|Tuesday, June 25, 2019
You are here: Home » Top News » बदललेल्या मार्गाला आक्षेप

बदललेल्या मार्गाला आक्षेप 

तिलारी-वेंगुर्ले पाईपलाईन : बांदा आळवाडामार्गे शेर्ले अशी होती प्रस्तावित : मुख्य अभियंता पालांडे यांच्याकडे व्यक्त केला विरोध

प्रतिनिधी / बांदा:

तिलारी ते वेंगुर्ले पाण्याच्या पाईपलाईनच्या कामाच्या हालचालींना वेग आला आहे. सुमारे 212 कोटी रुपयांच्या पाईपलाईनच्या कामाला गणेशचतुर्थीनंतर सुरुवात होणार आहे. बुधवारी सदरच्या कामाची पाहणी करण्यासाठी मुख्य अभियंता मनीषा पालांडे  यांनी पाहणी केली. मूळ आराखडय़ात सदरची पाईपलाईन बांदा आळवाडामार्गे शेर्ले अशी प्रस्तावित होती. मात्र, त्यात बजेट वाढण्यासाठी बदल करून इन्सुलीमार्गे शेर्ले असा उलटा आराखडा बनविण्यात आला. मात्र, सरपंच मंदार कल्याणकर आणि उपसरपंच अक्रम खान यांनी पाईपलाईन होणार असेल तर ती मूळ आराखडय़ामुळे होणार असल्याचे सांगत त्यामुळे पंचक्रोशीला होणाऱया सोईची माहिती दिली. त्यावर आपण स्थानिक प्राधिकरणाच्या मागणीप्रमाणे काम करणार असल्याचे सांगत शेर्लेमार्गे पाईपलाईन होण्याबाबत सकारात्मक निर्णय घेऊ, असे अधिकाऱयांनी सांगितले.

 तिलारीचे पाणी वेंगुर्ले येथे नेण्याच्या कामाला मंजुरी मिळाली होती. त्याचे कामही 2011 मध्ये सुरू झाले होते. जीवन प्राधिकरणाने सुरुवातीला 212 कोटी रुपयांची ही योजना 65 टक्के खासगी व 35 टक्के सरकारी निधीतून करण्याचे निश्चित केले होते. या योजनेत सहभागी झालेल्या उत्तम स्टील कंपनीने 20 कोटी रुपये दिल्यानंतर या प्रकल्पातुन अंग काढून घेतल्यानंतर प्रकल्पाचे काम डेगवे येथे येऊन थांबले होते. खासगी उद्योजक न मिळाल्याने सरकारने स्वखर्चातून हे काम करण्याचे निश्चित केले आहे.

 रखडलेल्या कामाची पाहणी करण्यासाठी बुधवारी मुख्य अभियंता मनीषा पालांडे, कार्यकारी अभियंता रमेश मठकर, शाखा अभियंता संजय पाटील, आयएचपी कंपनीचे प्रमुख प्रतिनिधी अरगडे आदी उपस्थित होते. योजनेच्या कामाची पाहणी दोडामार्ग येथून करण्यात आली. बांदा बळवंतनगर येथे शाखा कालवा जात असल्याने त्या ठिकाणी समांतर पूल बांधण्याचा निर्णय घेण्यात आला.

याचसाठी आळवाडामार्गे हवी लाईन

 ज्यावेळी काम मंजूर झाले, त्यावेळी त्या आराखडय़ात सदरची लाईन ही शेर्लेमार्गे सातार्डा-शिरोडा- वेंगुर्ले अशी प्रस्तावित होती. त्याप्रमाणे शेर्ले नदीपात्रातील तांत्रिक तपासणीही केली होती. मात्र, त्यानंतर त्या आराखडय़ात बदल करण्यात आला आणि सदरची लाईन इन्सुलीमार्गे शेर्ले अशी प्रस्तावित करण्यात आली. त्यानुसार काम करण्याचे निश्चितही करण्यात आले. मात्र, बुधवारी सरपंच मंदार कल्याणकर आणि उपसरपंच अक्रम खान यांनी हा पूल बांदा आळवाडामार्गे का व्हावा, हे पटवून दिले. प्रत्यक्षात त्या ठिकाणी जात सुमारे 25 गावातील ग्रामस्थांचा सुरू असलेला जीवघेणा होडी प्रवास दाखवून दिला.

अभियंत्याच्या वक्तव्याला आक्षेप

 यावेळी कार्यकारी अभियंता मठकर यांनी सदरचे नदीपात्र खोल असून पात्र विस्तीर्ण आहे. तर पावसाळय़ात पुराचे पाणी मोठय़ा प्रमाणात साचून राहत असल्याचे सांगितले. त्यावेळी कल्याणकर आणि खान यांनी आक्षेप घेत माहिती चुकीची असल्याचे सुनावले. सद्यस्थितीत नदीपात्रात असलेला उन्हाळय़ात बांधलेला साकव मुख्य अभियंता पालांडे यांना दाखविला. मठकर सांगतात त्याप्रमाणे सत्यता असेल तर उन्हाळय़ात बांधलेला साकव कसा दिसतो, असा सवाल अक्रम खान यांनी उपस्थित केला. सदरची पाईप लाईन इन्सुलीमार्गे घेऊन जाण्याची तुमची इच्छा असेल तर आम्ही पूर्ण होऊ देणार नाही. तुम्हाला जवळचा शेर्ले मार्ग असल्याने व 25 गावाच्या लोकांचे हित लक्षात घेत याचमार्गे लाईन करावी लागेल. स्थानिक प्रशासन म्हणून आमचे तुम्हाला सहकार्य राहील, असे कल्याणकर यांनी सांगितले.

सरपंचांची नाराजी

 बांदा गावातून एवढा मोठा प्रकल्प जातो. त्याची पाहणी करण्यासाठी प्रशासनाचे अधिकारी येतात. त्याबाबत साधी माहितीही स्थानिक प्रशासनाला दिली जात नाही, ही खेदजनक बाब असल्याचे सांगत यंत्रणेबाबत सरपंच व उपसरपंचांनी नाराजी व्यक्त केली.