|Wednesday, July 17, 2019
You are here: Home » आवृत्ती » सांगली » दोन जिह्यात धुमाकूळ घालणारे दरोडखोर जेरबंद

दोन जिह्यात धुमाकूळ घालणारे दरोडखोर जेरबंद 

प्रतिनिधी /सोलापूर :

सोलापूर आणि पुणे जिह्यात दरोडे घालून धुमाकूळ घालणाऱया दोघा सराईत दरोडेखोरांना पिस्तुल आणि 10 जिवंत काडतुसांसह शहर गुन्हे शाखेच्या पथकाने जेरबंद केल्याची माहिती पोलीस उपायुक्त पोर्णिमा चौगुले यांनी पत्रकार परिषदेत दिली.

   दिनेश रविंद्र क्षिरसागर (वय 24, रा. मंगळवेढा तालीम, सोलापूर), सचिन उत्तम महाजन (वय 24, सुरतवड, ता. इंदापूर जि. पुणे) असे जेरबंद करण्यात आलेल्या दरोडेखोरांची नावे आहेत. शहर परिसरातील गुह्यांमध्ये पाहिजे असलेल्या गुन्हेगारांची माहिती काढण्याचे आदेश पोलीस आयुक्तांनी दिले होते त्यानुसार शहर गुन्हे शाखेचे सहाय्यक पोलीस आयुक्त अभय डोंगरे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक सूर्यकांत पाटील यांनी गुन्हे शाखेतील पोलीस अधिकारी कर्मचाऱयांना गुन्हेगारांची तपासणी करण्यास सांगितले होते. त्यावरून सहाय्यक पोलीस निरीक्षक बाळासाहेब शिंदे, अजित कुंभार हे एमआयडीसी पोलीस ठाण्याच्या हद्दीत झालेल्या एका जबरी चोरीचा तपास करीत होते.

 त्यादरम्यान मिळालेल्या माहितीवरुन एक सराईत गुन्हेगार शहरातील 70 फूट रस्त्यावर येणार असल्याचे पथकाला समजले होते. त्यानुसार पथकाने सापळा लावला. त्यावेळी दिनेश क्षिरसागर तिथे दिसून आला. दिनेशला पथकाने ताब्यात घेऊन चौकशी केली असता, त्याच्यासोबतच सचिन महाजन असल्याचे त्याने सांगितले. पथकाने सचिनलाही अटक केली. त्या दोघांना ताब्यात घेऊन झडती घेतली असता त्यांच्याजवळ एक पिस्तुल आणि 10 जिवंत काडतुसे तसेच गुह्यातील 16 हजार रूपये असा मुद्देमाल हस्तगत केला.

  यातील आरोपींना अटक करून त्यांच्याकडे चौकशी केली असता दिनेश क्षिरसागर याने सोलापूर शहरातील एमआयडीसी आणि सदर बझार पोलीस ठाण्याच्या हद्दीत तीन दरोडे घातले तसेच या दोघा सराईत दरोडेखोरांनी पुणे जिह्यातील यवत, वालचंद नगर या परिसरात दरोडे घातल्याचेही तपासात स्पष्ट झाले. पुणे आणि सोलापूर जिह्यात गुन्हे करून हे दोघेजण फरार होते. पोलिसांना हे दोघेजण गुह्यात पाहिजे होते. आरोपी सचिन विरूध्द पुणे ग्रामीण पोलिसांनी मोक्का कायद्यान्वये कारवाई केली आहे.