|Tuesday, July 23, 2019
You are here: Home » उद्योग » व्यवसाय मॉडेलची माहिती मागवली

व्यवसाय मॉडेलची माहिती मागवली 

कंपनी लवादाकडून वॉलमार्ट-फ्लिपकार्टला विचारणा

वृत्तसंस्था/ नवी दिल्ली

वॉटमार्ट आणि फ्लिपकार्टने आपल्या व्यवसाय मॉडेलची माहिती द्यावी असे राष्ट्रीय कंपनी कायदा लवाद (एनसीएलटी) कडून विचारणा करण्यात आली. भारतात वॉलमार्ट आणि फ्लिपकार्ट यांच्यामध्ये व्यवहार झाल्याने कन्फेडरेशन ऑफ ऑल इंडिया ट्रेडर्सने (सीएआयटी) कंपनी लवादाकडे याचिका केली होती. या प्रकरणी सुनावणी झाल्यानंतर कंपनी लवादाने वॉलमार्ट इन्टरनॅशनल होल्डिंगकडे माहिती मागविण्यात आली. भारतात कोणत्या प्रकारे काम करण्यात येणार आहे, अशी विचारणा करण्यात आली.

वॉलमार्ट आणि फ्लिपकार्टला 20 सप्टेंबरपर्यंत उत्तर द्यावे लागणार आहे आणि लवादामध्ये याची पुढील सुनावणी 5 ऑक्टोबर रोजी होईल. वॉलमार्ट आणि फ्लिपकार्टमधील व्यवहाराला स्पर्धात्मक आयोगाकडून मंजुरी देण्यात आली आहे. यामुळे वॉलमार्टकडून 16 अब्ज डॉलर्स मोजत फ्लिपकार्टमधील 77 टक्के हिस्सेदारी खरेदीचा मार्ग मोकळा झाला आहे. या मंजुरीनंतर सीएआयटीने निर्णयाविरोधात न्यायालयात धाव घेण्यात येईल असे म्हटले होते.

28 सप्टेंबर रोजी व्यापाऱयांकडून देशव्यापी संपाचे आयोजन करण्यात आले आहे. या व्यवहाराविरोधात जागृती करण्यासाठी आणि रिटेलमध्ये एफडीआयला परवानगी न मिळण्यासाठी 15 सप्टेंबरपासून दिल्ली येथून रथयात्रा सुरू करण्यात येणार असून ती 28 राज्यांत जाईल. 16 डिसेंबरला दिल्लीत राष्ट्रीय व्यापारी रॅली काढण्यात येणार आहे.