|Monday, July 22, 2019
You are here: Home » आवृत्ती » सिंधुदुर्ग » पाच लाखाची विदेशी सिगारेट जप्त

पाच लाखाची विदेशी सिगारेट जप्त 

इन्सुली तपासणी नाक्यावर बांदा पोलिसांची कारवाई : मुंबईला जाणाऱया खासगी बसमध्ये हेते पार्सल : बसवर पार्सल देणारा गोव्याचा तरुण ताब्यात

प्रतिनिधी / बांदा:

 सिंधुदुर्गातून मुंबईच्या दिशेने होणारी विदेशी बनावटीच्या सिगारेटची तस्करी बुधवारी उघड झाली आहे. इन्सुली येथील तपासणी नाक्यावर खासगी बसमधून सतराशे पॅकेटस्चा 5 लाख 10 हजार रुपयांचा साठा जप्त करण्यात आला आहे. तर बेकायदा सिगारेट कुरियर केल्याप्रकरणी महम्मद सन्फिर मोयजू मोहल (35, मूळ केरळ, सध्या रा. गोवा) याला बांदा पोलिसांनी ताब्यात घेतले. ही कारवाई दुपारी दीडच्या सुमारास करण्यात आली. या कारवाईमुळे गोवा येथून परदेशी सिगारेट सिंधुदुर्गमार्गे जात असल्याचे निष्पन्न होत आहे. याचा आतंरराष्ट्रीय रॅकेटशी संबंध आहे का, हे तपासाअंती पुढे येणार आहे.

 गोव्याहून मुंबईत बेकायदा विदेशी बनावटीच्या सिगारेटची वाहतूक होणार असल्याची पक्की माहिती बांदा पोलिसांना मिळाली होती. त्यानुसार सहाय्यक निरीक्षक जयदीप कळेकर यांनी आपल्या सहकाऱयांसमवेत इन्सुली तपासणी नाक्यावर सापळा रचला होता. गोव्याहून मुंबईला जाणारी एका खासगी बस तपासणी नाक्यावर आली असता कर्मचाऱयांनी ती थांबविली. बसची तपासणी केली असता क्लीनरच्या मागील बाजूला दोन बॅग आणि खोका आढळला. त्यात पाहणी केली असता विदेशी बनावटीची सिगारेट असल्याचे उघड झाले. याबाबत चालकाला विचारणा केली असता त्याचे बिल नसून सदर पार्सल आम्हाला मुंबई येथे पोहोचविण्यासाठी पणजी कार्यालयातून दिल्याचे सांगितले. त्यावर पोलिसांना संशय आला. चालकाकरवी त्यांनी बसच्या पणजी येथील बुकिंग ऑफिसला फोन लावला. त्यावर तेथील कर्मचाऱयांनी ते पार्सल देणाऱया तरुणाचा मोबाईल नंबर देत त्याला आपण बांद्याला पाठवून देत असल्याचे सांगितले. तो तरुण तासाभरात बांदा येथे आला. त्यानंतर बस सोडण्यात आली.

 बसमध्ये दोन बॅगमध्ये ‘बेन्सन ऍण्ड हेजेस’ कंपनीच्या ब्ल्यू गोल्ड एस्टॅब्लिश लंडन या ब्रँडच्या तब्बल 1700 पॅकेटस होत्या. बाजारभावाप्रमाणे त्यांची किंमत 5 लाख 10 हजार एवढी आहे. ही कारवाई सहाय्यक पोलीस निरीक्षक जयदीप कळेकर यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक हनुमंत मिशाळ, कॉन्स्टेबल संजय कोरगावकर, हेमंत पेडणेकर, मनिष शिंदे यांच्या पथकाने केली.

सिगारेट जाणार होती मुंबईला

 संशयिताकडे प्राथमिक चौकशी केली असता त्याने सदरचे पार्सल मला एका व्यक्तीने बसवर देण्यास सांगितल्याचे कबूल केले. त्याप्रमाणे मी ते बसवर देण्याचे काम केले. सदर पार्सल मुंबई येथे घेण्यासाठी एक व्यक्ती येणार होता, असे त्याने सांगितल्याचे निरीक्षक कळेकर यांनी सागितले.

आंतरराष्ट्रीय रॅकेट पुढे येण्याची शक्यता

 सुमारे पाच लाखाची सिगारेट लंडन बनावटीची आहे. ती सिगारेट गोवा येथे येते कशी आणि तेथून बिनबोभाटपणे मुंबईकडे जाते कशी, असा प्रश्न उपस्थित होत आहे. यात बडय़ा धेंडांचा हात असल्याचा संशय व्यक्त होत आहे. याचा योग्य तपास केल्यास पोलिसांना आंतरराष्ट्रीय रॅकेट सापडण्याची शक्यता आहे.  

बिल नसतांना पार्सल कसे?

 विदेशी बनावटीच्या सिगारेटचे पार्सल खासगी बसच्या प्रशासनाने सहजपणे का स्वीकारले, असा सवाल उपस्थित होत आहे. त्यामुळे यात त्यांचा हात आहे का, हे पोलिसांना तपासावे लागणार आहे. एखादी साधी पिशवी बसवर घ्यायची झाल्यास चालक अनेक प्रश्न विचारतो. मग एवढे मोठे पार्सल सहजपणे कसे घेतले, असा सवाल उपस्थित होत आहे.