|Saturday, April 20, 2019
You are here: Home » leadingnews » समलैगिंक संबंध गुन्हा नाही ; सुप्रीम कोर्टाचा ऐतिहासिक निर्णय

समलैगिंक संबंध गुन्हा नाही ; सुप्रीम कोर्टाचा ऐतिहासिक निर्णय 

ऑनलाईन टीम / नवी दिल्ली

समलैंगिकता गुन्हा नाही, असा ऐतिहासिक निकाल सर्वोच्च न्यायालयाने दिला आहे. परस्परसंमतीने ठेवल्या जाणाऱया समलैंगिक संबंधांना गुन्हा ठरवणाऱया भारतीय दंड विधानाच्या (आयपीसी) कलम 377 च्या घटनात्मक वैधतेला आव्हान देणाऱया याचिकांवर सुप्रीम कोर्टाने आज निकाल दिला. समलैंगिकांनाही समान अधिकार आहेत, त्यामुळे दोन सज्ञान व्यक्तींनी ठेवलेले संबंध ही खासगीबाब आहे, त्यामुळे तो गुन्हा ठरत नाही, असा ऐतिहासिक निर्णय सुप्रीम कोर्टाने दिला आहे.

समलैंगिकांच्या हक्कांसाठी झटणाऱया कार्यकर्त्यांसह इतरांनी केलेल्या याचिकांची सुनावणी केल्यानंतर सरन्यायाधीश दीपक मिश्रा यांच्या अध्यक्षतेखालील पाच सदस्यांच्या घटनापीठाने गेल्या 17 ऑगस्टला निकाल राखून ठेवला होता. युक्तिवादादरम्यान केंद्र सरकारने दोन प्रौढांनी परस्परसंमतीने केलेल्या अनैसर्गिक संभोगाला गुन्हा ठरवण्याशी संबंधित दंडात्मक तरतुदींच्या घटनात्मक वैधतेचा मुद्दा न्यायालयाच्या सदसद्विवेकबुद्धीवर सोडला होता. अल्पवयीन मुले आणि प्राणी यांच्याशी अनैसर्गिक संभोगाबाबतच्या दंडात्मक तरतुदींचे इतर पैलू कायद्यात तसेच कायम राहू दिले जावेत, अशी भूमिका केंद्र सरकारने घेतली होती. गुरुवारी सुप्रीम कोर्टात सरन्यायाधीश दीपक मिश्रा यांच्या अध्यक्षतेखालील घटनापीठाने या याचिकेवर निकाल दिला. सर्वोच्च न्यायालयाने कलम 377 रद्द करत स्वतःचा डिसेंबर 2013 मध्ये दिलेला निकाल बदलला. सरन्यायाधीश दीपक मिश्रा यांच्या अध्यक्षतेखालील न्यायमूर्ती आर. एफ. नरीमन, न्यायमूर्ती ए. एम. खानविलकर, न्यायमूर्ती डी. वाय. चंद्रचूड आणि न्यायमूर्ती इंदू मल्होत्रा यांच्या खंडपीठाने 10 जुलैपासून या विषयावर सुनावणी सुरू केली. ही सुनावणी 17 जुलै रोजी संपली. यानंतर न्यायालयाने आपला निकाल राखून ठेवला होता.

Related posts: