|Saturday, July 20, 2019
You are here: Home » आवृत्ती » रत्नागिरी » ट्रेकर्ससाठी उघडले ‘सह्याद्री’चे दरवाजे!

ट्रेकर्ससाठी उघडले ‘सह्याद्री’चे दरवाजे! 

वन्यजीव विभागाची मंजुरी,

पर्यटनस्थळांचाही होणार विकास

महाबळेश्वर ते आंबा घाटादरम्यान 8‘हॉटस्पॉट’,

तिवरे येथील स्थळाचे आज उद्घाटन,

राजेंद्र शिंदे /चिपळूण

वन्यजीव परीक्षण आणि पर्यटनासह ट्रेकींग करणाऱयांसाठी सह्याद्री व्याघ्र प्रकल्पातील बफर झोनचे दरवाजे वन्यजीव विभागाने उघडले आहेत. सह्याद्री व्याघ्र राखीव व स्थानिक ग्रामविकास परिस्थितीय विकास समितीच्या माध्यमातून महाबळेश्वर ते आंबा घाट दरम्यान पर्यटनासह टेकींगसाठी 8 ‘हॉट स्पॉट’ निवडण्यात आले आहे. त्यातील तिवरे येथील स्थळाचे गुरूवारी 6 रोजी उद्घाटन होत आहे.

रायगडसह अन्य जिह्यांमध्ये जंगल पर्यटनासह ट्रेकींग बहरलेले असताना रत्नागिरी जिह्यात मात्र सह्याद्रीच्या पर्वतरांगा, त्यातील अभयारण्ये आणि मुबलक क्षेत्र असतानाही याबाबत म्हणावे तसे प्रयत्न झालेले नाहीत. जिह्याच्या 8248.8 चौ. कि. मी. भौगोलिक क्षेत्रापैकी अवघे 62.59 चौ. कि. मी. एवढे वनक्षेत्र आहे. जिह्याच्या पूर्व सीमेवर सह्याद्री पर्वताच्या उंच रांगा असून या पर्वत शिखरांची ऊंची साधारणतः 400 ते 2000 मीटरपर्यंत आहे. जिह्याला लागूनच कोयना व चांदोली अभयारण्य असल्याने साहजिकच वन्यप्राण्यांचा वावर सह्याद्रीच्या खोऱयात अधिक दिसतो. यातच सह्याद्री व्याघ्र प्रकल्पाची घोषणा झालेली असली तरी त्याचे फायदे जनतेपर्यंत पोहचलेले नाहीत.

रोजगाराच्या नव्या संधी

दरम्यान, सह्याद्री व्याघ्र प्रकल्पाच्या पायथ्याशी वसलेल्या गावांमध्ये या प्रकल्पाच्या माध्यमातून स्थानिकांना रोजगाराच्या संधी उपलब्ध करून देतानाच त्यांचे जीवनमान उंचावण्याच्यादृष्टीने पावले टाकण्यात येत आहेत. पर्यटनस्थळ म्हणून विकसित करण्याच्यादृष्टीने राज्य वन्यजीव विभागाच्या सह्याद्री व्याघ्र राखीव आणि स्थानिक ग्रामविकास परिस्थितीय विकास समितीच्या माध्यमातून विविध सुविधा उपलब्ध करून दिल्या जाणार आहेत. स्थानिकांच्या हाताला काम मिळाले तर जंगलतोड, जंगलातील आगीचे प्रमाण थांबेल, वन्यप्राणी, पशुपक्षी यांनाही धक्का लागणार नाही हा यामागचा उद्देश आहे. यासाठी ट्रेकींग, स्विमींग, होम स्टे, बर्ड वॉचिंग, पानवठय़ावरील पक्षी निरीक्षण, वनमजूर आदीच्या माध्यमातून रोजगार उपलब्ध होताना वन उत्पादन घेण्यासाठीही प्रयत्न होणार आहेत. ट्रेकींगसाठी परमिट, गाईडही उपलब्ध करून दिले जाणार आहेत.

तिवरे पर्यटनस्थळाचा आज शुभारंभ

यामध्ये महाबळेश्वर ते आंबा घाट दरम्यान पायथ्याशी वसलेल्या तिवरेसह तिवडी, ओवळी, नांदिवसे, हेळवाक, नायरी, श्रृंगारपूर अशा गावे पर्यटनस्थळ म्हणून विकसित करण्यासाठी निवडण्यात आली आहेत. यातील तिवरे येथील स्थळाचे गुरूवारी आमदार सदानंद चव्हाण यांच्याहस्ते उद्घाटन होत आहे. तिवरे हे चिपळूणपासून 31 कि. मी. अंतरावर आहे. तेथे धरणासह समृध्द जंगल आहे. ट्रेकींगसाठी बैल घाट व माकड वाट अशी दोन अवघड ठिकाणे आहेत. तेथूनच मालदेव जवळ आहे. सह्याद्री व्याघ्र प्रकल्पातील कोअरझोनपर्यत जाऊन तेथून मालदेवचे दर्शन होणार आहे. तिवडीतून झुंगटी हे ठिकाण प्रसिध्द आहे. त्यानंतर हेळवाक येथून रामबाण, भैरवगड, पुढे नायरी, श्रृंगारपूर येथून प्रचितगड अशी महत्वाची स्थळे आहेत.

या परिसरातील जंगलभ्रमंतीसह पक्षांच्या शेकडो प्रजाती, वन्यजीवांसह प्राणी यांचे दर्शन सहजरित्या होणारे आहे. दरम्यान, त्या-त्या गावात स्थानिक समित्या स्थापन करण्यात येणार आहेत. यासाठी येथील निसर्गसेवक तसेच ग्लोबल चिपळूण पर्यटनसंस्था सहकार्य करत आहेत.