|Tuesday, July 16, 2019
You are here: Home » आवृत्ती » सांगली » विद्यापीठ सुरु होणार वैद्यकीय अभ्यासक्रम

विद्यापीठ सुरु होणार वैद्यकीय अभ्यासक्रम 

कुलगुरु डॉ.  फडणवीस यांचा पुढाकार :  मेडिकलमध्ये करिअरचे स्वप्न

प्रतिनिधी/ सोलापूर

वैद्यकीय क्षेत्रात उच्च शिक्षणाचे स्वप्न उराशी बागळणाऱया सोलापूर जिह्यासह आसपासच्या जिह्यातील सर्वसामान्य घरातील विद्यार्थ्यांसाठी सोलापूर विद्यापीठ एक सुवर्ण संधी घेवून येत आहे. विद्यापीठात आरोग्यविषयक काही नवीन अभ्यासक्रम चालू करण्याचा निर्णय कुलगुरू डॉ. मृणालिनी फडणवीस यांनी घेतला असून, शासनाचाही याला सकारात्मक प्रतिसाद आहे.

   यासंदर्भात सोलापूर विद्यापीठाने शासनाकडे पाठविलेल्या प्रस्तावित बृहत विकास आराखडय़ामध्ये स्कूल ऑफ हेल्थ सायन्सचा समावेश केलेला आहे. शासनाकडूनही त्यास सकारात्मकता दर्शविण्यात आली आहे. त्यामुळे येत्या काही काळात सोलापूर विद्यापीठात स्कूल ऑफ हेल्थ सायन्सेस अस्तित्वात येणार असून, आरोग्य क्षेत्राशी निगडित कुशल व प्रशिक्षित मनुष्यबळ तयार करण्यासाठी विविध कौशल्याधारित नवनवीन अभ्यासक्रम सुरू होणार आहेत.

  डॉ. फडणवीस यांनी विद्यापीठाच्या कुलगुरूपदाची सूत्रे स्वीकारल्यापासून विद्यापीठात नवनवीन कोर्सेस सुरू होत आहेत. याचबरोबर विविध कार्यशाळा, राष्ट्रीय परिसंवाद चर्चासत्र याचेही आयोजन केले जात आहे. पहिल्यांदा त्यांनी सोलापूरकरांच्या आरोग्याची गरज ओळखून ऍक्युप्रेशर कार्यशाळा घेतली. त्या कार्यशाळेस सोलापूरकरांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला. काही मान्यवर व सोलापूरकरांकडून विद्यापीठात ऍक्युप्रेशर अभ्यासक्रम सुरू करण्याची मागणी करण्यात आली. त्यानुसार कुलगुरू डॉ. फडणवीस यांनी हा कोर्स सुरू करण्याचा निर्णय घेतला व त्यासंदर्भात कार्यवाही सुरु झाली आहे.

  त्याचबरोबर सोलापूर विद्यापीठाकडून योग प्रशिक्षक हा नवीन सर्टिफिकेट कोर्स सुरू करण्यात आला आहे. सध्या दोन बॅचेसमध्ये या कोर्सचे प्रशिक्षण सुरू आहे. विद्यार्थी प्रवेश क्षमतेपेक्षा अधिक विद्यार्थी आल्याने जागा वाढविण्यात आली आहे. सध्या 60 जणांना प्रवेश देण्यात आला आहे. या नवीन कोर्सला सोलापूरकरांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला आहे.

    नॅशनल स्किल डेव्हलपमेंट कौन्सिलच्या अहवालानुसार येत्या काळात आरोग्यक्षेत्रात रोजगाराच्या मोठय़ा संधी निर्माण होणार आहेत. त्यामुळेच सोलापूर विद्यापीठाकडून स्कूल ऑफ हेल्थ सायन्स अंतर्गत पदवी, पदविका व पॅरा वैद्यकीय प्रमाणपत्र अभ्यासक्रम सुरू करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. त्यानुसार अस्थायी अभ्यास मंडळ तयार करून पुढील शैक्षणिक वर्षांपासून हे कोर्सेस सुरू करण्याचा निर्णय विद्यापीठ प्रशासनाकडून घेण्यात आल्याची माहिती स्कूल आ?फ हेल्थ सायन्सचे समन्वयक, विद्यापीठाचे वैद्यकीय अधिकारी डॉ. अभिजित जगताप यांनी दिली.

नाशिकच्या विद्यापीठासोबत करार

 सोलापूर शहर व जिह्यातील विद्यार्थ्यांचे हित लक्षात घेता सोलापूर विद्यापीठाने नाशिकच्या आरोग्य विज्ञान विद्यापीठासोबत शैक्षणिक सहचर्य करार केलेला असून, भविष्यात महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठाच्या सहकार्याने डय़ूवेल डिग्री अभ्यासक्रम, विद्यार्थी व शिक्षक विकास कार्यक्रम तसेच आरोग्य विषयक मूलभूत संशोधन असे विविध उपक्रम राबविण्यात येणार आहेत. त्याचा लाभ येथील  विद्यार्थ्यांच्या गुणवत्ता वाढीसाठी तसेच रोजगारासाठी निश्चितच होणार आहे.