|Tuesday, June 25, 2019
You are here: Home » उद्योग » रुपयाच्या अवमूल्यनाने कर्जाचा भार वाढणार

रुपयाच्या अवमूल्यनाने कर्जाचा भार वाढणार 

कर्जांसाठी 68,500 कोटी रुपये अधिक द्यावे लागणार

वृत्तसंस्था/ नवी दिल्ली

रुपया कमजोर होत असल्याने कच्च्या तेलाच्या बिलामुळे अर्थव्यवस्थेवर ताण येणार आहे. मात्र याचवेळी बाहय़ कर्जामुळे अधिक फटका बसणार आहे. चालू वर्षात डॉलरच्या तुलनेत रुपया 11 टक्क्यांनी घसरला असल्याने भारताला कर्जासाठी अधिक 68,500 कोटी रुपये द्यावे लागणार आहेत. एसबीआयच्या आकडेवारीनुसार अल्प मुदतीच्या कर्जाचे हप्ते लवकरच द्यावे लागणार असल्याने नुकसान सहन करावे लागेल.

एका डॉलरसाठी 72 रुपये मोजावे लागत असल्याने चलन बाजारातील संकट अधिक वाढत आहे. यामुळे चालू खाते तूट वाढण्याची शक्यता आहे. चालू वर्षात रुपया सरासरी 72 वर राहिल्यास आणि कच्च्या तेलाचे दर 76 डॉलर्स प्रतिपिंप धरल्यास 2018 च्या उर्वरित वर्षात कच्च्या तेलाचे बिल वाढत 457 अब्ज रुपयांवर पोहोचेल असे एसबीआयचे प्रमुख आर्थिक सल्लागार सौमया कांती घोष यांनी सांगितले.

2017 मध्ये भारताचे अल्पकालीन कर्ज 217.6 अब्ज डॉलर्स होते. यामध्ये अनिवासी ठेव आणि कंपन्यांकडून घेण्यात आलेल्या विदेशी व्यावसायिक कर्जाचा समावेश आहे. 2018 च्या पहिल्या सहामाहीत यातील 50 टक्के कर्ज फेडावे लागेल अथवा पुढील वर्षासाठी ढकलावे लागेल. उर्वरित रक्कम 2017 च्या डॉलरच्या सरासरी 65.1 रुपये या दराने 7.1 लाख कोटी रुपये द्यावे लागतील. दुसऱया सहामाहीसाठी डॉलरचा सरासरी दर 71.4 रुपये धरल्यास 7.8 लाख कोटी रुपये कर्जासाठी द्यावे लागतील. ही साधारण रक्कम 70 हजार कोटी रुपये आहे. यामध्ये हेजिंगसाठी वापरण्यात आलेल्या रकमेचा समावेश नाही.