य वितरण व्यवस्थेत सुधारणा, मजूर कायद्यात बदल, स्वामीनाथन आयोगाच्या सूचनांची अंमलबजावणी, शेतकऱयांना कर्जमाफी अशा आंदोलकांच्या मागण्या आहेत