|Friday, April 19, 2019
You are here: Home » आवृत्ती » सांगली » बनावट नोटाप्रकरणी एटीएसची मदत घेणार

बनावट नोटाप्रकरणी एटीएसची मदत घेणार 

प्रतिनिधी/ सांगली

 सांगलीत बनावट नोटा खपविण्याच्या प्रयत्नात असणाऱया टोळीची पाळेमुळे खणून काढण्यासाठी वेळप्रसंगी दहशतवाद विरोधी पथक (एटीएस) ची मदत घेवू, अशी माहिती कोल्हापूर परिक्षेत्राचे विशेष पोलिस महानिरीक्षक विश्वास नांगरे पाटील यांनी बुधवारी सांगलीत पत्रकारांशी बोलतांना दिली. गणेश उत्सवाच्या पार्श्वभूमीवर पोलीस यंत्रणेच्या बंदोबस्ताचा आढावा घेण्यासाठी नांगरेपाटील बुधवारी सांगलीत आले होते. त्यावेळी ते पत्रकारांशी बोलत होते. बुधवारी नांगरे पाटील यांनी पोलीस अधीक्षक सुहेल शर्मा यांच्याकडून बनावट नोटा प्रकरणाची माहिती घेत कडक कारवाई करण्याचे तसेच या टोळीच्या मुळापर्यंत जाण्याची सुचना केली. 

बनावट नोटाप्रकरणी शहर पोलिसांच्या पथकाने राज राजकुमार उज्जेनलाल सिंह (वय 28), प्रेमविष्णू रोगा राफा (26, काटेमानेवली), नरेंद्र आशापाल ठाकूर (33, आनंदवाडी, तिघेही कल्याण), सूरज ऊर्फ मनीष मल्ला ठाकुरी (36, अर्जुनवाडी, घनसोली गाव, नवी मुंबई) व जिलानी आशपाक शेख (47, एरोली सेक्टर एक, नवी मुंबई) यांना अटक केली. त्यांच्याकडून दोन हजारच्या तब्बल 123 बनावट नोटा जप्त केल्या. त्यांनी राज्यभरात तब्बल पाच कोटींच्या बनावट नोटा चलनात आणल्याची कबुली शहर पोलीसांना तपासात दिली आहे.

तसेच  सखोल चौकशीनंतर पश्चिम बंगालमधून नोटा पुरवठा होत असल्याची माहिती समोर आली. लाखाच्या नोटा केवळ दहा हजारांना खरेदी करून, त्यांना चलनात आणल्या जात होत्या. या टोळीतील दोघे तीन वर्षांपासून हा धंदा करत असल्याचे समोर आले. मात्र यांच्या म्होरक्याचा शोध घेण्यासाठी पोलिसांना पश्चिम बंगाल गाठावे लागणार आहे. यासाठी एटीएसची मदत घेणार असल्याचे श्री. नांगरे-पाटील यांनी सांगितले.

या बनावट नोटा प्रकरणी अटक करण्यात आलेल्या रॅकेटच्या मुळापर्यंत जाण्यासाठी एटीएसची मदत घेणार असल्याचे नांगरे-पाटील यांनी बुधवारी स्पष्ट केल्याने आता तपासाला आणखी गती येण्याची शक्यता आहे.

Related posts: