|Saturday, July 20, 2019
You are here: Home » संपादकिय / अग्रलेख » गोव्यात बिगर गोमंतकीयांची संख्या वाढत आहे…

गोव्यात बिगर गोमंतकीयांची संख्या वाढत आहे… 

गोव्यात बिगर गोमंतकीयांची संख्या पोहोचली आहे ती साडेसहा लाखांच्या घरात. ही आपल्यासाठी धोक्याची घंटा आहे. गोव्याच्या साडेआठ लोकसंख्येला ते कधी भिडतील, ते आपल्याला कळणारदेखील नाही. त्यापूर्वीच कुठेतरी ठोस उपाययोजना आखणे आवश्यक आहे.

गोव्याची एकूण लोकसंख्या पंधरा लाख. त्यात मूळ गोमंतकीय साडेआठ लाख तर बिगर गोमंतकीयांची संख्या साडेसहा लाख आहे. बिगर गोमंतकीय व मूळ गोमंतकीय यांच्यात अंतर राहिले ते दोन लाख लोकसंख्येचे. ज्या पद्धतीने बिगर गोमंतकीय गोव्यात येतात, ते पाहता लोकसंख्येची आकडेवारी समान होण्यास फार मोठा कालावधी लागणार नाही आणि गोव्यात जेव्हा आकडेवारी समान होईल, तेव्हा गोवेकर खऱया अर्थाने आपल्या अस्तित्वासाठी धडपड करणार आहे. त्यापूर्वीच उपाययोजना आखणे ही काळाजी गरज बनली आहे.

हल्लीच मडगाव शहरात झालेल्या एका कार्यक्रमात गोव्याचे महसूलमंत्री रोहन खंवटे यांनी गोव्यातील लोकसंख्येवर भाष्य करताना वरील आकडेवारी उपस्थितांसमोर ठेवली. तेव्हा अनेकांना ही आकडेवारी ऐकून आश्चर्याचा धक्काच बसला. पंधरा लाख लोकसंख्येत साडेआठ लाख मूळ गोमंतकीय तर साडेसहा लाख बिगर गोमंतकीय. गोव्यावरील गोमंतकीयांचा पगडा ढिला होतोय का असा सवाल अनेकांच्या मनाला स्पर्श करून गेला आहे. गोव्यात बिगर गोमंतकीयांची लोकसंख्या एवढी का व कशासाठी झाली, हा संशोधनाचा प्रश्न असला तरी गोव्याच्या स्वातंत्र्य काळापासूनच बिगर गोमंतकीयांचे गोव्यात आगमन होऊ लागले. ते आजवर कायम आहे.

बिगर गोमंतकीय गोव्यात का आले, याची अनेक कारणे असली तरी प्रामुख्याने  गोव्यात बांधकाम व्यवसाय फोफावला, तेव्हापासून बिगर गोमंतकीयांची संख्या गोव्यात वाढू लागली. बांधकाम व्यवसायात विविध कामगारांची गरज भासते व ही गरज गोव्यात पूर्ण होत नाही. बांधकाम व्यवसायातील कामे ही अति श्रमाची असतात. त्यामुळे गोव्यातील युवक बांधकामाच्या ठिकाणी काम करू पहात नसल्याने बिल्डरांना आधार ठरतो, तो बिगर गोमंतकीयांचाच.

बांधकाम क्षेत्रात काम करण्यासाठी पूर्वी शेजारील कर्नाटक व महाराष्ट्रातील कामगार वर्ग यायचा पण आज छत्तीसगड, बिहार, राजस्थान या राज्यातील कामगार वर्ग गोव्यात पोहोचला आहे. हा कामगार वर्ग एकदा गोव्यात आला की, पुन्हा मूळ गावी जाण्याचा विचार करत नाही. कुठेतरी लहानशी झोपडी साकारायची व त्यात संसार थाटायचा. कालांतराने आपल्या नातेवाईकांना पण या ठिकाणी आणायचे. हा जणू त्यांचा नियमच बनला आहे. मुले-बाळे झाली की, त्यांना याच ठिकाणी शिक्षणासाठी पाठवायचे.  बांधकाम क्षेत्रासाठी येणाऱया कामगार वर्गाला पुन्हा माघारी पाठविण्याची व्यवस्था  ना त्याचा ठेकेदार करतो, ना बिल्डर. त्यामुळे या ठिकाणी आलेला कामगार वर्ग माघारी न जाता, याच ठिकाणी संसार थाटतो, ही मोठी गंभीर समस्या बनून राहिली आहे. सरकारने यावर आता कुठेतरी ठोस उपाययोजना आखण्याची वेळ आली आहे. इमारतीचा प्रकल्प पूर्ण झाल्यावर या कामगार वर्गाला पुन्हा आपल्या मूळ गावी पाठवून देणे, ही काळाची गरज बनली आहे. आजवर असा प्रयत्न कधी झाला नसला तरी ‘गोंय, गोंयकार व गोंयकारपणा’ची भाषा बोलणाऱया सरकारला आता कृती करावीच लागेल. अन्यथा सध्या जो दोन लाख लोकसंख्येचा फरक आहे, तो भरून निघण्यास वेळ लागणार नाही.

केवळ बांधकाम क्षेत्रातच नव्हे तर इतर अनेक व्यवसायात आज बिगर गोमंतकीयांनी या ठिकाणी बस्तान मांडले आहे. गोव्यात काही पारंपरिक व्यवसाय होते, ते सुद्धा गोवेकरांच्या हातून निसटले आहेत. हे व्यवसाय आता बिगर गोमंतकीयांनी आपल्या ताब्यात घेतले आहेत. पारंपरिक व्यवसाय गोवेकरांच्या हातातून निसटण्यास गोवेकरच जबाबदार ठरले आहेत कारण गोवेकरांना श्रमाचे काम करणे आवडत नाही. त्याचबरोबर काही व्यवसाय करणे कमीपणाचे वाटू लागले. हे व्यवसाय मालकांनी भाडेपट्टीवर बिगर गोमंतकीयांना दिले. साहजिकच पारंपरिक व्यवसायावर बिगर गोमंतकीयांनी आपला कब्जा केला आहे. गोव्यात खास करून केश कर्तनालय, मासळी बाजार, भाजी मार्केट, फळांचे मार्केट, बेकरी व्यवसाय इत्यादींमध्ये बिगर गोमंतकीय मोठय़ा प्रमाणात आले आहेत. पूर्वी हे व्यवसाय गोवेकरांच्या हाती होते व त्यावर त्यांचे वर्चस्व होते. या व्यवसायात बऱयापैकी कमाई व्हायची, तरीसुद्धा हे व्यवसाय करणे म्हणजे अनेकांना कमीपणाचे वाटू लागले व त्यांनी हे व्यवसाय भाडेपट्टीवर बिगर गोमंतकीयांच्या हातात दिले. आता त्यांनी या व्यवसायात बऱयापैकी जम बसविला आहे. गोव्यातील कुठल्याही शहराला भेट द्या, वरील सर्व व्यवसायात बिगर गोमंतकीय आढळून येतील. हल्ली तर वाहनांचे गॅरेज असो मिठाईचे दुकान किंवा रस्त्याबाजूचे कपडय़ांचे दुकान त्या ठिकाणीसुद्धा बिगर गोमंतकीयच. गोव्यातील पालिकांमध्ये तर बिगर गोमंतकीयांची संख्या लक्षणीय आहे. पालिका क्षेत्रातील कचरा हटविण्याचे काम हे बिगर गोमंतकीय करतात. म्हणूनच आज आपली शहरे स्वच्छ होण्यास मदत होते. अन्यथा काय परिस्थिती उद्भवली असती, याचा विचार करणे देखील कठीण आहे.

आज शेती-बागायतीत काम करण्यासाठी स्थानिक कामगार वर्ग मिळत नाही. ही मोठी गंभीर समस्या बनली आहे. त्यामुळे शेती-बागायतीत काम करण्यासाठी मदत घ्यावी लागते ती बिगर गोमंतकीय मजुरांची. गोव्यातील औद्योगिक वसाहतीत कुशल कामगार वर्ग मिळत नसल्याने, इंडस्ट्रिजना कुशल कामगार इतर राज्यांतून घ्यावे लागतात. आपले गोवेकर इतर राज्यांनी एवढय़ा मोठय़ा संख्येने कुठेच स्थायिक झालेले आपल्याला आढळून येणार नाही.

एकूणच गोव्यात बिगर गोमंतकीयांची संख्या पोहोचलीय ती साडेसहा लाखांच्या घरात. ही आपल्यासाठी धोक्याची घंटा आहे. गोव्याच्या साडेआठ लोकसंख्येला ते कधी भिडतील, ते आपल्याला कळणारदेखील नाही. त्यापूर्वीच कुठेतरी ठोस उपाययोजना आखणे आवश्यक आहे. अन्यथा ‘गोंय, गोंयकार, गोंयकारपणा’ची भाषा ही केवळ नावापुरतीच ठरेल…..

महेश कोनेकर