|Friday, July 19, 2019
You are here: Home » संपादकिय / अग्रलेख » रावण स्वप्नात आला

रावण स्वप्नात आला 

काल स्वप्नात चक्क रावण आला आणि मी घाबरलो. त्याच्या खांद्यावर एकच मुंडकं होतं. खांद्यावरच्या नऊ जखमांमधून रक्त वाहत होतं.

“भिऊ नकोस,’’ तो म्हणाला, “मी ओरिजिनल रावण आहे. पण आता जिवंत नाही. प्रभू रामचंद्रांच्या हातून मला मरण आलं. माझ्या चुकीची मला शिक्षा मिळाली. मृत्यूनंतर त्यांनी माझ्या देहावर अंत्यसंस्कार केले आणि मृत्यूनंतर वैर संपल्याचं घोषित केलं. मला मुक्ती मिळाली.’’

“माझ्या स्वप्नात का आला आहेस?’’

“मला शिक्षा केल्यावर माझ्याशी असलेले वैर संपुष्टात आणणाऱया प्रभू रामचंद्रांचा मी आता भक्त झालो आहे. पृथ्वीतलावर कोणी रामचंद्रांची बदनामी केली की मला यातना होतात, बदनामी करणाऱया लोकांचा राग येतो. दरवषी रामलीला मैदानावर तुम्ही माझ्या प्रतिमेचे दहन करता. पण तुमच्या ह्रदयात जो वाट चुकलेला रावण आहे, त्याचं दहन केव्हा करणार? मी सुधारलो. तुम्ही केव्हा सुधारणार? मुंह में राम और बगल में छुरी–ही वृत्ती तुम्ही केव्हा सोडणार?’’

“पण असं नेमकं झालं तरी काय? माझ्याकडून काही चुकलं का?’’

“तू नाही रे. पण तू ज्या कलियुगात राहतोस त्या कलियुगात असंख्य रावण सर्वत्र वावरताहेत. आईबापांनी मुलाचं नाव राम ठेवलं. पण रामासारखे वागण्याचे संस्कार केले नाहीत. रामाचं नाव धारण करून रावण, दु:शासन वगैरे लोकांना देखील लाज वाटावी अशी वक्तव्ये काही लोक करीत असतात आणि त्यांचे हितचिंतक साधा निषेध देखील करीत नाहीत.’’

“कोण आहेत हे रामाला बदनाम करणारे?’’

“परवा आमच्या भगवान कृष्णाचा जन्मोत्सव होता. कृष्णानं बालपणी गोकुळात शिंक्मयावर टांगलेल्या मडक्मयातलं दही खाल्लं. कलियुगातले रावण या गोष्टीचा भडक इव्हेंट करतात, उंच थर लावतात. त्यात दरवषी अनेक गोविंदा प्राण गमावतात किंवा कायमचे अपंग होतात. एका रामनामधारी पुढाऱयानं परवा अशा कार्यक्रमात तरुणांना जाहीर आवाहन केलं की तुम्हाला जी मुलगी आवडेल तिला तिच्या मर्जीविरुद्ध पळवून न्या. मुलीच्या अपहरणात तो पुढारी तरुणांना मदत करणार आहे.’’

“बाप रे, अशा पुढाऱयांना पाठीशी घालणारांना मी कधीच मत देणार नाही.’’

“हेच मला ऐकायचं होतं,’’ रावण म्हणाला आणि अदृश्य झाला.