|Thursday, July 18, 2019
You are here: Home » आवृत्ती » बेळगांव » महिन्याभरात दरोडेखोरांच्या आवळल्या मुसक्या

महिन्याभरात दरोडेखोरांच्या आवळल्या मुसक्या 

प्रतिनिधी /संकेश्वर :

अम्मणगी (ता. हुक्केरी) येथे कुटुंबीयांना धमकावून सोने व रोख रक्कम लांबविल्याप्रकरणी फरार असलेल्या तिघा दरोडेखोरांच्या मुसक्या आवळण्यात संकेश्वर पोलिसांना यश आले. रविवार दि. 5 ऑगस्ट 2018 रोजी महादेव परीट यांच्या घरावर दरोडा घातल्याची घटना घडली होती. यानंतर फक्त महिन्याभरात म्हणजे 6 सप्टेंबरला यातील दरोडेखोरांच्या मुसक्या आवळल्या. सोमशेखर हणमंतप्पा मडिवाळ (रा. गुलबर्गा), यशवंत बसनिंगप्पा नागशेट्टी (रा. व्ही. व्ही. पुरम, बेंगळूर), संदीप हक्कीकाळ (रा. चामराजपेठ, बेंगळूर) अशी ताब्यात घेतलेल्या आरोपींची नावे आहेत. महिन्याभरातच दरोडेखोरांच्या मुसक्या आवळल्याने पोलीस प्रशासनाचे कौतुक होत आहे.

 दि. 5 ऑगस्ट रोजी हुक्केरी तालुक्यातील अम्मणगी येथे महादेव ईरप्पा परीट यांच्या घरी जावून संशयितांनी परीट यांच्यासह त्यांची पत्नी व मुलगी यांचे हात-पाय व तोंड बांधून दरोडा टाकला होता. यावेळी त्यांनी रोख रक्कम तसेच कर्णफुले, कानातील रिंग आदी सोन्याचे ऐवज तसेच रोख रक्कम 20 हजार रुपये असा सुमारे 65 हजाराचा ऐवज लंपास केला होता. यासंदर्भात महादेव परीट यांनी संकेश्वर पोलीस स्थानकात फिर्याद दिली होती. त्यानुसार तपासकार्य हाती घेताना गुरुवारी संकेश्वर पोलिसांनी संशयित आरोपींना बेंगळूर येथे गजाआड करण्यात आले.