|Saturday, July 20, 2019
You are here: Home » आवृत्ती » सिंधुदुर्ग » ‘गोवर – रुबेला’ आजार घातक!

‘गोवर – रुबेला’ आजार घातक! 

1.30 लाख मुलांचे लसीकरण करणार – विजय जोशी

प्रतिनिधी / सिंधुदुर्गनगरी:

 गोवर आणि रुबेला हा विषाणूजन्य आजार अतिशय घातक आहे. त्यावर नियंत्रण आणण्यासाठी सिंधुदुर्ग जिल्हय़ात नोव्हेंबरपासून प्रथमच गोवर-रुबेला लसीकरण मोहीम राबविण्यात येणार आहे. या मोहिमेचे योग्य नियोजन करून इतर मोहिमांप्रमाणे गोवर-रुबेला लसीकरण मोहीमही यशस्वी करण्याचे आवाहन निवासी उपजिल्हाधिकारी विजय जोशी यांनी आरोग्य कर्मचाऱयांच्या कार्यशाळेत बोलताना केले. सिंधुदुर्गातील 1 लाख 30 हजार मुलांना लस देणार असल्याची माहिती यावेळी त्यांनी दिली.

 सिंधुदुर्ग जिल्हय़ात 14 नोव्हेंबर 2018 पासून गोवर-रुबेला लसीकरण मोहीम राबविण्यात येणार आहे. या मोहिमेच्या पूर्वतयारीसाठी जिल्हय़ातील वैद्यकीय अधिकारी व आरोग्य कर्मचाऱयांसाठी जिल्हा नियोजन समिती सभागृहामध्ये एक दिवशीय कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले होते. कार्यशाळेचे उद्घाटन जोशी यांच्या हस्ते झाले, यावेळी ते बोलत होते. यावेळी जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. धनजंय चाकुरकर, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. महेश खलिपे, राज्य प्रशिक्षक डॉ. हेमंत खैरनार, डॉ. संदेश कांबळे, संतोष सावंत, पी. आर. चव्हाण आदी उपस्थित हेते.

जोशी म्हणाले, गोवर हा अत्यंत घातक विषाणूजन्य आजार आहे. लहान  मुलांच्या मृत्यूसाठी गोवर हा आजार एक प्रमुख कारण आहे. 2016 सालच्या जागतिक आकडेवारीनुसार गोवर आजारामुळे मृत्यूपैकी अंदाजे 37 टक्के मृत्यू हे भारतामध्ये झाले आहेत. तसेच रुबेला हा आजार सुद्धा संसर्गजन्य असून मुख्यत: मुले आणि तरुण पिढीमध्ये होतो. गर्भवती स्त्रियांमध्ये रुबेला या आजाराच्या संसर्गामुळे गर्भाचा मृत्यू किंवा जन्मजात दोष घेऊ शकतो. त्यावर नियंत्रण आणण्यासाठी भारतात फेब्रुवारी 2017 पासून गोवर-रुबेला लसीकरणाची सुरुवात झाली आहे. सिंधुदुर्गात 14 नोव्हेंबर 2018 पासून ही मोहीम राबविण्यात येणार असून ती प्रभावीपणे राबवून मोहीम यशस्वी करण्याचे आवाहन जोशी यांनी केले.

 डॉ. खलिपे म्हणाले, सिंधुदुर्गात 14 नोव्हेंबरपासून गोवर-रुबेला लसीकरण मोहीम राबविण्यात येणार असून 9 महिने ते 15 वर्षांखालील 1 लाख 30 हजार मुले-मुलींना लसीकरण केले जाणार आहे. सर्व शाळा, अंगणवाडी केंद्रे, आरोग्य उपकेंद्रे, प्राथमिक आरोग्य केंद्र, ग्रामीण व जिल्हा रुग्णालयामध्ये लसीकरण करण्यात येणार आहे.

 डॉ. चाकुरकर म्हणाले, पल्स पोलिओ लसीकरण मोहिमेप्रमाणे ही मोहीम नाही. एक दिवसच लसीकरण होणार नाही. पाच आठवडे ही मोहीम चालणार आहे. इंजेक्शनद्वारे लस दिली जाणार आहे. त्यामुळे आरोग्य कर्मचाऱयांनी मोहिमेची सर्व माहिती जाणून घ्यावी. प्रमुख मार्गदर्शक डॉ. हेमंत खैरनार यांनी मोहिमेविषयी विस्तृत माहिती दिली. सूत्रसंचालन पी. आर. चव्हाण यांनी केले. स्वागत डॉ. खलिपे यांनी, तर आभार डॉ. कांबळे यांनी मानले.