|Tuesday, June 18, 2019
You are here: Home » आवृत्ती » गोवा » कारवारच्या समुद्रात मच्छीमारी ट्रॉलरला आग, मच्छीमाराचा मृत्यू

कारवारच्या समुद्रात मच्छीमारी ट्रॉलरला आग, मच्छीमाराचा मृत्यू 

प्रतिनिधी / वास्को

कारवारच्या नौदल तळापासून सुमारे तीन सागरी मैल अंतरावरील खोल समुद्रात मच्छीमारी ट्रॉलरमध्ये आगीचा भडका उडाल्याने एका मच्छीमाराला भाजून मृत्यू आला तर अन्य एक मच्छीमार गंभीर जखमी झाला. ही घटना बुधवारी सायंकाळी घडली. भारतीय नौदलाने घटनास्थळी रवाना होऊन बचावकार्य केले.

कारवारच्या नौदल तळापासून तीन सागरी मैल अंतरावरील खोल समुद्रात कारवारचे काही मच्छीमार ट्रॉलरवरून मच्छीमारी करीत होते. या मच्छीमारी दरम्यान या ट्रॉलरवर आग लागण्याची घटना घडली. अन्न शिजवण्यासाठी या ट्रॉलरवरील मच्छीमारांनी केरोसिन वापराचा स्टोव चालू केला होता. या स्टोवचा अचानक भडका उडून ट्रॉलरच्या इंजीन रूमने पेट घेतला. त्यामुळे एका मच्छीमाराचा भाजून मृत्यू आला. तर अन्य एक मच्छीमार गंभीर जखमी झाला. सदर घटना बुधवारी सायंकाळी पाचच्या सुमारास घडल्याचे यासंबंधी भारतीय नौदलाने दिलेल्या प्रसिद्धी पत्रकात म्हटले आहे. या मच्छीमारी ट्रॉलरचे नाव ‘जलपद्मा’ असे आहे. भारतीय नौदलाने आगीवर नियंत्रण मिळवून मच्छिमारी ट्रॉलर व खलाशांना किनाऱयावर सुखरूपरित्या आणले.

मच्छीमार ट्रॉलरला आग लागल्याची माहिती मिळताच भारतीय नौदलाची अतिजलद नौका व एक टग मदत कार्यासाठी घटनास्थळी रवाना झाले. नौदलाच्या जवानांनी तासाभराने या आगीवर नियंत्रण मिळविले. नौदलाच्या जहाजावरूनच अन्य मच्छीमारांना धक्क्यावर आणण्यात आले. या घटनेची नंतर स्थानिक पोलीसांना व मच्छीमार खात्याला नौदलाकडून माहिती देण्यात आली.