|Sunday, November 18, 2018
You are here: Home » संपादकिय / अग्रलेख » ‘लक्ष्मी बॉम्ब’चा युती सरकारला धोका!

‘लक्ष्मी बॉम्ब’चा युती सरकारला धोका! 

लक्ष्मी हेब्बाळकर यांना आवरा अन्यथा आम्हाला कठोर निर्णय घ्यावा लागेल, असा धमकीवजा इशारा सतीश व रमेश जारकीहोळी बंधूंनी काँग्रेस हायकमांडला दिला आहे. हा वाद आता केवळ बेळगावपुरता मर्यादित राहिलेला नाही. या वादाने संपूर्ण राज्य राजकारणात ध्रुवीकरणाचे संकेत मिळत आहेत. काँग्रेस हायकमांडला कोणाला आवरायचे हेच कळेना, अशी परिस्थिती निर्माण झाली आहे.

 

22 जिल्हय़ातील तीन महानगरपालिकांसह 105 स्थानिक स्वराज्य संस्थांचा निवडणूक निकाल जाहीर झाला आहे. या निकालाने सत्ताधारी काँग्रेस-निजदबरोबरच प्रमुख विरोधी पक्ष असणाऱया भाजपलाही धक्का बसला आहे. कारण मतदारांनी आम्हाला कोणत्याच पक्षाची गरज नसल्याची जाणीव यातून करून दिली आहे. एकूण 2,662 जागांसाठी निवडणुका झाल्या होत्या. 982 जागांवर काँग्रेस, 929 जागांवर भाजप व 375 जागांवर निजदला विजय मिळाला आहे. 329 जागा अपक्षांना मिळाल्या आहेत. एकंदर निकाल लक्षात घेता भाजप आणि काँग्रेसच्या संख्याबळात फार काही फरक दिसत नाही. अनेक ठिकाणी आमदार व मंत्र्यांचा प्रभाव ओसरल्याचे या निवडणुकीतून दिसून आले आहे. कारण सत्ताधारी आमदारांच्या कार्यक्षेत्रात अपक्षांनी बाजी मारली आहे. लोकसभा निवडणुका जवळ आलेल्या असतानाच झालेल्या या निवडणुकीच्या निकालाने तिन्ही प्रमुख राजकीय पक्षांना विचार करण्यास भाग पाडले आहे.

एकीकडे स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत मतदारांनी राजकीय पक्षांना धक्का दिलेला असतानाच कर्नाटकातील युती सरकारही डळमळीत बनू लागले आहे. त्यामुळेच की काय, मुख्यमंत्री कुमारस्वामी यांनी बचावात्मक खेळी सुरू केली आहे. एका इंग्रजी दैनिकाला मुलाखत देऊन युती सरकार अस्थिर करण्यासाठी केंद्र सरकारने प्राप्तीकर खात्याला हाताला धरल्याचा गंभीर आरोप केला आहे. माजी मुख्यमंत्री बी. एस. येडियुराप्पा यांचे चिरंजीव बी. वाय. विजयेंद्र यांनी प्राप्तीकर आयुक्तांची भेट घेऊन यासंबंधी चर्चा केल्याचे मुख्यमंत्र्यांनी जाहीर करताच येडियुराप्पा व बी. वाय. विजयेंद्र यांनी तातडीने या आरोपांचा इन्कार केला आहे. भाजपने तर मुख्यमंत्र्यांवर टीकेची झोड उठवली आहे. युती सरकार अस्थिर करण्याची गरज नाही. युतीमध्ये सहभागी असलेल्या नेत्यांमधील मतभेदांमुळेच हे सरकार कोसळणार, हे निश्चित आहे, अशा शब्दात माजी मुख्यमंत्री जगदीश शेट्टर यांनी पलटवार केला आहे.

कुमारस्वामी यांच्या चार्टर्ड अकौंटंटच्या घरावर प्राप्तीकर खात्याच्या अधिकाऱयांनी छापा टाकला होता. या कारवाईचा उल्लेख करून मुख्यमंत्र्यांनी भाजपवर गंभीर आरोप केला आहे. प्राप्तीकर खात्याच्या आयुक्तांनी याचा खुलासा केला आहे. बी. वाय. विजयेंद्र किंवा भाजपच्या कोणत्याही नेत्याने आपली भेट घेतलेली नाही, असे स्पष्टीकरण त्यांना द्यावे लागले.

बेळगाव जिल्हय़ात गेल्या आठ दिवसांपासून सुरू असलेल्या वेगवान राजकीय घडामोडींमुळे युती सरकारचे अस्तित्व धोक्मयात आले आहे. अशा परिस्थितीतच मुख्यमंत्र्यांनी भाजपवर आरोप करून बचावात्मक खेळी सुरू केली आहे. बेळगाव येथील पीएलडी बँक अध्यक्ष-उपाध्यक्ष पदाच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर काँग्रेसमध्ये उभी फूट पडली आहे. पालकमंत्री रमेश जारकीहोळी व माजी मंत्री सतीश जारकीहोळी या प्रभावी नेत्यांविरुद्ध तीन महिन्यांपूर्वी आमदार झालेल्या लक्ष्मी हेब्बाळकर यांनी दंड थोपटले आहेत. हा वाद आता केवळ बेळगावपुरता मर्यादित राहिलेला नाही. काँग्रेस हायकमांडपर्यंत तो पोचला आहे. यावर तोडगा निघाला नाही तर त्याचे परिणाम युती सरकारवर होऊ शकतात. त्यामुळेच काँग्रेस हायकमांडने हा वाद मिटविण्याची जबाबदारी माजी मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांच्याकडे सोपविली आहे. मात्र, सिद्धरामय्या सध्या परदेश दौऱयावर आहेत. परदेश दौऱयावरून परतल्यानंतर या वादावर तोडगा काढण्याचे सांगून तोपर्यंत दोघेही शांत रहा, असा सल्ला त्यांनी दिला होता. त्यानंतरच खरा भडका उडाला आहे.

पीएलडी बँकेवर आजवर सतीश जारकीहोळी यांची पकड होती. बदलत्या राजकीय परिस्थितीनुसार लक्ष्मी हेब्बाळकर यांनी आपले वर्चस्व स्थापन केले आहे. 14 पैकी 9 सदस्य लक्ष्मी यांच्या बाजूने आहेत. तर 5 सदस्य सतीश जारकीहोळी यांच्या बाजूने आहेत. 28 ऑगस्ट रोजी या बँकेची निवडणूक होणार होती. एका सदस्याचे अपहरण झाल्याचे सांगून तहसीलदारांनी 27 च्या रात्री निवडणूक प्रक्रिया पुढे ढकलली. लक्ष्मी हेब्बाळकर यांनी त्याच दिवशी रात्री तहसीलदार कार्यालयासमोर धरणे धरले. सतीश जारकीहोळी समर्थकांनीही निदर्शने केली. त्यानंतर लक्ष्मी समर्थक 9 सदस्यांनी उच्च न्यायालयात धाव घेतली. न्यायालयाच्या आदेशावरून आता शुक्रवार दि. 7 सप्टेंबर रोजी ही निवडणूक होणार आहे. या निवडणुकीत सतीश व रमेश जारकीहोळी बंधूंची पीछेहाट झाली तर आपली राजकीय शक्ती दाखविण्यासाठी युती सरकारच्या बुडालाच सुरुंग लावण्याची तयारी त्यांनी केली आहे. केवळ एका तालुका पातळीवरील बँकेच्या अध्यक्ष-उपाध्यक्ष पदाची निवडणूक सरकारच्या अस्तित्वाला धक्का पोहोचविणारी ठरणार आहे.

या वादाला आता जातीय रंगही देण्यात येत आहे. काँग्रेसमध्ये लिंगायत विरुद्ध बिगर लिंगायत असे धुवीकरण याच वादातून सुरू आहे. लक्ष्मी हेब्बाळकर या सतीश जारकीहोळी यांच्या पायाच्या धुळीचीही बरोबरी करू शकत नाहीत, अशा शब्दात रमेश जारकीहोळी यांनी टीका केली होती. अखिल भारतीय वीरशैव महासभेने त्वरित या टीकेची दखल घेत लक्ष्मी या राजकारणात उभारी घेत असलेल्या लिंगायत समाजातील महिला आहेत. त्यांची तुलना पायधुळीशी करणे हे संस्कृतीला धरून होत नाही. त्यामुळे रमेश जारकीहोळी यांनी त्वरित माफी मागावी, अशांना मंत्रिमंडळात राहण्याचा अधिकार नाही, अशी टीका केली होती. आता पीएलडी बँक निवडणुकीच्या वादाला लिंगायत विरुद्ध बिगर लिंगायत असे स्वरुप आले आहे. हा वाद भाजपच्या फायद्याचा ठरणार आहे. त्यामुळेच भाजपचे नेते या वादाकडे सध्या तटस्थपणे पहात असले तरी पाठीमागून लक्ष्मी यांना पाठबळ देण्याचे काम सुरू आहे. या वादाचे पडसाद मोठय़ा प्रमाणात उमटले आहेत. लक्ष्मी हेब्बाळकर यांना आवरा अन्यथा आम्हाला कठोर निर्णय घ्यावा लागेल, असा धमकीवजा इशारा सतीश व रमेश जारकीहोळी बंधूंनी काँग्रेस हायकमांडला दिला आहे. हा वाद आता केवळ बेळगावपुरता मर्यादित राहिलेला नाही. या वादाने संपूर्ण राज्य राजकारणात ध्रुवीकरणाचे संकेत मिळत आहेत. काँग्रेस हायकमांडला कोणाला आवरायचे हेच कळेना, अशी परिस्थिती निर्माण झाली आहे. प्रति÷sच्या या वादात हायकमांडही हतबल झाले आहे.

Related posts: