|Tuesday, July 16, 2019
You are here: Home » उद्योग » 2020 मध्ये मारुती सुझुकीची इलेक्ट्रिक कार येणार

2020 मध्ये मारुती सुझुकीची इलेक्ट्रिक कार येणार 

वृत्तसंस्था/ नवी दिल्ली

पुढील महिन्यापासून कंपनी भारतात 50 इलेक्ट्रिक वाहनांची चाचणी सुरू करणार आहे, असे सुझुकी मोटार कॉर्पोरेशनचे प्रमुख ओसामू सुझुकी यांनी सांगितले. जपानच्या या कार कंपनीने आपल्या इलेक्ट्रिक वाहनांची योजनेचा खुलासा केला आहे. दिल्लीमध्ये आयोजित ग्लोबल मोबिलिटी समिट ‘मुव्ह’मध्ये त्यांनी ही माहिती दिली आणि ई कार सार्वजनिक केली.

कंपनीने टोयोटा मोटार कॉर्पोरेशनसह भागीदारी करत 2020 पर्यंत भारतात इलेक्ट्रिक कार सादर करण्याचा निर्णय घेतला आहे. कंपनीच्या गुजरातमधील प्रकल्पात 2020 पासून इलेक्ट्रिक कारमध्ये वापरण्यात येणाऱया लिथियम आयन बॅटरीचे उत्पादन होण्यास प्रारंभ होईल असे सुझुकी यांनी सांगितले.

पुढील महिन्यापासून इलेक्ट्रिक वाहनाच्या प्रोटोपाईपमधील 50 वाहने भारतात चाचणीसाठी चालविण्यास सुरू होणार आहे. भारतीय हवामान आणि वर्दळीच्या समस्येनुसार भारतीय ग्राहकांना सुरक्षित आणि सहजपणे वापरता येईल अशा इलेक्ट्रिक कारची निर्मिती करण्यास मदत होईल असे त्यांनी सांगितले.

भारतात इलेक्ट्रिक वाहनांचा वापर वाढविण्यासाठी आवश्यक असणाऱया चार्जिंग इन्फ्रास्ट्रक्चर उभारण्याची गरज आहे. यासाठी भारत सरकारबरोबर काम करण्यात येईल. इलेक्ट्रिक कारसाठी मारुती सुझुकीकडून 2018 वॅग्नॉरची चाचणी करण्यात येईल आणि भारतात सादर होणारी ती पहिली इलेक्ट्रिक कार ठरणार आहे.