|Monday, April 22, 2019
You are here: Home » आवृत्ती » रत्नागिरी » आजपासून रिक्षा भाडेवाढ

आजपासून रिक्षा भाडेवाढ 

1.6 किमीच्या टप्प्यासाठी 27 रूपये

पुढील टप्प्यासाठी 17 रूपये भाडे

आरटीओ विनोद चव्हाण यांची माहिती

प्रतिनिधी /रत्नागिरी

पेट्रोल दरवाढीमुळे त्रस्त झालेल्या रिक्षा व्यावसायिकांना शासनाने दिलासा देताना तब्बल पाच वर्षानंतर भाडे वाढ जाहीर करण्यात आली आहे. मंगळवारी सायंकाळी जाहीर करण्यात आलेल्या या भाडेवाढीच्या निर्णयानुसार आता पहिल्या 1.6 किमीच्या टप्प्यासाठी 27 रूपये तर पुढील टप्प्यासाठी 17 रूपये भाडे निश्चित करण्यात आले आहे. या नव्या दरांची अंमलबजावणी 7 सप्टेंबरपासून होणार आहे. शासनाच्या या निर्णयाचे रिक्षा व्यावसायिकांमधून स्वागत होत आहे.

यापुर्वी 2013 मध्ये रिक्षा भाडेवाढ जाहीर करण्यात आली होती. त्यावेळी पहिल्या 1.6 किमी ला 20 रू. व त्यापुढील टप्प्यासाठी 13 रूपये दर देण्यात आला होती. त्यानंतर पेट्रोल दरवाढीचा आलेख चढाच राहीला आहे. पेट्रोलच्या दराने दोन दिवसांपुर्वी नवा उच्चांक गाठला आहे. त्यामुळे रिक्षा व्यावसायिकांना आहे त्या भाडे दरामध्ये प्रवासी वाहतुक करणे अशक्य बनले होते. आरटीओ कार्यालयाने भाडेवाढ न केल्याने अतिरिक्त भाडय़ावरून वादावादीचे प्रकार सुरू होते. मीटर न लावताच वाहतूक करण्याचा पर्यायही अनेकांनी स्वीकारला होता. मात्र त्यांच्यावर कारवाईचा बडगा उगारण्यात आल्याने व्यावसायिक चांगलाच कात्रीत सापडला होता. त्यामुळे रिक्षा व्यावसायिक संघटनांकडून वारंवार नवी भाडेवाढ जाहीर करण्याची मागणी होत होती.

अखेर मंगळवारी सायंकाळी राज्य सरकारने घेतलेल्या निर्णयानुसार उपप्रादेशिक परिवहन अधिकारी विनोद चव्हाण यांनी रिक्षा भाडेवाढ झाल्याचे जाहीर केले आहे. प्रादेशिक परिवहन प्राधिकरणाचे अध्यक्ष तथा जिल्हाधिकारी सुनील चव्हाण यांनी घेतलेल्या पुढाकारामुळे 2014 पासून प्रलंबित असलेला रिक्षाभाडे निश्चितीचा निर्णय घेण्यात आला आहे.

रिक्षाच्या मीरटरमध्ये 7 सप्टेंबरपासून सुधारीत भाडे निश्चिती करण्यात आली आहे. मीटरप्रमाणे भाडे न आकारणे किंवा भाडे नाकारणाऱया रिक्षा चालकांविरोधात टोल फ्री क्रमांक 02352229444 वर वाहन क्रमांकासह तक्रार नोंदवावी असे आवाहन आरटीओ विनोद चव्हाण यांनी केले आहे.

निर्णय उशीरा पण योग्य

रिक्षा भाडेवाढी संदर्भात परिवहन विभागाच्या समितीने घेतलेला निर्णय उशीराने घेण्यात आला असला तरी योग्यच आहे. पेट्रोलदरवाढीने त्रस्त झालेल्या रिक्षा चालकांना उशीरा का होईना दिलासा मिळाला आहे. यापुढेही नियमित कालावधीने आढावा घेऊन रिक्षा भाडे दर अद्ययावत करणे गरजेचे आहे.

योगेश घोसाळे

माजी उपजिल्हा संघटक,

रिक्षासेना

Related posts: