|Wednesday, July 17, 2019
You are here: Home » आवृत्ती » बेळगांव » सरकारी शाळा बेमुदत आंदोलन मागे

सरकारी शाळा बेमुदत आंदोलन मागे 

वार्ताहर /खडकलाट :

खडकलाट (ता. चिकोडी) येथील सरकारी उच्च प्राथमिक कन्नड शाळेच्या खोलीचे छत अचानक कोसळले. त्यातून 70 विद्यार्थी बचावले. गेल्या अनेक वर्षापासून शाळेतील समस्या सोडविण्यासाठी विनंती करून याकडे दुर्लक्ष होत असल्याने 6 सप्टेंबरपासून गावातील सर्व सरकारी शाळा बेमुदत बंद करण्याचा निर्णय घेण्यात आला होता. तत्पूर्वी खासदार प्रकाश हुक्केरी, आमदार गणेश हुक्केरी यांनी शाळेला नवीन आठ खोल्या मंजूर केल्या. त्यामुळे बेमुदत बंदचे आंदोलन मागे घेण्यात आले.

सरकारी कन्नड शाळेत 616 विद्यार्थी शिक्षण घेत आहेत. शाळेला 16 खोल्या असून त्यातील 5 खोल्या संपूर्णतः मोडकळीस आल्या आहेत. शिवाय उर्वरित खोल्याही नादुरुस्त आहेत. त्यामुळे दोन शाळा महाविद्यालयाच्या इमारतीत, तीन शाळा संताजी विद्या मंदिरात सुरू आहेत. गेल्या तीन-चार वर्षापासून शाळेला खोलीची मागणी करण्यात आली होती. याबाबत अनेकवेळा लेखी निवेदन देण्यात आले होते. तरीदेखील याकडे दुर्लक्ष होत होते.

असे असतानाच अचानक सहावीच्या वर्ग खोल्यांचे छत कोसळले. सुदैवाने या अपघातात 70 विद्यार्थी बचावले. यामुळे भयभीत झालेल्या पालकांनी शाळा 6 पासून बेमुदत बंद करण्याचा निर्णय घेतला. याला गावातील सर्वच शाळांनी सहकार्य करून सर्वच शाळा बंद करण्याचा निर्णय घेतला होता. यासाठी शिक्षणाधिकाऱयांनी देखील भेटी देऊन बंद मागे घेण्याचा सल्ला दिला. पण पालक आपल्या मतावर ठाम होते.

त्यामुळे 5 रोजी शाळेला भेट देऊन पाहणी करून विचारपूस केली. तसेच खासदार व आमदार गणेश हुक्केरी यांच्या फंडातून 8 खोल्या मंजूर केल्याचे सांगितले. शिवाय उर्वरित 8 खोल्याही लवकरच मंजूर करण्याचे आश्वासन दिले. यामुळे पालकवर्गातून समाधान व्यक्त होत आहे.