|Thursday, June 27, 2019
You are here: Home » संपादकिय / अग्रलेख » आदिम काळातले हेवाळेतील जंगल

आदिम काळातले हेवाळेतील जंगल 

महाराष्ट्रातल्या कोल्हापूर जिल्हय़ातल्या चंदगड तालुक्यात तुडये गावातून उगम पावणाऱया तिळारी म्हणजेच गोव्यात कोलवाळ नावाने ओळखल्या जाणाऱया नदीला हजारो वर्षांचा इतिहास लाभलेला आहे. या तिळारी नदीकिनारी कुडासे या गावातल्या दसईत महावृक्षाचे जीवाश्म आढळलेले आहेत. याच तिळारी नदीच्या खराडी उपनदीच्या उजव्या किनाऱयावरती हेवाळेतील बांबर्डेत असलेल्या कानाळाच्या देवराईत हजारो वर्षांच्या इतिहासाशी नाते सांगणाऱया सदाहरित जंगलाचा शोध लागलेला आहे. जंगली जायफळ आणि तत्सम प्रजातींच्या वैशिष्टय़पूर्ण सदाहरित वनाचे हे क्षेत्र महाराष्ट्राच्या इतिहास आणि पर्यावरणीय संस्कृतीच्या वारशाला कलाटणी देण्यास कारणीभूत ठरणार आहे. दलदलीच्या प्रदेशात इंग्रजीतल्या ‘यु’ अक्षराच्या उलटय़ा आकाराची मुळे असलेले असे जंगल सुमारे 44 हजार वर्षांपूर्वीचे रत्नागिरी जिल्हय़ातल्या दापोली येथील कांगवई परिसरात जीवाश्म स्वरुपात 2012 साली आढळले होते. कांगवई येथे विहिरीसाठी खोदकाम करीत असताना जे वैशिष्टय़पूर्ण दगड आढळायचे त्यांच्यावरती जंगली जायफळाच्या पानाचे जीवाश्म असल्याचे महत्त्वपूर्ण संशोधन वैज्ञानिक के. पी. एन. कुमारन आघारकर संशोधन केंद्र पुणे आणि संशोधक शरद राजगुरु, ऋता लिमये, सचिन पुणेकर, सचिन जोशी आणि श्रीकांत कार्लेकर या प्रभृतींनी प्रकाशात आणले होते.

स्वातंत्र्यप्राप्तीनंतर कोकणातील पारंपरिक देवराई, सधन जंगले, वृक्षवेलींनी समृद्ध माळराने यांना उद्ध्वस्त करण्याचा सपाटा सुरू झाल्याने आज आपले हिरवे कोकण विस्मृतीत जाण्याच्या वाटेवरती आहे. 44 हजार वर्षांपूर्वी कोकणात आजच्यापेक्षा दक्षिण-पश्चिम आणि उत्तर-पूर्व मान्सूनद्वारे प्रचंड पर्जन्यवृष्टी व्हायची. त्यामुळे कोकणची भूमी सदाहरित जंगलांनी नटलेली होती. आकाशाला गवसणी घालण्यास सिद्ध झालेले महावृक्ष, अथांग जंगली वेली, हिरव्यागार वनस्पती यांनी नटलेली समृद्ध वने ही कोकणच्या भूमीची शान होती. भूगर्भात आणि हवामानात उद्भवलेल्या बदलांमुळे कोकणातल्या पर्जन्यवृष्टीचे प्रमाण हळूहळू कमी कमी होत गेले आणि त्यामुळे इथे आढळणारी सदाहरित जंगले कालांतराने काळाच्या उदरात गडप होत गेली. दापोलीजवळच्या कांगवाईत विहिरीसाठी झालेल्या उत्खननप्रसंगी आढळलेले जीवाश्म जंगली जायफळासारख्या अन्य सदाहरित जंगलाच्या प्रजातीच्या वारशाची प्रचिती देतात. आदिमानवाचा संचार आणि वास्तव्य या पृथ्वीतलावरती होण्यापूर्वी जंगलातल्या काही भागात दलदलीच्या प्रदेशात इंग्रजीतल्या ‘यु’ अक्षराच्या उलटय़ा आकाराची मुळे असलेली झाडे आढळत होती. भारतात अशा आदिमकाळाशी नाते सांगणाऱया जंगलाचे क्षेत्र कर्नाटक, केरळ या राज्यात काही मोजक्याच ठिकाणी आढळलेले होते. गोव्यात सत्तरीतील ब्रह्माकरमळी, माळोली, सांगेत नेत्रावळी, भाटी त्याचप्रमाणे काणकोणात खोतीगावसारख्या प्रदेशात आढळलेले आहे. आज ब्रह्मदेवाच्या मंदिरामुळे सत्तरीतील चांदिवडे हा गाव ब्रह्माकरमळी म्हणून नावारूपास आलेला आहे. तिसवाडीतील करमळीतल्या ब्रह्मदेवाला बारामाही सुजलाम् आणि सुफलाम् असलेला हा गाव भावला.

आज ब्रह्माकरमळीत धरण उभारलेले नसताना बारामाही पाणी पारंपरिक पाटांद्वारे खळखळत असते. त्याला इथल्या आजोबाच्या देवराईत आणि त्यालाच संलग्न असलेल्या बिबटय़ांच्या दलदलीतल्या वैशिष्टय़पूर्ण जंगलाचे महत्त्वाचे योगदान आहे. दक्षिण गोव्यात भाटी-सांगेत असलेल्या बाराजणापासून काही अंतरावर सूर्यगाळ नावाची अशीच सदाहरित जंगलाने समृद्ध देवराई आहे. या देवराईत इंग्रजीतल्या ‘यु’ अक्षराच्या उलटय़ा आकाराची मुळांची संरचना असलेले दलदलीचे जंगल असून येथील बारामाही मोठय़ा प्रमाणात उपलब्ध असलेले झऱयांचे पाणी स्थानिकांनी आपल्या शेती, बागायतीत पाट खोदून नेलेले आहे. सत्तरीतील आजोबाची तळी आणि बिबटय़ाची ही जंगले आज म्हादई अभयारण्यात वसलेली आहेत तर सूर्यगाळचा समावेश नेत्रावळी अभयारण्यात झालेला असल्याने या वैशिष्टय़पूर्ण नैसर्गिक वारसा स्थळाचे संरक्षण झालेले आहे. नेत्रावळी गावातून सावरी धबधब्यावर जाताना वाटेत असणारे असे जंगल वाढत्या मानवी हस्तक्षेपामुळे संकटग्रस्त आहे. गोवा सरकारतर्फे इथल्या सहय़ाद्रीचा समावेश भारतातल्या यापूर्वी अधिसूचित करण्यात आलेल्या नैसर्गिक वारसा स्थळात करण्याच्या प्रस्तावात सांगे, सत्तरी येथील दलदलीच्या या जंगलांचा समावेश झालेला आहे.

महाराष्ट्राच्या चंदगड आणि दोडामार्ग तालुक्यातून वाहणाऱया तिळारीच्या खराडी उपनदीला बारामाही पाण्याचा पुरवठा करण्यात हेवाळे-बांबर्डेतल्या पारंपरिक कानळाच्या राईतून वाहणाऱया जलस्रोताचे महत्त्वाचे कार्य आहे. आदिमानवाचे आगमन होण्यापूर्वी जगाच्या काही मोजक्याच प्रदेशांत मायरिस्टिका स्वॅम्प म्हणजे जंगली जायफळाच्या प्रजातीच्या वृक्षांनी नटलेले आणि बारामाही जलस्रोतांनी समृद्ध असलेल्या या देवराईतून वर्षातून एकदाच सातेरी-मायेगवसच्या मंदिरासमोर होळीसाठी वृक्ष कापून आणला जातो अन्यथा या देवराईत मांसाहार, मद्यपान करून स्थानिक इथे जात नव्हते. सुमारे चार एकर क्षेत्रात पसरलेले हे वैशिष्टय़पूर्ण जंगल जैविक संपत्तीच्या नानाविध घटकांसाठी नैसर्गिक आश्वासक अधिवास आहे.

असंख्य कृमीकीटक, सस्तन, सरपटणारे प्राणी, पक्षी, जलचरांसाठी आश्रयस्थान ठरलेले आहे. दापोलीजवळचे जायफळाच्या जंगली प्रजातीचे जीवाश्म वगळता असे आगळेवेगळे जंगल महाराष्ट्रात अन्यत्र आढळले असल्याची नोंद नसल्याने स्थानिक ग्रामपंचायत आणि लोकसहभागातून वन खात्याने कानळाच्या देवराईचे संरक्षण आणि संवर्धन प्राधान्यक्रमाने करण्याची नितांत गरज आहे. महाराष्ट्राच्या एका टोकाला असलेल्या दोडामार्ग तालुक्यात एकेकाळी वृक्षवेलींनी नटलेली एकापेक्षा एक संपन्न जंगले होती परंतु आज शेती, बागायती, रबर लागवड, धरणे, रस्ते आणि विकास प्रकल्प त्याचप्रमाणे खनिज उत्खननाच्या संकटात इथली जंगले इतिहासजमा होण्याच्या वाटेवरती आहेत.