|Saturday, July 20, 2019
You are here: Home » आवृत्ती » सांगली » सांगलीत दोन खासगी सावकारांवर गुन्हा

सांगलीत दोन खासगी सावकारांवर गुन्हा 

प्रतिनिधी/ सांगली

प्लास्टीक मोल्डिंग व्यावसायिकाला खासगी सावकारीतून जीवे मारण्याची धमकी दिल्याप्रकरणी विश्रामबाग पोलिसात दोन सावकारांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. विशाल विलास कुडचे आणि गणेश अनिल वायदंडे (दोघेही रा. विश्रामबाग) अशी गुन्हा दाखल झालेल्या सावकारांची नावे आहेत. मंगळवारी रात्री त्यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अद्याप त्यांना अटक करण्यात आली नसल्याचे सांगण्यात आले.

 याबाबत स्वप्नील प्रकाश गळतगे रा. प्राजक्त कॉलनी सांगली यांनी फिर्याद दिली आहे. पोलिसांतून मिळालेली माहिती अशी, स्वप्नील गळतगे याचा प्लास्टीक मोल्डिंगचा व्यवसाय आहे. ऑक्टोबर 2017 मध्ये त्यांना व्यवसायासाठी पैशाची गरज होती. त्यामुळे त्यांनी शहरातील एका बँकेत कर्जप्रकरण केले होते. पण कर्जप्रकरणाला वेळ लागणार असल्याने बँकेतीलच एका कर्मचाऱयाने त्यांना विशाल कुडचे या सावकाराची ओळख करून दिली. दरमहा सात टक्के व्याजाने चार लाख रूपये कर्ज कुडचेकडून घेतले.

 त्यापोटी गळतगेकडून कुडचेने दोन कोरे धनादेश आणि शंभर रूपयांचा एक सही केलेला स्टॅम्प घेतला. तसेच चार महिन्याचे एक लाख आठ हजार रूपये व्याज कापून घेऊन रक्कम देण्यात आली. दर आठवडयाला वीस हजार रूपये असा परतफेडीचा हप्ता ठरवण्यात आला होता. त्यानुसार आतापर्यंत कुडचे याने चार लाख अडतीस हजार रूपये घेतले आहेत. तरीही तीन लाख 9ग्न5 हजारांचे देणे शिल्लक दाखवण्यात आले आहे. पण इतकी मोठी रक्कम परतफेड करण्यात अडचणी आल्याने विशाल कुडचे आणि त्याचा साथीदार गणेश वायदंडे यांनी गळतगेकडे वसुलीसाठी तगादा लावला आहे.

तसेच घरी जाऊन दमदाटी आणि जिवे मारण्याची धमकीही देण्यात आल्याने त्याने पोलीस प्रमुख सुहेल शर्मा यांची भेट घेऊन तकार केली. तसेच विश्रामबाग पोलीसांतही फिर्याद देण्यात आली आहे. त्यानुसार दोघावर सावकारी अधिनियम 1946 नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.