मी राजकीय संन्यास घेणार नाही ; चंप्रकांत पाटील यांचा युटर्न

ऑनलाईन टीम / मुंबई :
भाजप नेते आणि सार्वजनिक बांधकाममंत्री चंद्रकांत पाटील यांनी 24 तासांच्या आतच आपल्या विधानावरुन पलटी मारली आहे. यापुढे मी कोणतीही विधानसभा किंवा लोकसभा निवडणूक लढवणार नसल्याचे पाटील यांनी गुरुवारी म्हटले होते. मात्र, शुक्रवारची सकाळ उजाडताच चंद्रकांत पाटील यांनी आपल्या वक्तव्यावरुन घुमजाव केले. मी राजकीय सन्यास घेणार नाही, असे स्पष्ट करत माझ्या वक्तव्याचा विपर्यास केल्याचे त्यांनी म्हटले.
कोल्हापूरचे पालकमंत्री आणि महसूलमंत्री चंद्रकांत पाटील यांनी शुक्रवारी मोठा निर्णय जाहीर केला. यापुढच्या काळात मी कोणतीही निवडणूक लढवणार नसल्याचं त्यांनी स्पष्ट केलं होतं. चंद्रकांत पाटलांच्या या विधानानं भाजपासह राज्यभरात खळबळ उडाली. कोल्हापूर येथे पोलीस दलातर्फे गणराया अवॉर्ड वितरण सोहळय़ामध्ये त्यांनी हा निर्णय जाहीर केल्याने याचीच चर्चा कार्यक्रमानंतर रंगली. मात्र, या विधानाला अद्याप 24 तासही उलटले नाहीत, तोपर्यंत पाटील यांनी मी राजकीय सन्यास घेणार नसल्याचे स्पष्ट केले आहे. यावरुन 24 तासांतच चंद्रकांत पाटील यांनी आपला शब्द बदलल्याचे दिसून येत आहे. गतवषी मंत्री पाटील यांनी साउंड सिस्टीमविरोधात भूमिका घेतली होती. त्याचाच धागा पकडून ते म्हणाले, यापुढे मी लोकसभा, विधानसभा, विधानपरिषद किंवा पदवीधर यांपैकी कोणतीही निवडणूक लढवणार नाही. त्यामुळे गणेशोत्सवात साउंड सिस्टीम लावू नये, हा काही माझा राजकीय अजेंडा नाही. पारंपरिक वाद्य व्यावसायिकांकडून मला काही दहा टक्के कमिशन मिळत नाही. मागीलवर्षी कोल्हापुरातील गणेश मंडळांनी पारंपरिक वाद्ये लावावीत, याबाबत मी अनेक मंडळांना भेटलो, त्यांचे प्रबोधन केले. या विधायक उपक्रमाचा सर्वत्र चांगला संदेश गेला. मात्र, यामुळे काही मंडळे दुखावली गेली. तथापि न्यायालयाच्या निर्णयाचा अवमान होऊ नये व सण-उत्सवांत नागरिकांचा आनंद द्विगणित व्हावा, हा त्यामागील उद्देश आहे, असेही ते कोल्हापूर येथील कार्यक्रमात म्हणाले होते.